देवगडमधील बाजारपेठा सजल्या; पण पावसाचे उत्सवावर सावट

देवगडमधील बाजारपेठा सजल्या; पण पावसाचे उत्सवावर सावट

Published on

98977
देवगड ः येथील बाजारात आकाश कंदीलसह विविध साहित्य विक्रीसाठी होते.

98978
देवगड ः येथील बाजारात रांगोळी विक्रेत्यांनी दुकान थाटले होते. (छायाचित्रे ः संतोष कुळकर्णी)

देवगडमधील बाजारपेठा सजल्या; पण पावसाचे उत्सवावर सावट

आज वसू बारस; दीपावली चार दिवसांवर, ग्राहकांकडून खरेदीसाठी प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १६ ः ‘दिव्यांचा सण’ म्हणून ओळख असलेल्या दीपावली सणाच्या निमित्ताने येथील शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. फटाके, विद्युत साहित्य, पणत्या, आकाश कंदील यांची मांडणी करण्यात आली आहे. त्याला ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे. रांगोळी विक्रेत्यांनी रस्त्यालगत दुकाने थाटली आहेत. मात्र, परतीचा पावसाचे उत्सवावर सावट आहे. काल (ता.१५) येथील शहरात परतीच्या पावसाने धावपळ उडवली होती.
दीपावली सण चार दिवस असल्याने आनंदी वातावरण आहे. उद्या (ता.१७) वसुबारस असून त्यादिवसापासून सणाला सुरूवात होईल. सोमवारी (ता.२०) नरकचतुर्दशी तर मंगळवारी (ता.२१) लक्ष्मी पुजनाचा मुहुर्त आहे. तसेच बुधवारी दीपावली पाडवा आणि गुरूवारी भाऊबीज असे सण असल्याने दीपावली सणाची मजा चार दिवस घेता येणार आहे. उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात आकाश कंदील, विद्युत तोरणे यासह विविध साहित्याची मांडणी करण्यात आली आहे. आकाश कंदील, पणत्या, रांगोळी यांना मागणी असल्याचे दिसून येत होते. शुक्रवारी झालेल्या आठवडी बाजारातही विविध आकारातील पणत्या विक्रीसाठी आल्या होत्या. त्यालाही ग्राहकांकडून मागणी होती. उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठ सजली आहे. ठिकठिकाणी आकाश कंदील विक्रीसाठी मांडण्यात आले आहेत. रांगोळी, पणत्याही विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. फिरत्या विक्रेत्यांनी विविध रंगातील रांगोळीचे दुकान थाटले होते. त्यालाही ग्राहकांकडून पसंती होती. बुधवारी किनारी भागात वीजांसह जोरदार पाऊस झाला होता. अजूनही पावसाचे वातावरण कायम आहे. पावसामुळे व्यापारात व्यत्यय येण्याची व्यावसायिकांना भिती आहे. आकाश कंदील, रोषणाईचे दिवे, कापड तसेच अन्य दुकानात गर्दी दिसत होती. सुरूवातीला फराळाचे साहित्य बनवण्यासाठी भुसारी दुकानात गर्दी झाली होती. आता अन्य साहित्य खरेदीच्या निमित्ताने गर्दी होण्याची शक्यता आहे. बाजारात विविध आकारातील आणि रंगातील पणत्या विक्रीसाठी असून त्याला ग्राहकांकडून मागणी असल्याचे दिसत होते. एकूणच उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आनंदी वातावरण भासत आहे.
..................
पर्यावरणपुरक कंदीलांना पसंती
बाजारात विविध आकार आणि रंगातील मांडण्यात आलेले आकर्षक आकाश कंदील लक्षवेधी भासत होते. काहींनी विविध साहित्याचा वापर करून पर्यावरणपुरक आकाश कंदीलही बनवले आहेत. त्यांच्याकडेही खरेदीदारांकडून मागणी असल्याचे दिसत होते. उद्या (ता.१७) आठवडी बाजार असल्याने बाजारात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे.
.............
शासकीय कार्यालयांना सलग सुट्या
पुढील आठवड्यात शासकीय कार्यालयांना सलग सुट्या आहेत. उद्या (ता.१७) शुक्रवारचा एक दिवस कामकाजाचा आहे. त्यानंतर शनिवार आणि रविवारी तर सोमवारपासून दिपावली सणानिमित्त सुट्टी राहणार आहे. पर्यायाने पुढील आठवड्यात केवळ एकच दिवस कामकाजाचा राहण्याची शक्यता आहे.
................
आर्थिक ओढाताण; तरीही नियोजन
यावेळी दीपावली सण महिन्याच्या मध्यानंतर आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक ओढाताणीचा सामना करावा लागण्याचीही शक्यता आहे. तरीही सणाची मजा घेण्यासाठी नियोजन केले जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने धांदल दिसत होती.

Marathi News Esakal
www.esakal.com