आडाळी एमआयडीसी अडकली कुठे0
swt174.jpg
99185
आडाळी ः येथील एमआयडीसीचे सुरु झालेले विद्युत सबस्टेशन.
swt175.jpg
99186
आडाळी ः एमआयडीसीचे प्रवेशद्वार
आडाळी एमआयडीसी अडकली कुठे ?
उद्योजकांसमोर अडचणीः भूखंड वाटपाला ब्रेक लागण्यामागे गूढ
संदेश देसाईः सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १७ः पायाभूत सुविधा पूर्ण होऊनही आडाळी एमआयडीसी अजूनही समस्येंच्या गर्तेत अडकली आहे. उद्योग उभारण्यासाठी सज्ज झालेल्या उद्योजकांसमोर अनेक अडचणी उभ्या ठाकल्या जात असून ऑनलाईन प्रक्रियेसहित भूखंड वाटप करण्यासही प्रशासनाने ब्रेक लावला आहे. नेमकं यामागचे उद्दिष्ट काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरी अधिकाऱ्यांकडून गुप्तता पाळली जात असल्याचा आरोप होत आहे.
पंचवीस वर्षापूर्वी निर्मिती झालेला दोडामार्ग तालुका अद्यापही व्यवसायाभिमुख रोजगारापासून कोसो दूर आहे. तालुक्याच्या आर्थिक जडणघडणीत भर घालणारा व युवकांच्या हाताला रोजगार देणारा एकाही उद्योगाची निर्मित अद्याप झालेली नाही. गोवा राज्यावर विसंबून असलेल्या तालुक्यातील युवकांची अवस्था पाहिल्यास जीवावर बेतणाऱ्या प्रसंगातून संघर्ष करावा लागत आहे. तालुक्यातील मुलांचे भवितव्य सुधारावे, बेरोजगारीला पूर्णविराम मिळावा, आर्थिक उन्नती व्हावी म्हणून आडाळी येथील शेतकऱ्यांनी एमआयडीसीसाठी आपल्या वडिलोपार्जित जमिनींच्या त्याग केला. याठिकाणी उद्योग धंदे येतील, उभे राहातील आणि आपल्या पुढील पिढीचे जीवन समृद्ध बनेल, केवळ या आशेवर आपल्या शेकडो एकर जमिनी कवडीमोल भावाने एमआयडीसीला दिल्या. एवढ्यावरच न थांबता लवकर व्यवसाय आले पाहिजेत म्हणून आंदोलने, उपोषणा सारखे लोकशाहीचे शस्त्र हाती घेतले. मात्र, भविष्यातही पाहिलेले स्वप्न, इच्छा, आकांक्षा अजूनही अपुऱ्या राहिले असल्याची खंत स्थानिकांच्या मनात आहे. काही वर्षापूर्वी स्थानिकांनी एक कृती समिती स्थापन करून एमआयडीसीला गती देण्यासाठी टोकाचे प्रयत्न केले. प्रसंगी लाँग मार्च सारखे आंदोलन उभारून प्रशासनाला व सरकारला जाग आणण्याचे काम देखील केले. त्यामुळेच एमआयडीसी च्या पायाभूत सुविधांना चालना मिळाली. भूखंड वाटपाची प्रक्रिया चालू झाली. छोट्या मोठ्या ५४ उद्योजकांनी याठिकाणी येऊन भूखंड ताब्यात घेतले आहे. रस्ते, पाणी, वीज समस्या दूर झाले. असे असतानाही प्रशासनाकडून नव्याने कुचापती काढण्यास सुरुवात झाली आहे.
एमआयडीसीमधील भूखंड ताब्यात घेतलेल्या उद्योजकांना प्रशासन नव्या समस्यांच्या गर्तेत अडकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. स्थानिक राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते, वेगवेगळ्या संघटना व ग्रामस्थ उद्योग चालू होण्यासाठी इतके आतुरलेले असताना मात्र राजकीय वरिष्ठ नेते, अधिकारी यांची मानसिकता नसल्याचे समोर येत आहे. प्रशासनाकडून ऑनलाइन प्रक्रिया, नव्याने भूखंड वाटपात स्थगित केले आहे. याचे कारण काय असे लेखी स्वरूपात मागितले असल्यास देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही अधिकाऱ्यांवर होत आहे.
उद्योजक म्हणतात की, एमआयडीसीकडे सर्व कागद पात्रांची पूर्तता केली आहे. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. भूखंड हस्तांतरीत करून घेतल्यानंतर अद्याप वीज व पाणी कनेक्शन देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. या अडचणींचे निरसन झाले तर आम्हीं आजच्या घडीला व्यवसायांची मुहूर्तमेढ रोवण्यास सज्ज आहोत. येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यास कटीबद्ध आहोत. मात्र, प्रशासकीय परवानगी मिळणे गरजेचे असल्याचे भूखंड हस्तांतरण केलेल्या उद्योजकांनी आपल्या समोर असे अडथळे उभे असल्याचेकथित केले.
चौकट
रिअल इस्टेटचा घाट
आडाळी एमआयडीसी ही औद्योगिक व्यवसाय निर्मितीसाठी निर्माण करण्यात आली आहे. त्याठिकाणी उद्योग येणे क्रमप्राप्त आहे. त्या अनुषंगानेच कोट्यवधी रुपये खर्ची घालून पायाभूत सुविधा पूर्ण करण्यात आल्या. मात्र, एमआयडीसीबाबत वेगळ्या चर्चेने उधाण घेतले आहे. काही राजकीय हस्ती यामध्ये हस्तक्षेप करत असल्याचे देखील बोलले जात आहे. एमआयडीसीच्या या जागेत उद्योग नाहीत तर ही जागा एका मोठ्या कंपनीला रिअल इस्टेटसाठी देण्याचा मनसुबा राजकीय नेत्यांचा असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. मात्र, याला कडाडून विरोध करण्याचा पवित्र स्थानिकांनी घेतला आहे.
कोट
आडाळीत बडे उद्योगपती गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. परंतु, त्यांना आवश्यक असलेली व्यवहारिक सहायता मिळत नाही. त्यामुळे इच्छुक असलेले बडे उद्योगपती व छोटे उद्योजक आर्थिक अडचणीच्या फेऱ्यात सापडले आहेत. लाखो रुपयांची गुंतवणूक केलेल्यांची परवानगीसाठी ससेहोलपट होत आहे.
- पराग गावकर, सरपंच, आडाळी
कोट
मूलभूत सुविधा पूर्ण असूनही पाणी व वीज जोडणी दिली जात नाही, असे का? उद्योजकांना एमआयडीसीतील दिलेले भूखंड पुन्हा घेऊन दुसरीकडे देण्याच्या विचाराधीन असल्याचे महामंडळ उद्योजकांना बोलून दाखवत आहे. हा नेमकं प्रकार तरी काय? दुसरीकडे जागा देण्याचे प्रयोजन कोणते? यामागचे गौडबंगाल काय आहे? याचे स्पष्टीकरण महामंडळाने दिले पाहिजे.
- सतीश लळीत, संस्थाध्यक्ष, घुंगुरकाठी
कोट
आडाळीचे एमआयडीसी संपादित क्षेत्राचे अंतिम आराखडा नकाशा बनविण्याची प्रक्रिया चालू आहे. शेतकऱ्यांकडून ज्या जमिनी संपादित करण्यात आल्या त्यातील काही क्षेत्र अद्याप एमआयडीसीच्या ताब्यात आलेले नाही. तसेच तलाठ्याकडे नोंदणीसाठी प्रकरण दिले आहे. मात्र, अद्याप नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. संपूर्ण क्षेत्राची मोजणी करून एमआयडीसीच्या ताब्यात देण्यात आलेले नाही. त्या संबंधीचे आवाहन महसूल मंत्री यांच्याकडे प्रलंबित आहे. त्यामुळे भूखंड वाटप प्रक्रियेत संभाव्य अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी तूर्तास एक ते दोन महिने ऑनलाइन व भूखंड वाटप प्रक्रिया स्थगित ठेवली आहे. एमआयडीसीच्या अखत्यारीत असलेल्या २२ हेक्टर क्षेत्राचे वाटप झालेले आहे. प्रक्रिया पूर्ण होऊन संपूर्ण क्षेत्र ताब्यात आल्यावर उर्वरित क्षेत्राचे वाटप प्रक्रिया चालू केली जाईल. याला थोडा कालावधी लागेल.
- वंदना खरमाळे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.