सावंतवाडीत बुधवारी
‘नवरंग पाडवा पहाट’

सावंतवाडीत बुधवारी ‘नवरंग पाडवा पहाट’

Published on

मळगाव वाचनालयातर्फे
‘दिवाळी अंक योजना’
सावंतवाडी ः (कै.) प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगावतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही सभासद आणि वाचकांसाठी दिवाळी अंक योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत असलेल्या दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्‍घाटन शुक्रवारी (ता. २४) ग्रंथालयात करण्यात आले. ​गेली २५ वर्षे ग्रंथालयाच्या स्थापनेपासून नियमित वाचन करणारे व्यासंगी वाचक व ग्रंथालयाचे संचालक विजय निगुडकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‍घाटन झाले. ​या दिवाळी अंक योजनेत वाचकांना ४० दर्जेदार दिवाळी अंक उपलब्ध होणार आहेत. या सर्व अंकांचा लाभ घेण्यासाठी वाचकांना ५० रुपये वर्गणी भरावी लागणार आहे. ​दिवाळीच्या निमित्ताने वाचन संस्कृती जपण्यासाठी आणि वाचकांना घरबसल्या ज्ञान व मनोरंजनाची मेजवानी मिळावी, यासाठी ही योजना तयार केली आहे. या योजनेमुळे वाचकांना २४ ऑक्टोबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत दिवाळी अंक घरी नेऊन वाचण्यासाठी उपलब्ध होतील. ​मळगाव आणि परिसरातील जास्तीत जास्त वाचकांनी या दिवाळी अंक योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रंथालयाने केले आहे.
---
सावंतवाडीत बुधवारी
‘नवरंग पाडवा पहाट’
सावंतवाडी ः येथील श्रीराम वाचन मंदिर समोर मोती तलावाच्या काठी ‘नवरंग पाडवा पहाट’ बुधवारी (ता. २२) पहाटे ५.३० वाजता आयोजित केली आहे. कार्यक्रमाचे हे २० वे वर्ष आहे. यंदा या कार्यक्रमात पणजी (गोवा) येथील संगीत विशारद दत्तगुरू केळकर (पंडित सुधाकर करंदीकर यांचे शिष्य) यांचे शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुगम गायन होणार आहे. गोवा व महाराष्ट्रात त्यांचे गायनाचे कार्यक्रम सातत्याने होत असतात. त्यांना संगीत साथ हार्मोनियमवर नीलेश मेस्त्री तर तबला साथ किशोर सावंत, नीरज भोसले करणार आहेत. ध्वनिक्षेपण व्यवस्था हेमंत मेस्त्री पडेलकर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ पुराणिक करतील. हा कार्यक्रम ‘नवरंग’ आणि सावंतवाडी नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे. कार्यक्रम सर्वांना खुला असून श्रोत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्रीपाद चोडणकर यांनी केले आहे.
--
जलतरण स्पर्धेत
रुद्र मेस्तचे यश
मालवण ः क्रीडा व युवा संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आयोजित क्रीडा संकुलाजवळील जलतरण तलाव, ओरोस येथे झालेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या जिल्हास्तरीय ५० मीटर फ्री स्टाईल स्विमिंग या क्रीडा प्रकारात स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयातील रुद्र मेस्त याने द्वितीय क्रमांक पटकावला. त्याची विभाग स्तरासाठी निवड झाली. त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे, विजय केनवडेकर यांनी अभिनंदन केले.
...................
वेंगुर्लेत उद्यापासून
‘दीपावली शो टाईम’
वेंगुर्ले ः वेंगुर्ले हॉस्पिटल नाका कला, क्रीडा मंडळ वेंगुर्लेमार्फत २० ते २३ ऑक्टोबर या कालावधीत बॅ. खर्डेकर कॉलेज मैदान येथे दीपावली शो टाईमचे आयोजन केले आहे. या दीपावली शो टाईम अंतर्गत सोमवारी (ता. २०) सायंकाळी ६.३० वाजता उद्‍घाटन, सायंकाळी ७ वाजता उमेश यशवंत पाटील निर्मित ‘नृत्याचा सुरेख प्रवास’ सेलिब्रिटी नृत्यांगना दीक्षा नाईक सोबत १४ नृत्य कलाकारांचे नृत्य, २१ ला सायंकाळी ७ वाजता ओंकार डान्स अॅकॅडमी सावंतवाडी यांचे छत्रपती संभाजी महाराज, मातंगी देवी, गोरा कुंभार, गरुड गर्वहरण, कालभैरव आदी व्हरायटी शो, २२ ला सकाळी सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ७ वाजता श्री सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाटयमंडळ कसई दोडामार्ग यांचा ‘देव झाला ढोलकीवाला’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. अधिक माहितीसाठी सचिव योगेश गोवेकर किंवा करण निरवडेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
......................
कणकवलीत उद्या
गायनाची मैफल
कणकवली ः दिवाळीनिमित्त परमहंस भालचंद्र महाराज संस्थान येथे सोमवारी (ता. २०) सकाळी ७.३० वाजता गंधर्व फाउंडेशन, कणकवलीतर्फे गायन मैफल होणार आहे. शास्त्रोक्त गायन, अभंग, नाट्य पदांच्या या गायन मैफलीत मनोज मेस्त्री व सहगायक सहभागी होणार आहेत. रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com