देवगड अल्पसंख्यांक सेल 
अध्यक्षपदी सर्फराज शेख

देवगड अल्पसंख्यांक सेल अध्यक्षपदी सर्फराज शेख

Published on

99386

देवगड अल्पसंख्यांक सेल
अध्यक्षपदी सर्फराज शेख
देवगड ः भाजप देवगड मंडल अल्पसंख्यांक सेल अध्यक्षपदी जामसंडे मळई येथील सर्फराज शेख यांची निवड करण्यात आली. भाजप अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष निसार शेख यांनी ही नियुक्ती केली. यावेळी निसार शेख यांचे बाळ खडपे यांनी भाजप कार्यालयात स्वागत केले. अल्पसंख्यांक सेलचे सरचिटणीस योगेश चांदोस्कर, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, राजेंद्र वालकर, यासिन खान, शाहनवाज शाह, तौसिफ शेख, माजी नगरसेवक उमेश कणेरकर, स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत कावले, नरेश डामरी, शराफत खान, अजिज खान, नासिर खान, शफिक कल्पाती, लियाकत खान, अरबाझ खान, फराण खान, आरिफ होलसेकर, चेजान होलसेकर, अदनान होसेकर, वसिम शेख, मलिक शेख, हुजेफा खान, तौफिक शेख, अजिम राऊत, असलम वणू, शहादत खान, अमित पाटील, राजू खान, मुख्तार शेख, कय्युम होलसेकर आदी उपस्थित होते.
---
आपत्तीची भरपाई
२४ तासांत अदा
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील मौजे मूर्तवडे येथील वीज पडून झालेल्या दुर्घटनेत सुशील शिवराम पवार यांचा मृत्यू झाला होता. २४ तासांच्या आत प्रशासनाकडून वारस श्रेया पवार यांना ४ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला तसेच ५ जखमींना प्रत्येकी ५४०० रुपयांची मदत देण्यात आली. मूर्तवडे येथे १५ ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वीज पडून सुशील पवार (रा. मूर्तवडे) यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत काहीजण किरकोळ जखमी झाले होते. या घटनेनंतर प्रशासनाने तत्काळ प्रतिसाद देत नैसर्गिक आपत्ती मदतनिधीतून मृत व्यक्तीचे वारस श्रेया पवार यांना चार लाख रुपये आर्थिक मदत केवळ २४ तासांतच देण्यात आली. ही मदत उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या हस्ते तहसीलदार प्रवीण लोकरे, मंडळ अधिकारी वहाळ तसेच ग्राममहसूल अधिकारी यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली.
----
शेतकऱ्यांवर पुन्हा
अस्मानी संकट
रोहा ः शहर व ग्रामीण भागात परतीच्या पावसाने बुधवारी (ता. १६) अक्षरशः धुमाकूळ घातला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिक व व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली, तर काही काळ विद्युतपुरवठाही खंडित करण्यात आला होता. या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. मध्यंतरी विश्रांती घेणाऱ्या पावसाने बुधवारी वादळी वाऱ्यासहित जोरदार हजेरी लावली. दिवाळीच्या तोंडावर दमदार पाऊस बरसल्याने नागरिक आणि बाजारपेठेतील व्यापारी बांधवांची एकच धावपळ झाली. वाऱ्यामुळे बाजारपेठेतील शुभेच्छा बॅनर्स आणि बाजारात फटाके व अन्य दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी वातावरणाचा अंदाज घेऊन भातकापणीला सुरुवात केली होती, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे उभ्या आणि कापणी केलेल्या भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
---
‘पिकांचे तत्काळ
पंचनामे करावे’
पोलादपूर : तालुक्यात बुधवारी (ता. १५) पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांच्या कापणीला आलेल्या आणि आधीच कापलेल्या भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे भात दाण्याची गुणवत्ता घटली असून, पिके ओलसर झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाही वसूल होण्याची शक्यता नाही. याची गंभीर दखल घेत मनसेतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यामध्ये कृषी विभाग व महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली. निवेदन देताना तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर, सरपंच गोविंद उतेकर, शहर अध्यक्ष अनिल खेडेकर, उपाध्यक्ष तुषार पवार आणि प्रफुल्ल पांडे उपस्थित होते.
----
मजुरांच्या मनधरणीची
बळीराजावर वेळ
खोपोली ः पावसाने विश्रांती घेतल्याने जिल्ह्यात भातकापणीची कामे सुरू झाली होती, पण पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने हाती आलेले पीक वाचवण्यासाठी चिंतित झालेल्या बळीराजावर मजुरांच्या मनधरणीची वेळ आली आहे. काही दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. भाताच्या लोंब्यांपासून भाताचे दाणे वेगळे होत आहेत. दुसरीकडे बदललेल्या वातावरणाने पावसाची शक्यता निर्माण झाली असल्याने हाती आलेली पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. अशा स्थितीत भात कापणीला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी परंपरागत शेतीकामे करणाऱ्या मजुरांची जमवाजमव सुरू झाली आहे. परंतु स्थानिक स्तरावर शेतमजुरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. तर, दुर्गम भागातील मजूर दिवाळीच्या काळात गावी जात असल्याने अधिकची मजुरी दिली जात आहे.
----
किल्ला बनविण्यात
बच्चेकंपनी मग्न
अलिबाग ः दिवाळी म्हटलं की, किल्ला बनविणे आलेच. मुलांच्या परीक्षा संपल्याने किल्ला बनविण्यात चिमुकले मग्न झाल्याचे पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठीचा संदेशच जणू ही चिमुकले दिवाळीत किल्ले बनवून देत आहेत. किल्ला बनविल्यानंतर त्यावर ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळेही हवेतच. सध्या अलिबागमध्ये विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांच्या मातीच्या प्रतिकृती विक्रीसाठी दाखल झाल्या असून, त्या घेण्यासाठी बच्चेकंपनी गर्दी करीत आहे. आपल्या महाराष्ट्रात गड-किल्ल्यांना एक आगळे-वेगळे स्थान आहे. हे ऐतिहासिक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी व मराठी मावळ्यांनी केलेल्या पराक्रमाची साक्ष देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com