होऊया पर्यावरण साक्षर

होऊया पर्यावरण साक्षर

Published on

rat5p2.jpg-
99492
प्रशांत परांजपे

वसा वसुंधरा रक्षणाचा.........लोगो

इंट्रो

जल, जंगल आणि जमीन या त्रिसूत्रीला समजून घेणे आणि त्याचा होणारा ऱ्हास थांबविणे, हा पर्यावरण साक्षरतेमधील महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येकाने पर्यावरण साक्षर असणे अत्यावश्यक आहे.

- डॉ. प्रशांत परांजपे, दापोली

----------
होऊया पर्यावरण साक्षर

‘‘हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमलीचे,
त्या सुंदर मखमलीवरती फुलराणी ती खेळत होती ।।’’ बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांच्या या काव्यपंक्ती नुसत्या वाचल्यावरही एक आल्हाददायी अनुभव येतो. असे अनेक नामवंत, प्रतिभावंत लेखक आणि कवी यांनी निसर्ग वाचायला शिकवला. ''रानकवी'' या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले ना. धों. महानोर हे कवी निसर्गावर कविता आणि गाणी लिहिण्यासाठी ओळखले जातात. रवींद्रनाथ टागोर हे निसर्गाला केवळ पार्श्वभूमी म्हणून नव्हे, तर मानवी भावना आणि अध्यात्माशी जोडलेले एक जिवंत अस्तित्व मानून त्यांनी आपल्या कवितांमध्ये निसर्गाचे सुंदर चित्रण केले आहे.
बाळकृष्ण भगवंत बोरकर यांच्या कवितेत निसर्ग आणि प्रेम हे केंद्रस्थानी आहे आणि त्यांच्या कवितांमधील निसर्ग प्रतिमांचा वापर प्रसिद्ध आहे. हिंदी कवी सुमित्रानंदन पंत यांना ‘प्रकृती के सुकुमार कवी’, म्हणजे निसर्गाच्या कोमल कवी म्हणून ओळखलं जातं.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही कवींनीही निसर्ग वाचायला शिकवला. विल्यम वर्डस्वर्थ हे एक जगप्रसिद्ध रोमँटिक कवी होते, ज्यांना निसर्गाच्या प्रेमासाठी ओळखले जाते. रॉबर्ट फ्रॉस्ट हे अमेरिकेतील प्रसिद्ध कवी, ज्यांच्या कवितांमध्ये निसर्गाचे आणि मानवी जीवनाचे वैश्विक तत्त्वज्ञान आढळते. अशा अनेक नामवंत लेखक-कवींनी निसर्गाचे अतिशय यथार्थ वर्णन त्यांच्या लेखनातून, कवितांमधून केलेले आहे. याची जाणीव करून देण्याचा उद्देश म्हणजे साक्षरता अभियान झाल्यानंतर संपूर्ण भारत साक्षर झाल्याचा समज आपण करून घेतलेला आहे. आपण साक्षर म्हणजे फक्त ‘ग’, ‘म’, ‘भ’, ‘न’ वाचता येणे इतपतच मर्यादित साक्षरतेचा अर्थ समजलो, आणि तिथेच आम्ही निरक्षर झालो. साक्षरता म्हणजे फक्त लिहिता आणि वाचता येणे असे नसून, तर प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक वस्तूला, प्रत्येक व्यक्तीला, प्रकृतीच्या प्रत्येक कणाला वाचता येणे अत्यावश्यक आहे. ज्‍या पद्धतीने संगणकीय साक्षरता, जलसाक्षरता, अक्षर साक्षरता, त्याच पद्धतीने पर्यावरणीय साक्षरता असा एक खूप महत्त्वाचा, प्रत्येकाच्या मनाला भिडणारा, तरीदेखील दुर्दैवाने दुर्लक्षित राहिलेला, असा अनिवार्य विषय. म्हणूनच या दीपोत्सवाच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धन ही महत्त्वाची बाब लक्षात घेऊन पाच दिवसांच्या सुटीमध्ये पर्यावरण साक्षरता या विषयाची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करूया.
या निसर्गाला वाचायला आपण शिकणे गरजेचे असल्यामुळे, आज आपण पर्यावरण साक्षरता विषयाबाबत तोंडओळख करून घेणार आहोत. पर्यावरणीय धोरणांमध्ये पर्यावरणाचे रक्षण आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजनांचा समावेश आहे. या धोरणांमध्ये हवा आणि जलप्रदूषण नियंत्रण, कचरा व्यवस्थापन, जैवविविधतेचं संवर्धन, अक्षय ऊर्जा प्रोत्साहन, हवामान बदल कमी करणे आणि बरेच काही समाविष्ट असू शकते. व्यापक पर्यावरणीय धोरणे अंमलात आणून, सरकार आर्थिक विकास आणि पर्यावरणीय शाश्वतता यांच्यात संतुलन साधण्याचा प्रयत्न करते. पर्यावरण आणि ग्रामपंचायत यांचा संबंध गावाच्या शाश्वत विकासासाठी आणि तेथील नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे की, ती गावासाठी पर्यावरणीय आरोग्य राखण्यासाठी उपाययोजना करेल, ज्यामुळे रोग टाळता येतील आणि पर्यावरण सुरक्षित राहील. यासाठी ग्रामपंचायतीला पर्यावरण व्यवस्थापन योजना तयार करून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

- ग्रामपंचायतीची भूमिका आणि जबाबदाऱ्या

* पर्यावरणीय आरोग्य राखणे : ग्रामपंचायतीने पर्यावरणीय आरोग्य राखण्यासाठी आणि सुधारण्यासाठी गावातील पर्यावरण व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
* विकास योजनांची अंमलबजावणी : गावाच्या विकासासाठी योजना तयार करणे आणि त्या प्रभावीपणे राबविणे ही ग्रामपंचायतीची मुख्य जबाबदारी आहे. यामध्ये पर्यावरणीय संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या ध्येयांचा समावेश असतो.
* जागरूकता आणि शिक्षण : पर्यावरण संरक्षणाबद्दल गावातील लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना पर्यावरणीय शिक्षित करणे, यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला पाहिजे.
* शाश्वत विकास ध्येये साध्य करणे : हवामान बदल आणि इतर पर्यावरणीय समस्यांना तोंड देण्यासाठी, ग्रामपंचायतीने शाश्वत विकास ध्येये साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
* स्थानिक पर्यावरण व्यवस्थापन : ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन आणि वृक्षारोपण यांसारख्या स्थानिक पर्यावरणीय समस्यांवर उपाययोजना केल्या पाहिजेत.
* ग्रामसभेचा सहभाग : ग्रामसभा ही लोकशाही आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करणारी महत्त्वाची संस्था आहे. पर्यावरण व्यवस्थापनाच्या निर्णयांमध्ये ग्रामसभेचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे.
पर्यावरण साक्षरता या संदर्भात संपूर्ण भारतभर केंद्र आणि राज्य शासनाच्या नियम आणि आदेशामध्ये अनेक गोष्टी नमूद केल्या गेल्या आहेत. मात्र, संबंधित विभागालाच याची जाणीव नसल्यामुळे, किंबहुना संबंधित विभागातील अधिकारीच पर्यावरण निरक्षर असल्यामुळे, आज दिल्लीपासून गल्लीपर्यंत पर्यावरणाच्या ऱ्हासाला प्रत्येक नागरिकाला सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनात महत्त्वाचा वाटा उचलणे आवश्यक आहे. त्याकरिता वारंवार विविध उपाययोजना आपण सूचित करीत आलो आहोत. या दीपोत्सवात पर्यावरण साक्षरतेचा एक दीप लावूया, आणि ‘हरियाली और रास्ता’ या गीताच्या ओळी आत्मसात करूया.

(लेखक शाश्वत पर्यावरण विषयात डॉक्टरेट पदवीधारक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com