एसबीआयतर्फे २० विद्यार्थिनींना सायकल वाटप
टुडे पान ३ अँकर
विद्यार्थिनींचा शाळेचा प्रवास होणार सुकर
‘एसबीआय’तर्फे सायकल वाटप ः शहरासह पोमेंडीतील विद्यार्थिनींचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : येथील स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे (एसबीआय) रत्नागिरी नगरपालिका क्षेत्र आणि पोमेंडी येथील २० विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. यानिमित्ताने ग्रामीण भागातील मुलींचा शाळा ते घर असा प्रवास सुखकर झाला आहे.
शहरातील दामले विद्यालयात झालेल्या कार्यक्रमावेळी बँकेच्या मुख्य व्यवस्थापक श्रीमती मंजू शर्मा, महाप्रबंधक श्रीमती बिंदू जनार्दन, उपमहाप्रबंधक शैलेश मिश्रा, क्षेत्रीय प्रबंधक अमित चौधरी, प्रा. सुधाकर मुरकुटे, मुख्याध्यापक भगवान मोटे आदी उपस्थित होते. याप्रसंगी श्रीमती मंजू शर्मा म्हणाल्या, ‘‘एसबीआय बँक ही नेहमीच सामाजिक उत्तरदायित्व निभावत असते. आर्थिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही बँकेचे काम तितक्याच प्रभावीपणे चालू आहे. यापुढेही बँक शिक्षणासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये नेहमीच सहभागी होईल. आज विद्यार्थिनींना केलेली ही सायकलरूपी मदत त्यांच्या आयुष्यात नेहमीच प्रेरणादायी ठरेल.’’
यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. मुरकुटे यांनी श्रीमती मंजू शर्मा व इतर मान्यवरांचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र शिंदे यांनी केले. यावेळी रत्नागिरी नगरपालिकेच्या शाळांचे सर्व मुख्याध्यापक, तसेच पोमेंडी बीटमधील लाभार्थी विद्यार्थिनी, त्यांचे पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुर्गम भागातील मुलींना साह्य
शहरातील व ग्रामीण भागातील मुलींच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारी एसबीआय ही भारतीयांची बँक असल्याचे सांगितले. या मदतीसाठी २० विद्यार्थिनींची गुणवत्ता, आर्थिक पार्श्वभूमीबरोबरच घरापासून शाळेपर्यंतचे अंतर याचा विचार करून निवड करण्यात आल्याचे प्रा. मुरकुटे यांनी सांगितले. तालुक्यातील दुर्गम भागातील मुलींच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद हेच या कार्यक्रमाचे फलित आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.