शेतकऱ्यांची दिवाळी शेताच्या बांधावर

शेतकऱ्यांची दिवाळी शेताच्या बांधावर

Published on

- rat२१p९.jpg -
P२५N९९९७२
तुळशी: दिवाळीच्या सणात भात पिकाची झोडणी करताना शेतकरी संतोष पोस्टुरे व कुटुंबीय
---
शेतकऱ्यांची दिवाळी शेताच्या बांधावर
कामे आटोपण्यावर भर ; भात कापणी, झोडणीला वेग
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २१ ः सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना कोकणी ग्रामीण भागात मात्र शेतकरी ऐन दिवाळीच्या दिवसांत शेताच्या बांधावर काम करताना दिसत आहे. उन्हात कष्टरुपी घामाच्या धारांनी पहिली आंघोळ करणारा शेतकरी ऐन दिवाळीत दैनंदिन कामात व्यस्त आहे. दिवाळीपूर्वी पावसाचे सावट असल्यामुळे वर्षभराची मेहनत वाया जाऊ नये म्हणून बळीराजाची घालमेल पहायला मिळत आहे.
दीपावलीचा सण उत्सव सर्वत्र साजरा होत आहे. फराळ, मिठाई, फटाके, विविध खरेदी यावर जोर आहे. मात्र ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या नेहमीच्या कामांमध्ये व्यस्त राहून दिवाळी साजरी करीत आहे. अवेळी आलेल्या पावसाने भाताचे प्रचंड नुकसान केले. कापणीची कामे खोळंबली. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकरी शेताच्या बांधावर असल्याचे चित्र आहे. धान्य ठेवण्यासाठी अंगणाची जागा चोपून सारवून घेणे, खळी करणे, भात कापणी, झोडणी या कामांत तो व्यस्त आहे. अंगण करताना चोपण्याचा होणारा आवाज हेच शेतकऱ्यांचे फटाके आहेत. शेतातील धान्य घरी आणण्याच्या लगबगीत त्याचा दिवस जातो आहे. विश्रांतीला दिवाळीचा फराळ याचा आनंद घेत शेताच्या बांधावरच आपली दिवाळी समजून कष्ट करीत आहे. रात्रीच्या वेळी शेतात शेकोटी पेटवून, आरोळ्या ठोकून जंगली श्वापदांना पळवून लावताना पहारा देत पिकांचे संरक्षण करावे लागत आहे. पावसांत भिजलेले धान्य, भात उन्हात सुकविण्यासाठी धडपड करताना वर्षभराच्या कष्टाचे फलित डोळ्यांना सुखावत आहे. दिवाळी सुटीत मुंबईकर गावात दाखल झाल्याने गावेही गजबजली आहेत.
-----
चौकट १
वन्यप्राण्यांमुळे रात्रीचा जागता पहारा
भात पीक तयार झाले असून जंगली श्वापदांमुळे पिकांची नासाडी होत आहे. यावर उपाय म्हणून रात्रीचा पहारा करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. फटाके फोडून आवाज करत त्यांना पळवून लावले जात आहे. प्राण्यांना पळविण्यासाठी आग पेटवून भयभीत करण्याचा प्रयत्नही सुरू आहे.
-----
कोट
सुगीच्या दिवसात अवेळी पावसाने भात पिकांचे नुकसान केले. वन्य प्राण्यांपासून शेतात तयार पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करावा लागतो आहे. शेतकऱ्यांची दिवाळी शेताच्या बांधावर साजरी करावी लागत आहे.
- संतोष पोस्टुरे, शेतकरी, तुळशी
---
मजुरांची कमतरता...
चिपळूण तालुक्यात यंदा पावसामुळे १७ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले. परतीच्या पावसाने शंभरहून अधिक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यामुळे भात कापणीला वेग आला आहे. तालुक्यात मजुरांची कमतरता भासत असल्याने ऐन दिवाळीत शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य कापणी, बांधणी, झोडणीच्या कामाला लागली आहेत. ग्रामीण भागात आजही खळ्यांवर मोकळ्या आकाशात झोडणीची कामे होत आहेत. लवकरात लवकर खळ्यांमध्ये पडलेले भात पोत्यात भरून घरात आणून टाकण्याचे काम सुरू आहे. सकाळी गारवा असतो. दहा वाजल्यानंतर उन तापण्यास सुरवात होते. त्यामुळे शेतकरी पहाटे शेतात जाऊन कापणीवर जोर देत आहे. जमीन ओली असल्यामुळे सावर्डे, पोफळी, अलोरे, शिरगाव, मार्गताम्हाने, असुर्डे, आरवली, कळंबट या भागातील शेतकरी भात कापून पेंढी रस्त्याच्याकडेला सुकण्यासाठी ठेवत आहेत. अनेक ठिकाणी कापणी, काढणीच्या कामाला वेळेत मजूर मिळत नसल्याने सधन शेतकरी यंत्राच्या साह्याने कामे जलदगतीने आटपून घेत आहेत.

कोट
जिल्ह्यात सर्वाधिक चिपळूण तालुक्यात ६ हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती केली जाते. पुढील वर्षीसाठी लागणारे बियाणे बाजूला करतो आणि उर्वरित भात विकून चार पैसे कमवितो. दिवाळीत भात विकून चार पैसे खर्चायला मिळतील, अशी आशा येथील शेतकऱ्यांना आहे. त्यामुळेच ऐन दिवाळीत शेतकरी आपल्या शेतात कापणी, झोडणी आणि इतर कामासाठी उतरलेला दिसत आहे. शेतकऱ्यांना आमच्याकडून सर्व प्रकारचे सहकार्य आहे.

- शत्रुघ्न म्हेत्रे, तालुका कृषी अधिकारी चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com