मंडणगड-पावसाने भातशेतीचे प्रचंड नुकसान

मंडणगड-पावसाने भातशेतीचे प्रचंड नुकसान

Published on

-Rat२७p१६.jpg-
२५O००७६०
मंडणगड : पावसाने भातशेतीचे प्रचंड नुकसान केले आहे.
-rat२७p८.jpg-
P२५O००७४६
मंडणगड : पाऊस पडत असल्याने तयार भाताचे पीक आडवे होऊन पाण्यात भिजत असल्याचे चित्र आहे.
-----
मंडणगडमध्ये पावसाने भातशेतीचे नुकसान
शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी; २९६ शेतकऱ्यांच्या ५५.९९ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २७ ः मंडणगड तालुक्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा शेतीवर मोठा कहर केला आहे. ऑक्टोबर महिन्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक पाहणीनुसार २९६ शेतकऱ्यांच्या सुमारे ५५.९९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत.
तालुक्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत देखील पिकांचे नुकसान झाले होते. त्या काळात एकूण ४९.२४ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीची नोंद झाली होती. त्यापैकी जून ते ऑगस्ट महिन्यांतील नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे; मात्र, सप्टेंबर अखेरपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे नुकतेच कापणीला आलेले भातपीक पुन्हा बाधित झाले आहे. गेल्या आठवडाभरात संध्याकाळच्या सरींनी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून पिके आडवी झाली तर काही ठिकाणी भाताचे रोप पूर्णतः पडून चिखलात गाडले गेले आहेत. परिणामी, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कृषी विभागाकडून नुकसानीचा आढावा सुरू असून, नवीन पंचनामे तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. काही शेतकऱ्यांनी तातडीने नुकसानभरपाई मिळावी तसेच परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही मदत मिळावी, अशी मागणी केली आहे. स्थानिक शेतकरी यांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे भाताचं पीक चिखलात बसलंय. पेंढी कुजायला लागली आहे. या परिस्थितीत उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. दरम्यान, अजूनही तालुक्यातील डोंगराळ भागात सरी सुरूच असून, हवामानखात्याने पुढील काही दिवस हलक्याफुलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.
हवामानातील या अनिश्चिततेमुळे पुढील हंगामाचे नियोजन करणेही कठीण झाले आहे. कृषी विभागाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून, पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अतिवृष्टीमुळे एकूण १३.९२ लाखांचे नुकसान झाले आहे तसेच घरे, गोठे, जनावरे आणि शेती नुकसानीपोटी एकूण ५.३७ लाखांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.
---
चौकट
तिन्ही ऋतूंचा अनुभव
मंडणगड तालुक्यात यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात नेहमीचा ऑक्टोबर हिट अनुभवायला मिळालेला नाही. उलट गेल्या काही दिवसांपासून हवामानात अनिश्चिततेचे चित्र दिसत आहे. एकीकडे पावसाच्या सरी, दुसरीकडे थंडावा आणि अधूनमधून उन्हाची झळ त्यामुळे तालुक्यात पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा असा तिन्ही ऋतूंचा अनुभव एकाचवेळी येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

कोट
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. हवामान स्थिर झाल्यानंतर अचूक आकडे निश्चित करून शासनाकडे अहवाल सादर केला जाईल. दोन दिवसांत पंचनामाचे काम पूर्ण होईल.
- सोमनाथ अहिरकर, तालुका कृषी अधिकारी.
--------
कोट
भातपीक जवळजवळ तयार होतं; पण आता पाण्यात उभं आहे. जर पाऊस असाच राहिला तर उत्पादन निम्म्यापेक्षा कमी होईल. खतं, मजुरी, बी-बियाणं यांचा खर्च तरी त्यातून उभा राहील की, नाही याची शाश्वती राहिली नाही.
- संतोष पोस्टुरे, शेतकरी
------
कोट
पिकावर खूप कष्ट घेतले; पण कापणीच्यावेळी पावसामुळे सगळेच प्रश्न निर्माण झाले आहेत. धान्य वाचवणे कठीण होत चालले आहे. वस्तुस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी.
- सीताराम माळी, शेतकरी
----
कोट
ऑक्टोबरमध्ये अशा प्रकारचा पाऊस असामान्य आहे. हवामानातील अचानक बदल शेती उत्पादनावर थेट परिणाम करतो आहे. आधीच तालुक्यात पावसाळी पीक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी असून, अवकाळी पावसामुळे शेतकरी नाउमेद होत आहे.
- समीर पारधी, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com