दिवाळीचाच नव्हे जगण्याचा आनंद वाटूया

दिवाळीचाच नव्हे जगण्याचा आनंद वाटूया

Published on

- rat२७p१.jpg, rat२७p२.jpg -
२५O००७३८
गुहागर ः गुहागरमधील उपेक्षितांना अनुलोमतर्फे दिवाळी फराळ भेट देण्यात आला.

दखल----------लोगो

शासनाकडून मोफत धान्य मिळते. रोजच्या भाकरीची चिंता नसते; परंतु सणवाराला गोडधोड करण्याइतकी परिस्थिती नाही. परिस्थितीशी सामना करताना होणाऱ्या ओढाताणीमुळे सण उत्सव साजरे करण्याची इच्छाच नाही. हे एवढं वाचल्यावर विविध प्रतिक्रिया उमटतील. यात अनेक धनवान पांढरपेशी प्रतिक्रिया फुकट मिळत ना म्हणून अशा गोष्टी सुचतात, अशी हेटाळणीची, फुकटे तरी तोरा काय अशा छापाच्या असतील; पण या पलीकडे सहृदयतेने, करूणेने, सहानुभूतीने, सहवेदनेने, संवेदनशीलतेने विचार करणारी मंडळी आहेत. आपण अशांपैकी आहोत हे अनुलोम संस्थेचे कार्यकर्ते आणि त्यांना मदतीचा हात पुढे करणाऱ्यांनी दाखवून दिले.
- शिरीष दामले, रत्नागिरी
---
दिवाळीचाच नव्हे तर आता जगण्याचा आनंद वाटूया...
दिवाळी हा उत्सव प्रकाशाचा खरा; परंतु आपल्या देशातील विषमता लक्षात घेता हा प्रकाश सर्वदूर पसरतो असे नाही. प्रकाशाचा हा सण साजरा करताना सर्वच लोकांचे चेहरे उजळून निघत नाहीत. त्यांच्या हातात दिवाळी दिमाखात साजरी करण्यास आणि रोषणाईसाठी पैसे नाहीत. दररोजच्या जगण्याचीही भ्रांत आहे. असे लोक आसपास दिसत असताना त्यांच्यासाठी काही करावे असे वाटणे आणि ते प्रत्यक्षात उतरवणे, याची दखल घेतलीच पाहिजे.
अनुलोम संस्थेतर्फे गुहागर तालुक्यात २२ गावातील ३६३ वंचित कुटुंबांचा शोध घेण्यात आला. या कुटुंबांना फराळ आणि यातील काही मुलांना फटाके वाजवण्याचा आनंद मिळाला. हे नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले म्हणून त्याचे अधिक कौतुक. यासाठी साधारण सव्वालाख रुपयाहून अधिक खर्च आला. तो लोकांच्या मदतीतून उभारला गेला. अत्यंत पारदर्शीपणे हे राबवण्यात आले. ही काही मोठे आकडेवारी नव्हे; परंतु दिवाळी सणाचा संदर्भ घ्यायचा तर एका पणतीने अनेक पणत्या उजळता येतात आणि अंधार कमी करता येतो त्याप्रमाणे या कामातून मोठे काम उभे राहू शकते. अनुलोम आणि त्याचे कार्यकर्ते या सर्वांचे यासाठी अभिनंदन.
यातून साध्य काय झाले? गावागावात असलेल्या अनुलोम मित्रांनी गावप्रमुख, वाडीप्रमुख, सरपंच, प्रभावशाली व्यक्ती यांच्याशी चर्चा केली. २२ गावात अशी ३६३ कुटुंबे आहेत, हे सर्वांना मान्य करावे लागले. त्यांच्या जगण्याची गुणवत्ता कमी आहे, हे वंचित आहेत हे मान्य करावे लागले. धनत्रयोदशी आणि पुढील दोन दिवसात अडूर, कोतळूक, असगणी, ओमळी, शीर, जानवळे, पिंपर, असगोली, कापसाळ, आंबडस, पोसरे, वावेतर्फे खेड, कुरवळ जावळी, कौंढर काळसूर, मढाळ, होडखाड, धामणंद, सवणस मुळगांव या गावात फराळ वाटप करण्यात आले.
हे एका सणापुरते काम झाले असे मानून थांबायचे नाही. यापुढील काम संघटनात्मक पातळीवरचे आणि अधिक महत्त्वाचे आहे. या कुटुंबांचे समग्र चित्र आता हाती आहे. त्यांच्या जगण्याची गुणवत्ता कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्न करता येतील. या कुटुंबांचे शिक्षण, आरोग्य, चरितार्थाचे साधन, महिलांची स्थिती आदी माहिती आधारे यातील काही कुटुंबे किंवा त्यातील व्यक्ती कोणत्या सरकारी योजनेला पात्र आहेत, याचा अभ्यास करून त्याचा पाठपुरावा करता येईल. काही मुलांना बालसंगोपनसारखी योजना सुरू करता येईल. वंचित बालकांना शिक्षणासाठी संस्थेत ठेवता येईल. त्यांच्या समस्या कळल्या की, त्या दिशेने काम करता येईल. याची व्याप्ती वाढली की, फक्त दिवाळीचा नव्हे तर जगण्याचा आनंद वाटून घेता येईल. अनुलोमला हाताशी धरून मयुरेश पाटणकर यांच्यासारखा पत्रकार हा उपक्रम राबवताना स्वतःची दिवाळी साजरी न करता वंचितांचे चेहरे फुलवत आहे, हे पाहून छानच वाटले. हल्ली असे क्षण कमी म्हणून याचे अप्रूप आणि काही सूचना.
---
चौकट
उपेक्षित कुटुंबे पुढे आली...!
फराळ आणि फटाक्यांचे वितरण करताना गावातील प्रभावशाली व्यक्तींनाही सोबत घेण्यात आले होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, गावअध्यक्ष, देवस्थानचे विश्वस्त, सरपंच, मुंबई मंडळाचे पदाधिकारी, ग्रामसंघाचे सचिव अशा लोकांसमोर त्यांच्याच गावातील ही वंचित, कदाचित उपेक्षित कुटुंबे ठळकपणे आणली गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com