कायदे क्षेत्रात जिल्हा अग्रेसर व्हावा

कायदे क्षेत्रात जिल्हा अग्रेसर व्हावा

Published on

swt287.jpg
00974
कुडाळः व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजमध्ये अद्ययावत ई-ग्रंथालयाचे उद्घाटन करताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी. सोबत अतिरिक्त पोलिस अधीक्षक नयोमी साटम, अजित राणे, अॅड. वालावलकर, व्हिक्टर डांटस, डॉ. शिल्पा मर्गज आदी. (छायाचित्रः अजय सावंत)

कायदे क्षेत्रात जिल्हा अग्रेसर व्हावा
मनीष दळवीः कुडाळ लॉ कॉलेजमध्ये अद्ययावत ‘ई-ग्रंथालय’
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी कुडाळ लॉ कॉलेजमुळे कायदा क्षेत्रातील उच्च शिक्षण घेण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या जिल्ह्यातील या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन कायदा क्षेत्रातील ज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले विधी महाविद्यालय म्हणून ओळखले जाणाऱ्या येथील व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजमध्ये अद्ययावत, सुसज्ज ई-ग्रंथालयाचा उद्घाटन कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक वक्ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष दळवी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक नयोमी साटम, मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. नरेंद्र वालावलकर, उद्योजक अजित राणे, कॉलेज संस्थापक व्हिक्टर डांटस व प्रा. डॉ. शिल्पा मर्गज आदी उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांचा संस्थापक डांटस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उद्घाटनानंतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना कायद्याच्या क्षेत्रातील ग्रंथालयाचे महत्त्व व आजच्या काळातील इ-ग्रंथालयाचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी दळवी यांनी, आजच्या या उद्घाटन समारंभामुळे लॉ कॉलेजने आपल्या प्रवासामध्ये निश्चितच एक मोठा टप्पा गाठला आहे. याचे सर्व श्रेय संस्थापक डांटस यांनाच दिले पाहिजे, असे सांगितले. नयोमी साटम यांनी आपला यशस्वी प्रवास कथन करताना, कमी वयातच ध्येय निश्चिती करून मेहनत केल्यास यशप्राप्ती निश्चितच होते. जिल्ह्यातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी आपले प्रयत्न राहतील, अशी ग्वाही दिली.
प्रा. मर्गज यांनी प्रास्ताविक व्यक्त करताना, कोरोना काळामध्ये जगभरातील नागरिकांना विद्यार्थ्यांना ‘ई-ग्रंथालया’च्या माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मदत झाली. या सुविधेमुळे विद्यार्थी अधिकाधिक यश मिळवून नावारुपाला येतील, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमात लॉ कॉलेजचे विद्यार्थी अभिजित लोखंडे यांनी मुंबई विद्यापीठ आयोजित कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक मिळविल्याबद्दल, एलविना फर्नांडिस व पृथ्वीराज एकले यांनी बारामती लॉ कॉलेज आयोजित वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक व पृथ्वीराज एकले व सीताई राऊळ यांना मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात उल्लेखनीय कामगिरीसाठी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सूत्रसंचालन एलविना फर्नांडिस, रोझान खान, यादनिक नाबर यांनी केले. यानंतर कॉलेजच्या वतीने आयोजित केलेल्या ‘फ्रेशर्स वेलकम’ कार्यक्रमात प्रथमवर्षीय नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी सांस्कृतिक व विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com