दिव्यांग लाभार्थी तपासणी शिबिर
दिव्यांग लाभार्थी
तपासणी शिबिर
वेंगुर्ले ः येथील उपजिल्हा रुग्णालयात ७ नोव्हेंबरला सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दिव्यांग लाभार्थी पडताळणी शिबिराचे आयोजन केले आहे. विशेष सहाय्य योजनेतील ज्या लाभार्थ्यांकडे युडीआयडी कार्ड नाही, असे बहुतांश लाभार्थी मोठ्या प्रमाणात दिव्यांग असून त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन कार्ड काढणे हे शारीरिक व आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे अशा लाभार्थ्यांचे युडीआयडी कार्ड हे तालुकास्तरावर शिबिर घेऊन काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने या शिबिराचे आयोजन केले आहे. तालुक्यातील सर्वच दिव्यांग लाभार्थ्यांची पात्र-अपात्रबाबत तपासणी करण्यात येणार आहे. शिबिरापूर्वी ज्या लाभार्थ्यांकडे युडीआयडी कार्ड नाही, अशा लाभार्थ्यांची नोंदणी पोर्टलवर होणे आवश्यक आहे. या शिबिराचा तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत यांनी केले आहे.
------
घोटगे येथे शनिवारी
निमंत्रित भजन स्पर्धा
दोडामार्ग ः संतभूमी असलेल्या महाराष्ट्राच्या समृद्ध भूमीला भजन-कीर्तनाचा वारसा लाभलेला आहे. तो वारसा तरुण पिढीने पुढे नेणे गरजेचे आहे. यालाच प्रोत्साहन देण्यासाठी श्री सातेरी धारेश्वर देवस्थान मंडळ, घोटगे गेली २१ वर्षे भजन स्पर्धेचे आयोजन करीत आहे. यावर्षी सुद्धा श्री सातेरी धारेश्वर देवस्थान वार्षिक हरिनाम सप्ताहानिमित्त शनिवारी (ता. १) निमंत्रित खुल्या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम सात हजार, द्वितीय पाच हजार, तृतीय, उत्तेजनार्थ व इतर वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेत भजन मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन घोटगेवासीयांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संदीप दळवी यांच्याशी संपर्क साधावा.
----
सावंतवाडी येथे
छटपूजा उत्साहात
सावंतवाडी ः बिहार आणि उत्तर प्रदेशातील भाविकांनी येथील ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर छठपूजा मोठ्या भक्तिभावाने साजरी केली. हा पारंपरिक सण येथे स्थायिक झालेल्या परप्रांतीय बांधवांनी एकत्र येत साजरा केला. सायंकाळी उशिरा तलावाच्या काठावर महिला आणि पुरुषांनी छठमातेची पूजा केली. भाविकांनी मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्यासाठी तलावात उभे राहून पूजाविधी पूर्ण केले. छठपूजेमध्ये नदी, तलाव किंवा जलाशयाच्या पाण्यात उभे राहून सूर्यदेवाची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यानुसार तलावाचा काठ या पूजेसाठी फुलून गेला होता. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत, तर पुरुषांनीही उत्साहाने यात सहभाग घेतला.
..................
रामगड किल्ल्याने
घेतला मोकळा श्वास
मसुरे : दुर्गवीर प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागातर्फे किल्ले रामगडावर श्रमदान मोहीम राबविण्यात आली. पावसाळ्यात गडाच्या तटबंदीवर झाडीझुडपे व गवत वाढले होते. या मोहिमेत दुर्गवीरांच्या मेहनतीने मुख्य प्रवेशद्वाराला लागून असणाऱ्या आतील तटबंदीवरील सर्व झाडीझुडपे व गवत काढून तटबंदी मोकळी करण्यात आली. गडावरील चाळ्याच्या देवस्थान परिसराची साफसफाई करण्यात आली. दुर्गवीरांसोबत तनिष्क चव्हाण आणि ओवी चव्हाण यांनी सहभागी होत मोहिमेला हातभार लावला. दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे किल्ले रामगडावर अशा मोहिमा राबविल्या जातात.
---
कापडी पिशव्यांचे
तळकट येथे वाटप
दोडामार्ग ः तळकट ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करून कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. पंचायत राज अभियानांतर्गत प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा व कापडी पिशव्या वापरा, असा संदेश दिला. यापूर्वी ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा अभियानामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक, स्मार्टग्राममध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. त्याच पारितोषिकाच्या अनुदानातून या पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

