पसायदान

पसायदान

Published on

rat२९p१.jpg -
01125
धनंजय चितळे

संतांचे संगती - लोगो

इंट्रो
संत आपल्याला जे हवे ते मिळावे यापेक्षा आपल्या कल्याणाचे जे आहे ते आपल्याला मिळावे, अशीच इच्छा करतात. पसायदान हे त्या जीवाच्या कल्याणाच्या संदर्भात आहे, हे समजून घेण्यासाठी त्याचा नीट अभ्यास करण्याची आवश्यकता आहे...!
- धनंजय चितळे

------
पसायदान

जानेवारी २०२५ पासून संतांचे संगती ही लेखमाला दै. सकाळमध्ये सुरू आहे. आता त्याच्या उत्तरार्धाला प्रारंभ होत आहे. आपल्या पद्धतीप्रमाणे जेव्हा कार्यक्रमाची सांगता करावयाची असते तेव्हा पसायदान म्हटले जाते म्हणून आपणही २०२५च्या नऊ गुरूवारी पसायदानाचे चिंतन करूया. पसायदान ही नऊ ओव्यांची रचना म्हणजे ज्ञानेश्वरीचा जणू सारांशच आहे. या रचनेची महती इतकी थोर आहे की, प्रसिद्ध व्याख्याते प्रा. शिवाजीराव भोसले एका व्याख्यानात म्हणाले, जर संपूर्ण जगाचे एक राष्ट्र झाले तर त्या राष्ट्राचे राष्ट्रगीत म्हणून जगातील एकच काव्य योग्य आहे आणि ते म्हणजे पसायदान. "महाराष्ट्रातील आत्ताच्या काळातील परमार्थातील एक साक्षात्कारी व्यक्तीमत्व म्हणजे शकुंतलाताई आगटे त्यांचा एक अनुभव फार सुंदर आहे. त्यांनी आपल्या अमेरिकेतील साधकांना पसायदान म्हणायला शिकवले. एक दिवस ते पसायदान म्हणताना एक अमेरिकन बाई रडू लागली जेव्हा ताईंनी तिला विचारले,"काय झाले?" तेव्हा ती म्हणाली," मला असे वाटते की, आपण एक लहान मूल आहोत आणि एक कोणीतरी आईसारखी आकृती आपल्याला पोटाशी धरून आपल्या डोक्यावरून हात फिरवत आहे. बऱ्याचवेळा या पसायदानातील जो जे वांछील तो ते लाहो। या ओवीचा चुकीचा अर्थ घेतो आणि आपल्याला जे हवे ते आपल्याला मिळावे, असे श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात असे मानून बसतो. खरं सांगायचं तर संत आपल्याला जे हवे ते मिळावे यापेक्षा आपल्या कल्याणाचे जे आहे ते आपल्याला मिळावे, अशीच इच्छा करतात. पसायदानातील ही ओळ त्या जीवाच्या कल्याणाच्या संदर्भातच आहे हे समजून घेण्यासाठी पसायदानाचाही नीट अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. आज दुर्दैवाने कार्यक्रम संपल्याची खूण म्हणजे पसायदान आता घरी जायला हरकत नाही अशाच दृष्टीने आपण या रचनेकडे पाहतो. तिचा गांभीर्याने विचारच करत नाही. आपण मात्र पुढील लेखांमध्ये पसायदानाचा नीट अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. तत्पूर्वी श्री ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार करूया.
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र।
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र।
तया आठविता महा पुण्यराशी।
नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वरांसी।। श्री ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला श्री ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अत्यंत अद्भुत ग्रंथ आहे. या ग्रंथात नाही असा कोणताही विषय नाही. श्रीमद् भगवद्गीतेच्या १८ अध्यायांवर श्री ज्ञानेश्वर माऊलींनी सोप्या मराठी भाषेत केलेली टीका. (टीका म्हणजे त्या ग्रंथात जे सांगितले आहे ते उलगडून सांगणे.) म्हणजे भावार्थ दीपिका अर्थात् श्री ज्ञानेश्वरी! गीतेच्या शेवटच्या श्लोकावरील विवेचन पूर्ण झाल्यानंतर ग्रंथाचा समारोप करताना श्री ज्ञानेश्वर माऊली आपल्या सद्गुरूंची प्रार्थना करतात आणि म्हणतात, किंबहुना तुमचें केलें। धर्मकीर्तन हे सिद्धीस गेले। येथ जी माझे उरले। पाईकपण।। आणि यानंतर ते सद्गुरूंकडेची प्रार्थना करतात ती म्हणजे पसायदान पुढील गुरूवारी त्याचा अधिक विचार करूया.

(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com