रत्नागिरी ः गवाणकर यांनी रापण व्यवसाय पुन्हा सुरू केला

रत्नागिरी ः गवाणकर यांनी रापण व्यवसाय पुन्हा सुरू केला

Published on

गवाणकर यांनी रापण व्यवसाय पुन्हा सुरू केला
माडबनवासियांनी जागवल्या आठवणी; कोरोनात गावी होते वास्तव्य
राजेंद्र बाईतः सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २९ः तालुक्यातील माडबन येथील बंद पडलेला रापण व्यवसाय कोरोना काळात वास्तव्याला आलेल्या गंगाराम गवाणकर यांनी गावकऱ्यांच्या साथीने एकजुटीने सुमारे पन्नास वर्षानंतर पुन्हा सुरू केला. केवळ रापण व्यवसाय सुरू केला असे नाही तर या व्यवसायाला संघटनात्मक बळकटी देण्यासाठी मच्छीमार संस्थेचीही स्थापना केली, अशी ज्येष्ठ नाटककार वस्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्याविषयीची आठवण माडबनवासियांकडून व्यक्त केली गेली.
ज्येष्ठ नाटककार गवाणकर यांचे २७ रोजी मुंबईत निधन झाले. नाट्यक्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला गेला. गंगाराम गवाणकर हे मूळचे राजापूर तालुक्यातील माडबन येथील. त्यांनी कोकणची मालवणी भाषा सातासमुद्रापार पोहचवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. ते बहुतांशी मुंबईत वास्तव्याला असले तरीही गावाला कधीच विसरलेले नव्हते. त्यांच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर माडबनवासियांकडून दुःख व्यक्त करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
मालवणी भाषेतील वस्त्रहरण नाटकाने जगभरातील रंगमंचावर आपला डंका वाजवला. त्यात अनेक नामवंत कलाकारांनी आपल्या अभिनय कौशल्याचा ठसा उमटवला. असे असले तरीही स्थानिक कलाकारांनाही आपला अभिनय दाखवण्याची संधी मिळायला हवी, अशी त्यांची धारणा होती. त्यातून त्यांनी माडबन गावातील स्थानिक मुलांच्या संचातील ‘संगीत वस्त्रहरण’ या नाटकाची मुहूर्तमेढ रोवली. या नाटकात माडबन गावातील तरुण-तरुणींसह स्थानिक कलाकारांना संधी दिली.
स्थानिक पातळीवर त्याचे विविध यशस्वी प्रयोग झाल्यानंतर मुंबईतील प्रसिद्ध रवींद्र नाट्यमंदिरमध्ये या नाटकाचा ‘हाऊसफुल्ल’ प्रयोग झाला. कोरोना काळात श्रीदेव विठ्ठल-भक्त पुंडलिक यांच्यातील अनोखे विश्‍वासपूर्ण नातेसंबंधाच्या आशयावर आधारित संगीत विठ्ठल-विठ्ठल या नाटकाचे त्यांनी लेखन केले. स्थानिक कलाकारांचा समावेश असलेल्या या नाटकाचे श्रीदेव गोपाळकृष्ण नाट्यमंडळाच्या माध्यमातून राजापूर, सोलापूरसह थेट श्रीक्षेत्र पंढरपूर येथेही हाऊसफुल्ल नाट्यप्रयोग झाले. गावात मोलमजुरी करणारा नव्हे तर, गडग्यावर काम करणार्‍या माणसामध्येही अभिनय कला असते, हे त्यांनी या नाटकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने साऱ्यांना दाखवून दिले.
माडबन येथे सुमारे पन्नास वर्षापूर्वी सांघिक पद्धतीने रापण व्यवसाय सुरू होता. कालपरत्वे हा व्यवसाय बंद पडला. रापण व्यवसायाशी गंगाराम गवाणकर यांच्या बालपणीच्या आठवणी जोडलेल्या होत्या. त्यामुळे कोरोना काळाच वास्तव्याला असताना त्यांनी गावकऱ्यांच्या साथीने सांघिक रापण व्यवसाय पुन्हा सुरू केला तसेच पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघ, मिठगवाणेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना एकत्र करून विविध उपक्रमही त्यांनी राबवले, अशा आठवणी निकटवर्तियांनी मांडल्या.

कोट १
माडबनच्या समुद्रकिनाऱ्यावरील घरात वस्त्रहरणकार नानांचं (गंगाराम गवाणकर) बालपण गेलं. मालवणी भाषा सातासमुद्रापार नेणारे नाना यांच्या अनेक आठवणी त्या घरामध्ये दडलेल्या आहेत. दैनंदिन जीवनासाठी आवश्यक वस्तू कमी आणि विविध पुस्तके, विविध पुरस्कार, सन्मानचित्र यांचाच भरणा आहे. त्यांचे घर म्हणजे एक प्रकारचा रंगमंचच म्हणावा लागेल. त्यामुळे घरातील त्यांच्या स्मृतींचे जतन करताना त्यांच्या कुटुंबीयांच्या संमतीने स्मारक उभारले जावे. तसे झाल्यास निश्‍चितच भविष्यात भावी पिढीला अजरामर वस्त्रहरणकार अनुभवता येणार आहेत. त्यांचे स्मारक झाल्यास हीच त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.
- राजन लाड, कलाकार, जैतापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com