उड्डाणपूल झाला; पण जोडरस्तेच नाहीत!

उड्डाणपूल झाला; पण जोडरस्तेच नाहीत!

Published on

01209
हळवल ः येथील रेल्‍वे मार्गावर २०१२ मध्ये उड्डाणपूल बांधून झाला; मात्र जोडरस्ता अद्याप झालेला नाही.
01210
हळवल ः येथील रेल्वे फाटकावर सातत्याने वाहनांचा खोळंबा होत आहे.

उड्डाणपूल झाला; पण जोडरस्तेच नाहीत!

हळवलची तेरा वर्षांची समस्या; लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २९ ः कणकवली-कळसुली, शिवडाव मार्गावरील हळवल येथे रेल्‍वे फाटक असल्‍याने वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत होता. यावर पर्याय म्‍हणून २०१२ मध्ये हळवल येथील रेल्‍वे मार्गावर उड्डाणपुलाची उभारणी केली; मात्र गेल्या १३ वर्षांत या पुलाच्या दोन्ही बाजूंनी जोडरस्ते झालेले नाहीत. त्‍यामुळे उड्डाणपुलाची उभारणी झाली तरी या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा कायम राहिला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून याबाबत पाठपुरावा होत नसल्‍याचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
कणकवली ते कळसुली, शिवडाव या मार्गाला कसवण, तळवडे, आंब्रड, बोर्डवे, शिरवल, दारिस्ते, कुपवडे, वागदे आदी गावे जोडलेली आहेत. रोज शेकडो वाहनांची या मार्गावर वर्दळ असते, तर कोकण रेल्‍वे मार्गावर दिवसाला ४८ गाड्या धावत असल्‍याने प्रत्‍येक २० मिनिटांनी येथील रेल्‍वे फाटक पंधरा ते वीस मिनिटे बंद राहते. त्‍याचा मोठा फटका या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना, वाहनचालकांना सहन करावा लागतो. त्‍यामुळे हळवल रेल्‍वे फाटक येथे उड्डाणपूल व्हावा, यासाठी २००९ पासून आंदोलने छेडली होती. त्‍याची दखल घेत रेल्‍वे प्रशासनाने २०१२ मध्ये हळवल रेल्‍वे फाटकपासून काही अंतरावर उड्डाणपुलाची उभारणी केली. या पुलाच्या दोन्ही बाजूंनी जोडरस्ते करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्‍याकडे आली; मात्र येथील जोडरस्त्यांची जागा संपादन करण्यात सार्वजनिक बांधकाम खात्‍याला गेल्‍या १३ वर्षांत यश आलेले नाही.
हळवल उड्डाणपूल जोडरस्त्याच्या भूसंपादनासाठी २०१५-१६ मध्ये ८० लाखांच्या निधीची तरतूद शासनाने केली. तसेच जोडरस्त्याच्या पश्‍चिम बाजूचे काम सुरू करण्यात आले. यावेळी तेथील जोडरस्त्याचा आराखडा चुकीचा असल्‍याची बाब समोर आली. त्‍या आराखड्यानुसार अवजड वाहने रस्त्यावरून पलटी होण्याची शक्‍यता होती. त्‍यामुळे तत्‍कालीन अधीक्षक अभियंत्‍यांनी रस्त्याचा आराखडा बदलण्याची सूचना केली. त्‍यामुळे निधी असूनही त्‍यावेळी रस्ता भूसंपादनाचे काम लांबणीवर पडले. दरम्‍यान, २०१८-१९ च्या अर्थसंकल्‍पात जोडरस्ता कामासाठी ५ कोटींची तरतूद केली, तर २०१९ मध्ये बांधकाम विभागाने नवीन रस्त्याचा आराखडा तयार करण्यासाठी एका एजन्सीची नियुक्‍ती केली. या एजन्सीने हळवल उड्डाणपूल ते सध्याचे हळवल येथील सार्वजनिक बांधकामचे कार्यालय या दरम्‍यान सुमारे ९०० मीटरचा नवा रस्ता आराखडा तयार केला. यामध्ये खासगी क्षेत्रातील ११८ गुंठे जागेचे भूसंपादन करणे आवश्‍यक झाले. त्‍यानुसार तत्‍कालीन प्रांताधिकारी तथा भूसंपादन अधिकारी वैशाली राजमाने यांनी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली. यात जमीन मालकांना ७५ हजार रुपये प्रतिगुंठा असा दर निश्‍चित करण्यात आला, परंतु जमीन मालकांनी दीड लाख रुपये प्रतिगुंठा देण्याची मागणी केली. शासन आणि जमीन मालक यांच्यात कोणताही तोडगा न निघाल्‍याने वाटाघाटीद्वारे भूसंपादनाची प्रक्रिया रद्द करण्यात आली आणि हळवल जोडरस्त्याचे काम पुन्हा लांबणीवर पडले.
सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे कार्यकारी अभियंता म्‍हणून अजयकुमार सर्वगोड यांनी दोन वर्षांपूर्वी कार्यभार स्वीकारला. त्‍यानंतर हळवल उड्डाणपूल जोडरस्ता तयार करण्याच्या कामाला गती आली होती. सार्वजनिक बांधकाम खात्‍याने पुन्हा एक एजन्सी नेमून पर्यायी उड्डाणपूल जोडरस्त्याचा आराखडा तयार केला होता. यात उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी रस्ते तयार करणे, त्‍याचप्रमाणे सध्या रेल्‍वे फाटक असलेल्‍या ठिकाणी भूमिगत रस्ता बांधणे यासाठी ३२ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला. हा आराखडा शासनाकडे पाठविण्यातही आला; मात्र अवघ्या दीड किलोमीटर रस्त्यासाठी ३२ कोटी रुपये होणार असल्‍याने राज्‍य शासनाकडून या निधीला मंजुरी मिळाली नाही.
सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंता पदावर दोन महिन्यांपूर्वी दिनेशकुमार बागुल यांची नियुक्‍ती झाली आहे. त्‍यांनी कार्यभार स्वीकारल्‍यानंतर लगेचच हळवल उड्डाणपूल जोडरस्त्याचा नवा आराखडा तयार करण्यासाठी एजन्सीकडे पत्रव्यवहार सुरू केला, परंतु या एजन्सीकडून गेल्‍या महिन्याभरात कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्‍याचे बांधकामकडून स्पष्‍ट करण्यात आले. एकूणच रेल्‍वे मार्गावर हळवल उड्डाणपूल उभारणीनंतरच्या १३ वर्षांत भूसंपादनाचा प्रश्‍न सुटत नसल्‍याने जोडरस्ता रखडला आहे. उड्डाणपूल उभारणीपूर्वी कणकवलीसह हळवल, शिरवल तसेच इतर गावांतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलने केली होती. उड्डाणपूल उभारणीनंतर ही आंदोलने थंडावली. त्‍यामुळे लोकप्रतिनिधींनी हा प्रश्‍न सोडविण्याकडे दुर्लक्ष केल्‍याचे दिसून येत आहे.
-----------------------
काही महत्त्वाचे...
* २०१२ मध्ये उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण
* भूसंपादन रखडल्‍याने जोडरस्ता नाही
* वारंवार रेल्‍वे फाटक बंद होत असल्‍याने वाहतुकीचा खोळंबा
* वयोवृद्ध, आजारी रुग्णांना अडचण
* भूसंपादनाला ५ कोटींची तरतूद
-----------------------
हळवल येथे रेल्वेचे उड्डाणपूल पूर्ण झाले आहे. त्या पुलाला जोडणारा रस्ता कमीत कमी जागा संपादन करून तयार व्हावा, यासाठी आमचे प्रयत्‍न सुरू आहेत. त्‍याअनुषंगाने रस्ता आराखडा करण्यासाठी खासगी एजन्सी नेमली जाणार आहे. पूर्वी आराखडा तयार केलेल्‍या कंपनीने जोडरस्त्याचे नवीन सर्वेक्षण करावे, यासाठी आम्‍ही प्रयत्‍न करत आहोत. तसेच हळवल जोडरस्त्याबाबत मंत्रालय पातळीवर लवकरच बैठक घेऊन हा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत.
- दिनेशकुमार बागुल, कार्यकारी अभियंता
-------------------------
हळवल फाटकपासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर उपजिल्‍हा रुग्‍णालय आहे. तसेच खासगी रुग्‍णालयेही आहेत. मात्र, वारंवार रेल्‍वे फाटक बंद होत असल्‍याने अत्यवस्थ रुग्‍णांनाही पंधरा ते वीस मिनिटे खोळंबून राहावे लागते. रेल्‍वे फाटकाच्या एका बाजूला गडनदी आहे, तर दुसऱ्या बाजूनेही पर्यायी रस्ता नसल्‍याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
- अजय पवार, नागरिक, दारिस्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com