मालवणात आज काँग्रेसची बैठक
मालवणात आज
काँग्रेसची बैठक
मालवण : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसच्या मालवण तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक उद्या (ता. ३०) सायंकाळी चारला शहरातील बाजारपेठेतील हॉटेल मालवणी हेरिटेज येथे आयोजित केली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत या निवडणुकांबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीद्वारे पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना निवडणुकीबाबत माहिती देणे तसेच विविध मतदारसंघात इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज मागवून घेण्याबाबत ही बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस मालवण तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस यांनी केले आहे.
---
मालवणात १० नोव्हेंबरला
ज्येष्ठ नागरिकांची सभा
मालवण : येथील ज्येष्ठ नागरिक संघाची ९ नोव्हेंबरला होणारी नियोजित सभा व स्नेहभोजन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. ही सभा १० नोव्हेंबरला सायंकाळी साडेचारला लिलांजली हॉल, भरड येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनी होणार आहे. या सभेत नुकतेच निधन झालेल्या संघाच्या सदस्या अनुपमा म्हापणकर यांना श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे. सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष यांनी केले आहे.
---
विद्यार्थ्यांनी साकारली
प्रतापगडाची प्रतिकृती
लांजा ः शहरातील कस्तुरबा गांधी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन प्रतापगड किल्ल्याची देखणी प्रतिकृती साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवणे यामध्ये शिवकालीन किल्ल्याची ही प्रतिकृती विद्यार्थ्यांनी साकारली आहे. यात किल्ल्याचे प्रवेशद्वार, बुरूज, तोफ, तटबंदी आणि दरवाजा यांचे बारकावे अचूकपणे दर्शवण्यात आले आहेत. किल्ल्याच्या सजावटीसाठी माती, कागद, थर्माकोल, रंगीत कागद आणि नैसर्गिक वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. कागद, पुठ्ठ्यांपासून नक्षीकाम, कलाकुसरीच्या वस्तू तयार करून त्याची विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती दिली.
----
मृदुला पाटील
तायक्वांदो संघात
रत्नागिरी : रत्नागिरीतील एस. आर. के. तायक्वांदो क्लबची खेळाडू मृदुला पाटील हिची तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. तिने चिपळूण येथे नुकत्याच पार पडलेल्या ३५व्या ज्युनिअर अजिंक्यपद राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत १७ वर्षांखालील ४९ किलो वजनगटात सुवर्णपदक जिंकून हे स्थान निश्चित केले. मृदुलाच्या या नेत्रदीपक यशामुळे तिची निवड ४२व्या राष्ट्रीय तायक्वांदो ज्युनिअर क्युरोगी चॅम्पियनशिप २०२५ या स्पर्धेसाठी झाली आहे. कर्नाटक तायक्वांदो असोसिएशन यांच्या सहकार्याने कोरमंगलम इनडोअर स्टेडियम, बंगलोर (कर्नाटक) येथे ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत ही राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे. यासाठी महाराष्ट्र संघ २९ ऑक्टोबरला रवाना होणार आहे. तिला पंच व प्रशिक्षक शाहरुख शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
---
गुरांचा ताबा घेण्यास
मालकांचे दुर्लक्ष
राजापूर ः मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर होत असून, महामार्गावरच नव्हे तर राजापूरमध्ये ठिकठिकाणी अपघात होत आहेत. हे टाळण्यासाठी राजापूर पालिकेने शहरात फिरणाऱ्या मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम हाती घेतली. सहा गुरे पकडून त्यांची रवानगी कोंडवाड्यात केली गेली; मात्र त्यांना सोडवण्यासाठी गुरांचे मालकच फिरकले नसल्याने हा प्रश्न सोडवायचा कसा, ही चिंता पालिकेपुढे निर्माण झालेली आहे.
गेल्या काही वर्षांपासून राजापूर शहरवासियांना सतत मोकाट गुरांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाहनांच्या वर्दळीत भररस्त्यांमध्ये ठाण मांडून बसलेल्या मोकाट गुरांमुळे अपघातही घडले आहेत. यामध्ये मोकाट गुरेही दगावली आहेत.
---
नऊ नोव्हेंबरपर्यंत
मनाई आदेश
रत्नागिरी ः जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ९ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिला आहे. जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा क्र. ६६ चे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन केली जातात. अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. सध्या ओबीसी व मराठा आरक्षणावर दोन समाजांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यावरून आंदोलन होण्याची शक्यता आहे. दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर शुल्लक कारणांवरून वाद होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनाई आदेश जारी केला आहे.
---
मालवणात रविवारी
सेवानिवृत्तांची सभा
मालवण : तालुका निवृत्त सेवक संघाची मासिक सभा रविवारी (ता. २) सायंकाळी ५ वाजता टोपीवाला हायस्कूल येथे होणार आहे. सर्व सदस्यांनी सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष अजित गवंडे, सचिव दामोदर गवई यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

