नौका बंदरात; मासळीची आवक मंदावली
01261
नौका बंदरात; मासळीची आवक मंदावली
मासेमारी ठप्प; अवकाळी पावसाचा सर्वच क्षेत्रांना फटका
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २९ ः तालुक्याच्या किनारी भागात परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे मासेमारी ठप्प झाल्याने स्थानिक बाजारातील मासळीची आवक घटली आहे. त्यामुळे दीवाळी सुटीत आलेल्या पर्यटकांना मासळीचा मनमुराद आस्वाद घेण्यात अडचणी जाणवत आहेत. बाजारातील उपलब्ध मासळीचे भाव वधारल्याने पर्यटकांच्या खिशालाही कात्री लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
किनारी भागातील वातावरण पावसाळी असून अधूनमधून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. पावसामुळे वातावरणात चांगलाच गारठा पसरला आहे. परतीच्या लांबलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. दीवाळी सणातच पावसाने जोर धरल्याने सणाची मजा घेण्यातही अडचणी जाणवल्या. वादळी वारा आणि पाऊस यामुळे समुद्रातील वातावरण खराब झाल्याने मच्छीमारी नौका बंदरात थांबून आहेत. स्थानिक मासेमारीही थंडावल्याने बाजारातील मासळीची आवक मंदावली आहे. सध्या शाळा, महाविद्यालयाला सुटी असल्याने पर्यटकांची किनारी भागात धाव आहे. मात्र, पावसामुळे पर्यटकांना म्हणावा तसा आनंद घेता येत नाही, अशी स्थिती आहे. मासळीचा आस्वाद घेण्यामध्येही त्यांना अडचणी जाणवत आहेत. येथील निसर्गसौंदर्याबरोबरच मासळीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक किनारी भागात येत असतात. मात्र, पावसामुळे मासळीचे प्रमाण घटल्याने पर्यटकांना मासळी मिळण्यावर मर्यादा आहेत. तसेच उपलब्ध मासळीचे दर वधारल्याने त्याचाही परिणाम पर्यटनावर होऊ शकतो. समुद्रातील वातावरण केव्हा निवळणार? याची मच्छीमार वाट पहात आहे. बंदर नौकांनी भरले असून वातावरण पूर्णतः निवळल्याशिवाय मच्छीमारी पुर्ववत होण्याची शक्यता कमी आहे.
.........................
‘आंबा पिकवणे’ची चिंता
भातशेतीचे गवत सुकुन पावसापासून ते सुरक्षित ठेवता आले नाही तर आंबा हंगामात नैसर्गिक पद्धतीने आंबा पिकवण्यासाठी गवत उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. जमिनीवर उगवणारे गवत आंबा पिकवण्याठी वापरले जाते. मात्र, त्याच्यामध्ये तुलनेत उबदारपणा कमी असल्याने आंबे पिकण्यास विलंब लागतो. तसेच दीवाळीनंतर कडक ऊनामुळे जमिनीवर उगवलेले गवत सुकुन ते कापून गुरांसाठी तसेच आंबा हंगामासाठी कापून ठेवले जाते. मात्र, सध्याच्या पावसामुळे गवत कुजून जाण्याचीही भीती आहे.
---
गुरांच्या सुक्या चाऱ्याचा प्रश्न
पावसामुळे भात कापणीमध्ये अडचणी आहेत. कापलेले भात तातडीने झोडणी करावी लागत आहे. मात्र, गवत सुकवण्यासाठी पुरेसा सुर्यप्रकाश नसल्याने गवताची नासाडी शक्य आहे. तसे झाल्यास गुरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. तालुक्याचा बहुतांशी भाग कातळाचा असल्याने पावसानंतर गवताचे प्रमाण कमी असते. पर्यायाने गुरांना चारा उपलब्ध होत नाही. अशावेळी गुरांना भातशेतीच्या गवताचा आधार असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

