रत्नागिरी ः जिल्ह्यातील वाळू गटांच्या लिलावाचा मोठा पेच

रत्नागिरी ः जिल्ह्यातील वाळू गटांच्या लिलावाचा मोठा पेच

Published on

जिल्ह्यात वाळू गटांच्या लिलावाचा पेच
पाच वेळा निविदेला नाही प्रतिसाद ; २३ कोटी ८० लाखांचा महसूल अडकून
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : जिल्ह्यातील वाळू गटांच्या लिलावाचा मोठा पेच निर्माण झाला. एकदा, दोनदा नव्हे तर पाच वेळा निविदा प्रक्रिया करून त्याला प्रतिसाद मिळत नाही. वाळू व्यावसायिकांनी लिलाव प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याने महसूल विभाग स्वामित्वधनाच्या दृष्टीने आर्थिक संकटात आला आहे. ड्रेजरने वाळू उपसा करण्यासाठी २२ गटांपैकी सहा गटांचाच लिलाव झाला. १६ गटांकडे मात्र वाळू व्यावसायिकांनी पाठ फिरविली आहे. जिल्हा प्रशासनाला सहा गटांतील वाळू लिलावातून जवळपास आठ कोटींचा महसूल मिळाला असून, एक लाख ३१ हजारांहून अधिक ब्रास वाळू उपसा होणार आहे; परंतु १६ गटांचा लिलाव रखडल्याने २३ कोटी ८० लाखांचा महसूल अडकला आहे.
जिल्ह्यातील दाभोळ, जयगड, बाणकोट या तीन खाड्यांमधील विविध भागांमधून वाळू उपसा करण्यात येतो. यात हातपाटी व ड्रेजर गटांचा समावेश आहे. काही भागांमध्ये हातपाटीला परवानगी देण्यात येते, तर काही ठिकाणी ड्रेजरने वाळू उपशासाठी प्रशासनातर्फे परवानगी देण्यात येते. जिल्ह्यातील या प्रमुख खाड्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून हायड्रोग्राफी सर्व्‍हे करून ठिकाणे ड्रेजरमार्फत वाळू उत्खननासाठी निश्चित केली आहेत. यातील जयगड खाडीत ९, दाभोळ खाडीत १०, बाणकोट खाडीमध्ये ३ गट निश्चित केले होते. या सर्व ठिकाणी लिलावही पुकारले; मात्र उत्खननासाठी व्यावसायिकांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे.
वाळू उत्खननाबाबत सहा वेळा निविदा प्रक्रिया राबविली. त्यावेळी २२ पैकी सहा गटांसाठी लिलावाला प्रतिसाद मिळाला. यात ड्रेजरने उत्खननासाठी जयगडमध्ये १, दाभोळमध्ये ४, तर बाणकोट खाडीत १ अशा गटांना प्रतिसाद मिळाला. रॉयल्टीच्या माध्यमातून सात कोटी ९६ लाख ७० हजार ६६७ रुपयांचा महसूल जिल्हा प्रशासनाला मिळाला आहे. या सहा गटांत एक लाख ३१ हजार ७५५ ब्रास वाळू उपशाला परवानगी देण्यात आली आहे. ही मुदत तीन वर्षांसाठी असून, ९ जूनपर्यंत वाळू उपसा संबंधितांना करता येणार आहे. उर्वरित १६ वाळू गटांमध्ये तीन लाख ९६ हजार ६७० ब्रास वाळूचा साठा खाड्यांमध्ये उपलब्ध आहे. यासाठी प्रशासनाने लिलावासाठी २३ कोटी ८० लाख दोन हजार इतकी रक्कम निश्चित केली आहे. वेगवेगळ्या गटांसाठी प्रत्येकी वेगळी रक्कम असून, त्यावर लिलाव पुकारला होता; परंतु व्यावसायिकांकडून प्रतिसाद मिळाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com