रत्नागिरी ः ''मोथा'' चक्रीवादळामुळे कोकणात पाऊस
‘मोंथा’मुळे कोकणात भाताचा गुंता
पावसामुळे शेतीची हानी ः वाऱ्यामुळे मासेमारी नौका बंदरात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, २९ : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर दिसत आहे. बुधवारी दुपारनंतर वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाने भातशेतीला फटका बसला आहे. किनारपट्टीवर सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील सर्वच मासेमारी नौका बंदरात उभ्या राहिल्यामुळे मासेमारी पूर्णतः ठप्प झाली आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात वादळसदृश स्थिती उद्भवेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याप्रमाणे बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात सातत्याने बदल घडत आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळाचा परिणाम कमी-अधिक प्रमाणात कोकण किनारपट्टीवर दिसत आहे. मागील आठवडाभर कोकण किनारपट्टीवर वेगवान वाऱ्यासह पावसाने हजेरी लावलेली आहे. काल (ता. २८) एक दिवस विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी निःश्वास सोडला होता. कापून ठेवलेले भात सुकवून गोळा करून ते सुरक्षित ठेवले. त्यानंतर आज सकाळी कापणीला सुरुवात केली. मात्र, दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार झाले.
समुद्र खवळला असून, उंचच लाटा उसळत आहेत. त्यामुळे मिरकरवाडा, जयगड, हर्णै, साखरीनाट्ये, काळबादेवी आदी बंदरात शेकडो नौकांचा मुक्काम वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून या नौका समुद्रातील वादळसदृश स्थितीमुळे आश्रयास आहेत. त्या माघारी जाण्यापूर्वीच पुन्हा समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाल्याने हवामान विभागाने खोल समुद्रात मासेमारीस न जाण्याच्या सूचना केल्या आहेत, तसेच किनारपट्टी भागातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन केले आहे. बंदरांमध्ये गुजरात, डहाणू, मालवण आदी भागांतील नौकादेखील आश्रयास आहेत. समुद्रातील वातावरण पूर्णतः निवळल्यानंतरच खोल समुद्रातील मासेमारी सुरू होईल, असे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले.
अनेक ठिकाणी पीक आडवे
जिल्ह्यातील खरीप हंगामातील भात, नाचणी पीक कापण्यासाठी तयार आहे. ग्रामीण भागात भातकापणी सुरू झाली आहे; परंतु या अवकाळी पावसामुळे कापलेले भात शेतातच भिजत आहे. अनेक ठिकाणी पीक आडवे झाले आहे. १ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील १७० गावांतील १७४.२० हेक्टर क्षेत्रावरील पीक बाधित झाले आहे. यामध्ये सुमारे पावणेसोळा लाखांचे नुकसान झाले आहे. आजदेखील दिवसभर मळभी वातावरण होते. सायंकाळी पुन्हा पाऊस सुरू झाला. त्यामुळे मच्छीमार, शेतकरी आणि व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

