पुस्तकं सातत्याने वाचली पाहिजेत

पुस्तकं सातत्याने वाचली पाहिजेत

Published on

पुस्तकं सातत्याने वाचली पाहिजेत
डॉ. साखळकर ः गो. जो. महाविद्यालयात भेट म्हणून ‘पुस्तक’
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : वाचन ही सतत चालणारी प्रक्रिया असून, आपण विविध प्रकारची आणि विविध विषयांना वाहिलेली पुस्तके सातत्याने वाचली पाहिजेत. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये भेट म्हणून ‘पुस्तक’ देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. जेणेकरून वाचनाला खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.
महाविद्यालयाच्या (कै.) बाबुराव जोशी ग्रंथालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ''घेऊया एकच वसा मराठीला बनवूया ज्ञानभाषा'' या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम सादर झाला. यात भारतरत्न डॉ. कलाम यांची आणि त्यांच्यावर आधारित पुस्तके आणि विज्ञानविषयक पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन आयोजित केले.
प्रास्ताविकामध्ये ग्रंथपाल किरण धांडोरे यांनी ग्रंथालयाचे वर्षभर चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. वाचनाला प्रवृत्त करणारी विविध विषयांना वाहिलेली आणि विविध विशेष दिवसांचे औचित्य साधून आयोजित केली जाणारी ग्रंथप्रदर्शने विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा देणारी ठरतात, असा आशावाद व्यक्त केला. त्यानंतर ग्रंथ अभिवाचन- एक कला या विषयावर प्रा. वैभव कानिटकर यांनी सांगितले की, वाचनाची सवय लागल्यावर ग्रंथ अभिवाचन अधिक प्रोत्साहित करते. काळ कितीही बदलला तरी चांगले वाचन व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी महत्त्वाचे आहे. वाचनातील आवड आणि सातत्य आपल्यामध्ये आमूलाग्र बदल घडवते. ग्रंथ अभिवाचन ही कला आहे. वाचनवेग, आवाजातील चढ-उतार, शब्दफेक, श्वासावरील नियंत्रण या घटकांना अनुसरून आपण लेखकाच्या भावना समजून घेऊन त्याचे साहित्यातील विचार अभिवाचनाच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
कार्यक्रमाला ग्रंथपाल किरण धांडोरे, उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, ग्रंथालय समितीच्या समन्वयक डॉ. कल्पना आठल्ये, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, डॉ. शाहू मधाळे, डॉ. आनंद आंबेकर, डॉ. शिवराज गोपाळे, प्रा. महेश नाईक, प्रा. वैभव कानिटकर, प्रा. प्रभात कोकजे, सहायक ग्रंथपाल उत्पल वाकडे आदी उपस्थित होते.
---
चौकट १
विजेत्यांचा सत्कार
श्रीमान मंगेश बापूजी तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालय आयोजित ग्रंथ अभिवाचन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेले विद्यार्थी वीणा काळे, वैदेही वैद्य, अर्पिता बापट, स्वरदा केळकर, श्रीया केळकर, श्रावणी खांडेकर आणि ओंकार आठवले याने आंतरमहाविद्यालयीन विद्यापीठ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ग्रंथभेट देऊन गौरवण्यात आले तसेच या वेळी जान्हवी जोशी, वृषाली कोवळे, सेजल मेस्त्री आदींनी उत्तम पद्धतीने ग्रंथ अभिवाचन कला सादर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com