विजय रानडे यांचा संगीत प्रवास प्रेरणादायी

विजय रानडे यांचा संगीत प्रवास प्रेरणादायी

Published on

- rat30p2.jpg-
P25O01316
गोळप कट्ट्यावरील मुलाखतीत मार्गदर्शन करताना विजय रानडे.

विजय रानडे यांचा संगीतप्रवास प्रेरणादायी
गोळप कट्ट्यावरील मुलाखत; परीक्षा केंद्र सुरू ठेवण्यासाठीची धडपड
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ३० ः वडील विनायकबुवा रानडे यांच्याकडून तबला आणि हार्मोनिअमचे तर काका भालचंद्रबुवा रानडे यांच्याकडून गायनाचे शिक्षण घेतले. बाबा-काकांनी रत्नागिरीमध्ये सुरू केलेले परीक्षा केंद्र सुरू राहावे, यासाठी हार्मोनिअमच्या परीक्षा दिल्या आणि विद्यालय सुरू राहण्यासाठी मुलांना शिकवण्यास सुरुवात केली. कालांतराने विशारद पदवी प्राप्त केल्यानंतरच या केंद्राला गती प्राप्त झाली, असे रत्नागिरीतील तबला गायन विशारद व रत्नागिरीतील पहिले हार्मोनिअम अलंकार असलेले विजय रानडे यांनी सांगितले.
गोळपकट्टा कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी रानडे यांनी आपला संगीतक्षेत्रातील प्रवास मांडला. ते म्हणाले, आमचं मूळ गाव गुहागर तालुक्यात पाचेरीसडा. आजोबा गायक आणि कीर्तनकार होते. पुढे माझे बाबा आणि काका रत्नागिरीत राहायला आले. त्यांनी १८ ऑक्टोबर १९४४ या दिवशी कोकणातील पहिलं संगीत विद्यालय सुरू केले. आज विद्यालयाला ८२ वर्षे पूर्ण झाली आहेत. रत्नागिरीत परीक्षा केंद्र होते आणि ते सुरू राहावे यासाठी बाबा, काका व हिरेमठ हे विद्यार्थी जमवत आणि परीक्षेला बसवत. पस्तीस परीक्षार्थी असतील तरच रत्नागिरी केंद्र सुरू राहील, अशी स्थिती होती. प्रतिकूल परिस्थितीतही हे केंद्र त्यांनी सुरू ठेवले. हे केंद्र सुरू रहावे यासाठी मी हार्मोनिअमच्या तीन परीक्षा दिल्या. ९०ला माझी दहावी झाली आणि बाबा खूप आजारी होते, अंथरुणाला खिळले होते. विद्यालय सुरू राहावे म्हणून मी त्या वेळी विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. १९९४ मध्ये मी तबला विशारद झालो आणि त्यानंतर हार्मोनिअमची चौथी परीक्षा दिली. १९९६ ला विशारद झालो. वीस वर्षांनी २०१६ मध्ये अलंकार झालो. कारण, त्या काळात अलंकार असलेल्या गुरूंची फॉर्मवर सही लागत असे आणि इकडे तसं कोणीही नव्हते. पुढे नियम बदलला आणि मी कोल्हापूर येथे परीक्षा देऊन अलंकार झालो. २००१ ला खल्वायन संस्था संगीत नाट्यस्पर्धेसाठी डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेलं संगीत घन अमृताचा हे नाटक सादर होणार होते. त्यानंतर २००३ला पुन्हा एकदा डॉ. श्रीकृष्ण जोशी लिखित सं. शांतिब्रह्म हे नाटक खल्वायन संस्थेने स्पर्धेत सादर केले. त्यातही सगळ्या गाण्यांच्या उत्तम चाली बांधल्या होत्या. नाटकाला मी संगीत दिलं होतं शिवाय साथही केली होती. या नाटकात इतिहास घडला. नाटक स्पर्धेत पहिले आले. १९७४ नंतर पहिल्यांदा मला संगीतकार आणि ऑर्गनवादक अशी दोन बक्षिसे मिळाली, असे त्यांनी सांगितले.
-----
चौकट
अशी लागली मुलांना संगीताची गोडी
गंगाधर भाऊ पटवर्धन इंग्रजी शाळा म्हणजे जीजीपीएस शाळा सुरू झाली, त्यातील मी पहिला शिक्षक आणि संगीताचा म्हणून मला स्व. अरूअप्पा जोशी यांनी संधी दिली. तिथे लक्षात आलं की, वर्ग वेगळा आणि वर्गातील सगळ्या मुलांना शिकवण वेगळं. मग बडबड गीते, नवी-जुनी गाणी त्यांना छान चाली लावून मुलांना गाणे, तबला, हार्मोनिअम यांची आवड लागावी यासाठी प्रयत्न केले आणि ते यशस्वीही झाले, असे रानडे यांनी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com