पाचशेहून अधिक वारकरी देवरुखहून पंढरपूरकडे रवाना

पाचशेहून अधिक वारकरी देवरुखहून पंढरपूरकडे रवाना

Published on

rat३०p११.jpg-
P२५O०१३४४
संगमेश्वर ः किरदाडी-माळवाशी येथील वारकरी पंढरपूरला रवाना.

शृंगारपुरातील वारकरी पंढरपूरला रवाना
१२ एसटी बसेसची सोय; विठूमाऊलीचा गजर
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ३० ः ‘विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल... रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी’ अशा जयघोषात संगमेश्वर तालुक्यातील किरदाडी-माळवाशी, शृंगारपूर येथील ५००हून अधिक वारकरी मंडळी काल पंढरपूरकडे रवाना झाली. देवरूख येथून पंढरपूरला १२ एसटी बसेस रवाना झाल्या आहेत.
लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुरेश कदम यांच्या माध्यमातून काढण्यात येत असलेल्या वारीचे उद्‍घाटन माजी राज्यमंत्री रवींद्र माने, ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता कदम, जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, जिल्हा महिला संघटक वेदा फडके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, संतोष थेराडे, ठाकरे युवासेनेचे राज्य सहसचिव प्रद्युम्न माने, माजी पंचायत समिती सभापती जया माने, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, ठाकरेसेनेचे तालुकाध्यक्ष बंड्या बोरूकर तसेच शिवानी कदम यांच्या उपस्थितीत झाले. ज्या वारकरी मंडळींना काही अडचणीमुळे विठ्ठलाचे दर्शन घेणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी सहा वर्षांपूर्वी कार्तिकी एकादशीनिमित्ताने पंढरपूर यात्रा मोफत प्रवास ही सेवा सुरेश कदम यांनी संस्थेतर्फे सुरू केली. यंदाचे हे सातवे वर्ष आहे.
संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी परिसरातील वारकरीही काल पंढरपूरला रवाना झाले. या बससेवेचे उद्‍घाटन देवरूख येथे उपसरपंच सुनील सावंत, चंद्रकांत कडू, बळीराम गुरव, बाळकृष्ण करंडे, रमेश जौरत, सदानंद कडू यांच्या उपस्थितीत झाले. या वारीबाबत बोलताना सदानंद कडू महाराज म्हणाले, ओम आदिनाथ सांप्रदाय ऐक्यवर्धक शिष्टमंडळाच्यावतीने मागील अनेक वर्षांपासून पंढरपूर वारीचे आयोजन केले जाते. दरवर्षी शेतीची कामे आटपून हा शेतकरी व कष्टकरीवर्ग या वारीत सहभागी होतो. कार्तिकी एकादशीपर्यंत पंढरपूर येथे हे वारकरी राहतात. त्यानंतर गावी येऊन गंगापूजन करतात. मागील अनेक वर्षांपासून हा हरिनामाचा जागर या माळवाशी गावात सुरू आहे तर सुनील सावंत म्हणाले, मागील अनेक वर्षांपासून माळवाशी गावाला वारीची परंपरा आहे. या वारीत ज्येष्ठ नागरिकांसह तरुणपिढीही सहभागी होते. आजूबाजूच्या गावातील वारकरी या वारीत सहभागी होतात. गेली चार वर्षे मी माझ्या गावातील मंडळींना विठुरायाच्या दर्शनासाठी घेऊन जात आहे, अशी भावना विनोद म्हस्के यांनी व्यक्त केली.

Marathi News Esakal
www.esakal.com