देवस्थान जमिनींवरील ''कुळ वहिवाटदार'' अडचणीत

देवस्थान जमिनींवरील ''कुळ वहिवाटदार'' अडचणीत

Published on

swt307.jpg
1358
सावंतवाडीः पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन सादर करताना सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीचे पदाधिकारी. सोबत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी.

‘देवस्थान’ जमिनीवरून शेतकऱ्यांची नावं होणार कमी
सिंधुदुर्गातील प्रश्‍न; आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३०ः पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीच्या अधिपत्याखाली असलेल्या देवस्थान मालकीच्या जमिनी व मिळकतींवरील कुळांची (शेतकरी) नावे महसूल दप्तरातून कमी करण्याच्या अलीकडील आदेशामुळे जिल्ह्यातील हजारो कुटुंबांवर उपजीविकेचे संकट कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. देवस्थान व्यवस्थापन समितीच्या मालकीच्या जमिनीवरील कुळांची नावे कमी करण्याच्या या आदेशाच्या अंमलबजावणीला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, यासाठी देवस्थान समन्वय समितीने आज पालकमंत्री नितेश राणे यांना साकडे घातले.
तालुका देवस्थान समन्वय समितीने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सुमारे २४३ देवस्थाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीच्या अधिपत्याखाली येतात. या देवस्थानांच्या मालकीच्या जमिनींच्या संदर्भात नुकताच एक आदेश निर्गमित केला आहे, ज्यानुसार या जमिनींवरील इतर कुळांची नावे कमी करण्याचे निर्देश संबंधित विभागास देण्यात आले आहेत. जमिनींच्या कागदोपत्री नोंदी देवस्थानच्या नावावर असल्या तरी, गेल्या अनेक पिढ्यांपासून याच जमिनींवर देवस्थानाचे पुजारी, सेवेकरी आणि स्थानिक ग्रामस्थ शेती करून आपली उपजीविका करत आहेत. तसेच, या बदल्यात ते देवस्थानाची सेवा देखील करत आले आहेत. अशा परिस्थितीत कोणतीही सखोल चौकशी न करता आणि प्रत्यक्ष वापरहक्क व सेवा विचारात न घेता, अचानकपणे कुळांची नावे कमी करण्याचा निर्णय घेतल्यास या कुटुंबांवर मोठा अन्याय होणार आहे, असे समितीचे म्हणणे आहे.
या निर्णयातून केवळ सामाजिक स्तरावरच नव्हे, तर प्रशासकीय पातळीवरही मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. ​​सध्याच्या परिस्थितीत, प्रत्यक्ष मालकी हक्क आणि जमिनीचा वापर करणारे घटक याबद्दल स्पष्टता येण्यासाठी पुरेसा वेळ आणि सखोल चौकशी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे, कोणतीही एकतर्फी कारवाई न करता, सर्व संबंधित पक्षकारांची बाजू ऐकून घेऊनच या संवेदनशील विषयावर निर्णय घेणे योग्य ठरेल, असेही मत समितीने मांडले आहे.
याबाबतचे निवेदन सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समिती पदाधिकाऱ्यांनी मंत्री राणे यांची भेट घेत सादर केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, समन्वय समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सावंत, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परब, सचिव राजाराम सावंत, खजिनदार विलास गवस, सदस्य साबाजी धुरी, मधुकर देसाई आदी उपस्थित होते.
या आदेशाच्या अंमलबजावणीला तात्काळ स्थगिती देऊन, पुढील काळात योग्य पडताळणी तसेच न्याय्य व पारदर्शक पद्धतीने या संदर्भातील अंतिम निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी पालकमंत्री राणे यांच्याकडे करण्यात आली असून पालकमंत्र्यांनी या गंभीर विषयाची दखल घेऊन संबंधित विभागाला त्वरित स्थगितीचे निर्देश द्यावेत, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे, जेणेकरून पिढ्यानपिढ्या देवस्थानाची सेवा करणाऱ्या कुटुंबांवर अन्याय होणार नाही, असे नमूद केले आहे.
पालकमंत्री राणे यांनी सदर निवेदन स्वीकारून याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

चौकट
काय आहे प्रश्न ?
सिंधुदुर्गातील बहुसंख्य गावात बारापाच देवस्थाने आहेत. गावच्या धार्मिक श्रध्दांबरोबरच अनेक पिढ्या चालत आलेल्या रुढी, परंपरा या देवस्थानाशी जोडलेल्या असतात. त्या देवस्थानच्या किंवा मंदिराच्या पूजा व अन्य सेवांसाठीची जबाबदारी ठराविक कुटुंबांकडे अनेक पिढ्यांपासून आहे. याच्या बदल्यात त्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काही जमिनी कसायला दिलेल्या असतात. या जमिनी देवस्थानच्या नावे असून कुळ म्हणून त्यावर संबंधित सेवेकर कुटुंबाचे नाव असते. याच जमिनीबाबत हा आदेश निघाला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com