-तळेघर ग्रामस्थांचे उपोषण मागे
तळेघर ग्रामस्थांचे उपोषण मागे
अधिकाऱ्यांचे पत्र ; त्रुटी दुरुस्तीसाठी कालावधी 
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ३० ः जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तळेघर गावातील तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या आरोपावरून ग्रामस्थांनी बुधवारपासून (ता. २९) सुरू केलेले साखळी उपोषण अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आले आहे.
गटविकास अधिकारी सुनील खरात आणि ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाच्या उपअभियंता जवादे यांनी चर्चेवेळी ग्रामस्थांना लेखी आश्वासन दिले. त्यांनी दिलेल्या पत्रानुसार, कामातील त्रुटींबाबत मक्तेदाराला नोटीस देण्यात आली असून त्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. तलावातील शिल्लक गाळ काढण्याचे काम हाती घेण्यासाठी पाण्याची पातळी कमी होणे आवश्यक असल्याने हे काम मे महिन्यात करण्यात येईल तसेच काही ठिकाणी पिचिंगचे काम अपूर्ण असल्याने ते पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तलावाच्या भिंतीजवळ काही ठिकाणी स्टीलचे बार बाहेर आलेले असल्याने त्यांची दुरुस्ती करून भिंतीचे मजबुतीकरण करण्यात येईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. तलावाचे आर्युमान (क्षमता) वाढवण्यासाठी आणि टिकाऊपणा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती अतिरिक्त उपाययोजना करण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले.

