आंबा कलमे तोडल्याप्रकरणी दोषींवर कारवाईचे आश्वासन
swt3018.jpg 
1422
मालवण ः गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या आश्वासनानंतर हडी येथील मयूर करंगुटकर यांनी उपोषण स्थगित केले.
कलमे तोडल्याप्रकरणी दोषींवर कारवाईचे आश्वासन
मालवण गटविकास अधिकारीः करंगुटकरांचे उपोषण चौथ्या दिवशी स्थगित 
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३० ः हडी ग्रामपंचायतीच्या मालकीची उत्पन्नाची आंबा कलमे तोडल्याप्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई होत नसल्याने हडी गावचे ग्रामस्थ मयुर करंगुटकर यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण अखेर चौथ्या दिवशी स्थगित केले. गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे तसेच महसूल विभागाकडून पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर करंगुटकर यांनी उपोषण तात्पुरते मागे घेतले.
श्री. करंगुटकर यांचे हडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर शासन व पोलीस प्रशासनाच्या विरोधात गेले ४ दिवस बेमुदत उपोषण सुरू होते. आंबा कलमे तोडल्याप्रकरणी कारवाई न झाल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले होते. आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी दुसऱ्यांदा उपोषणस्थळी भेट दिली. त्यांनी या प्रकरणी संबंधितांवर चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच महसूल विभागाकडून पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्याचे सांगितले. या आश्वासनानंतर करंगुटकर यांनी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून गटविकास अधिकारी श्री. चव्हाण यांच्या हस्ते उपोषण स्थगित केले. वनविभाग कुडाळ यांनीही कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. या उपोषणास भंडारी समाज सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी, मालवण भंडारी समाज कार्यकारणी यांनीही प्रत्यक्ष भेट दिली. कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच गावातील ग्रामस्थांनी मोठे सहकार्य केले. उपोषण तात्पुरते स्थगित करताना करंगुटकर यांनी या सर्वांचे आभार मानले. यावेळी हडी गावचे ग्रामस्थ संतोष अमरे, महेश सुर्वे, रवींद्र सुर्वे, महादेव सुर्वे, रत्नदीप कदम, गौतम कदम, प्रशांत मयेकर, चंद्रकांत पाटकर, दिलीप हडकर, प्रसाद हडकर, ओंकार सुभेदार आदी ग्रामस्थ उपस्थित होते. याव्यतिरिक्त ग्रामपंचायत हडीचे कर्मचारी, आरोग्य विभाग कर्मचारी आणि पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.

