दबाव आल्यास तो झुगारुन भगवा फडकवा
swt311.jpg 
01534
कुडाळः येथील शिवसेना मेळाव्यात बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत, माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, राजन तेली, संजय आंग्रे, दत्ता सामंत आदी. (छायाचित्रः अजय सावंत)
दबाव आल्यास तो झुगारुन भगवा फडकवा
उदय सामंतः काका कुडाळकरांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३१ः कोणत्याही दबावाला बळी न पडता तो झुगारुन भगवा फडकवा. कुडाळ विधानसभा मतदारसंघातील १५ पैकी १५ जिल्हा परिषद जागांवर शिवसेना जिंकणारच आहे. महायुती असो वा मैत्रीपूर्ण लढत, आम्ही तयार आहोत. आपल्या आमदारावर कुणी आघात केला तर तो थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आघात मानला जाईल, असा इशारा देत उद्योगमंत्री व सिंधुदुर्ग संपर्कमंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना एकदिलाने लढण्याचे आवाहन केले. या मेळाव्यात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
येथील महालक्ष्मी हॉलमध्ये शिंदे शिवसेनेचा मेळावा पार पडला. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजय पडते, संजू परब, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर, दिपलक्ष्मी पडते, आनंद शिरवलकर, दिनेश साळगावकर आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार केसरकर म्हणाले, ‘‘पूर्वी तुम्ही नेत्यांची लढाई जिंकली, आता कार्यकर्त्यांची लढाई आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघात निलेश राणे यांचे भक्कम नेतृत्व आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने निवडणूक लढा. विजय आपलाच आहे.’’
आमदार राणे म्हणाले, ‘‘मित्रपक्षाला चर्चा करण्यासाठी फोन केले. पण, प्रतिसाद नाही. त्यामुळे स्वबळावर लढण्याची वेळ आली. उद्या हातून संधी निसटली तर किंमत उरणार नाही. सावंतवाडीत केसरकरांचे ठरेल, कुडाळात आमचे ठरेल. आता तडजोड नाही. मला पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संधी दिली आणि मी आमदार झालो. आता आयुष्यभर त्यांच्यासोबतच राहणार आहे. महायुती झाली नाही तर स्वबळावर विजय मिळवणार. कुडाळ विधानसभा मतदारसंघातील सर्व १५ जागा आणि मालवण नगरपंचायत जिंकणारच.’’
माजी आमदार तेली म्हणाले, ‘‘युती झाली तर ठीक; नाहीतर स्वबळावर ताकद दाखवायची. येणाऱ्यांचे स्वागत करा. वैभव नाईक आले तरी पक्षात घ्या, ही निलेश राणे यांची भूमिका आहे. मी स्वतः उमेदवार म्हणून काम करतोय असे प्रत्येकाने मनापासून ठरवून काम करा.’’ 
जिल्हाप्रमुख सामंत यांनी,आम्ही राणे समर्थक म्हणून मोठे झालो. युतीची इच्छा आहे; पण भाजप पूर्ण ताकदीने काम करत असल्याने आम्हीही स्वबळावर सज्ज आहोत. कुडाळ मतदारसंघातील सर्व १५ जिल्हा परिषद जागा जिंकणार, असे ठणकावून सांगितले. प्रास्ताविक दीपक नारकर यांनी तर सुत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस दादा साईल यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

