अवेळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात ‘पाणी’

अवेळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात ‘पाणी’

Published on

rat31p8.jpg
01517
मंडणगड : आठवड्यापासून रोजचा पाऊस पडत असल्याने कापणी केलेले भातपिक भिजून गेले आहे.
rat31p9.jpg
01518
पीक आडवे होऊन भात पाण्यात भिजल्याने त्याला कोंब आले असून, रानडुक्करांकडून नासधूस केली जात आहे.
rat31p10.jpg-
01515
विन्हे येथील शेतकरी अशोक गायकवाड यांच्या शेतातील विदारक चित्र.
--------------
अवेळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात ‘पाणी’
मंडणगडमध्ये भात, नाचणी, आंबा, काजू, सुपारी पिकांचे नुकसान; वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्याही घटना
सचिन माळी : सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ३१ : ऑक्टोबरमध्ये रोजच धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने मंडणगड तालुक्यातील शेतकरी पुरता हतबल झाला आहे. पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले असून, शेतकऱ्यांचे स्वप्नच पाण्यात भिजवल्याचे चित्र कोकणात आहे. खरीप हंगामातील भात आणि नाचणी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, सततच्या पावसामुळे थंडी लांबल्याने आंबा, काजू आणि सुपारी बागायती पिकांनाही फटका बसला आहे. झाडांना फुटलेली पालवी सतत ओलसर राहिल्याने कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. तापमानात अचानक गारवा आल्याने फुलोरा आणि पिकधारणेचा पहिला टप्पा बाधित झाला आहे.
या वर्षी मान्सूनने मे महिन्यातच हजेरी लावल्याने तालुक्यातील शेतीचे नियोजन कोलमडले. सध्या कापणीस आलेल्या पिकांवर पावसाचे संकट कायम असल्याने उभी पिके वाया जाण्याची भीती आहे. विशेषतः पानथळ भागातील शेतकऱ्यांचे नुकसान अधिक गंभीर असल्याचे कृषी विभागाचे निरीक्षण आहे.


वन्यप्राण्यांचा सततचा त्रास

अवकाळी पावसाबरोबरच रानडुकरे, माकडे, गवे या वन्यप्राणी आणि पाखरे यांच्या हल्ल्यानेही शेतकऱ्यांचे नुकसान वाढले आहे. शासनाच्या नियमांनुसार, वनविभागाकडून पंचनामे होणे अपेक्षित असले तरी स्थानिक पातळीवर जागृतीचा अभाव यामुळे बहुतांश प्रकरणांमध्ये पंचनामे होत नाहीत. तालुक्यात वनविभागाचे अधिकृत कार्यालय नसल्याने आणि वनविभागातील कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे १०९ गावांपर्यंत वेळेत पोहोचणे जवळपास अशक्य बनले आहे.

उत्पादन घट आणि मनुष्यबळाचा अभाव

गेल्या काही वर्षांत शेतीखालील जमिनीचे क्षेत्र कमी होत असून, मनुष्यबळाचा अभाव, लहरी हवामान, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांमध्ये शेतीबद्दल नाउमेदपणा वाढला आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादन काही प्रमाणात टिकले असले तरी जमिनीखालील शेतीक्षेत्रात दरवर्षी घट होत आहे.

कृषी विभागाचा आकडेवारीनुसार अहवाल

मंडणगड तालुक्यात यंदा खरीप हंगामात सुमारे २,९०० हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात आली. कृषी विभागाने केलेल्या नुकसानीच्या सर्व्हेनुसार, सुमारे ८०० शेतकरी बाधित १६६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी १५० हेक्टर भात आणि इतर पिके तर १६ हेक्टर बागायती पिकांचे नुकसान नोंदवले गेले. वनविभागाकडून मात्र वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी अद्याप उपलब्ध नाही. स्थानिक शेतकरी म्हणण्यानुसार, दरवर्षी शेती करतो; पण पाऊस, प्राणी, खर्च आणि मजूर टंचाई सगळेच वाढले आहे. सरकारकडून योग्य मदत आणि नैसर्गिक वातावरणात समतोल राहिला नाही तर पुढील वर्षी पीक घेणं कठीण होईल.

चौकट
२०२५ मध्ये पावसामुळे झालेले नुकसान -
* जून - शेतकरी १११, बाधित क्षेत्र २५.५९ हेक्टर, नुकसान २ लाख १८ हजार
* ऑगस्ट - शेतकरी ६०, बाधित क्षेत्र १६.६५ हेक्टर, नुकसान १ लाख ४२ हजार
* सप्टेंबर - शेतकरी ७३, बाधित क्षेत्र ६.९८ हेक्टर, नुकसान ८३ हजार.
* ऑक्टोबर - पंचनामे सुरू आहेत.
------
कोट १
आतापर्यंत तालुक्यातील ६८ गावांतील ७९९ पंचनामे करण्यात आले असून, १६६.१८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. जवळपास ७५ टक्के पंचनामे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित बाधित क्षेत्रांचे पंचनामे रविवारपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत.
- अक्षय ढाकणे, तहसीलदार, मंडणगड.
----------
कोट २
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यासाठी मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक सर्वच अधिकारी पाहणी करत आहेत.
- सोमनाथ अहिरकर, तालुका कृषी अधिकारी.
---------
कोट ३
संततधार सुरूच राहिल्याने शेतात तयार पीक पाण्यात भिजून गेले आहे. अक्षरशः शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट डोळ्यासमोर वाया जात असल्याचे चित्र आहे. पंचनामे होत असून, शासनाने सरसकट नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसण्याचे काम करावे.
- दिनकर हुंबरे, शेतकरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com