

परुळे बाजारला आज
‘ई-केवायसी’ अभियान
म्हापण ः शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई आणि भोगवे ग्रामपंचायत उपसरपंच रुपेश मुंडये यांच्या पुढाकारातून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी महिलांसाठी मोफत ई-केवायसी अभियानाचे आयोजन केले आहे. हे अभियान उद्या (ता.१) सकाळी दहा  ते सायंकाळी पाचपर्यंत सचिन देसाई संपर्क कार्यालय, परुळे बाजार येथे होणार आहे. या उपक्रमाद्वारे परुळे-म्हापण जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील सर्व पात्र लाभार्थी महिलांना ई-केवायसीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ई-केवायसीसाठी येताना लाभार्थी भगिनींनी आधारकार्ड आणि त्यास लिंक असलेला मोबाईल क्रमांक, विवाहित महिलांनी स्वतःचा व नवऱ्याचा आधारकार्ड तसेच लिंक मोबाईल सोबत आणावा, अविवाहित मुलींनी स्वतःचा व वडिलांचा आधारकार्ड आणि लिंक मोबाईल सोबत आणावा, या अभियानाचा जास्तीत जास्त महिला लाभार्थींनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 
.............
आवळेगाव येथे
रविवारी जत्रोत्सव
कुडाळ ः सिंधुदुर्गातील वार्षिक जत्रोत्सवांना (दहिकाला) आवळेगावच्या श्री देव नारायणाच्या जत्रोत्सवाने सुरुवात होते. आवळेगावचे ग्रामदैवत श्री देव नारायण मंदिरात कार्तिकी महिन्यातील भागवत एकादशीदिवशी होणारा ‘दहिकाला’ म्हणजे कोकणातील वार्षिक जत्रोत्सवांची सुरुवात मानली जाते. रविवारी (ता.२) हा जत्रोत्सव साजरा होणार आहे. सकाळी सातला पुरोहितांकडून ‘श्रीं’च्या मूर्तीवर अभिषेक, दहाला श्री दत्त मंदिर ते विठ्ठल मंदिर पायी दिंडी. हरिपाठ, साडेअकराला कीर्तनकार नीतेश महाराज रायकर (गडहिंग्लज) यांचे कीर्तन, रात्री साडेअकराला ‘श्रीं’ची पालखी व नंतर साडेबाराला खानोलकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. कार्तिकी महिन्यातील भागवत एकादशी असल्याने नारायण मंदिराच्या बाजूलाच विठ्ठल-रखुमाईचे मंदिर आहे. त्यामुळे या जत्रेला विशेष महत्व आहे. जत्रेच्या दुसऱ्या दिवशी, सोमवारी सकाळी मंदिरासमोर तुलसी विवाह करून जत्रेची सांगता होते.
........................
रेडी-गावतळेवाडीत
कार्तिकी एकादशी 
वेंगुर्ले ः रेडी-गावतळेवाडी (चौतुरवाडा) येथे देव ब्राह्मण मंदिर वाढदिवस व देव सत्यपुरुष तुलशी वृंदावन येथे कार्तिकी एकादशी उत्सव उद्यापासून (ता.१) सोमवार (ता.३) पर्यंत होणार आहे. यानिमित्त उद्या देव ब्राह्मण वाढदिवस सोहळा, सकाळी नऊला अभिषेक, दुपारी बाराला महाआरती, महाप्रसाद, सायंकाळी सातला भजन, २ रोजी सकाळी नऊला विठोबा पूजन, दुपारी महाआरती, सायंकाळी सातला फुगडी, भजन, रात्री नऊला लिलाव व अकराला देव ब्राह्मण दशावतार नाट्य मंडळ, रेडी गावतळेवाडी पांचा ‘विजयमणी’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. ३ रोजी दुपारी बाराला महाआरती, महाप्रसाद होईल. लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---
कणकवली येथे
आज शोकसभा
कणकवली ः प्रतिभावंत साहित्यिक, नाट्यकर्मी, ‘वस्त्रहरण’ या अजरामर नाटकामुळे प्रत्येक मालवणी माणसाला अभिमान वाटणारे गंगाराम (नाना) गवाणकर यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्व आणि नाट्यसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी उद्या (ता.१) दुपारी साडेतीनला वागदे गोपुरी आश्रम येथे शोकसभा आयोजित आहे. कोकण मराठी साहित्य परिषद, कणकवली, गोपुरी आश्रमातर्फे ही शोकसभा आयोजित केली आहे. उपस्थित राहवे, असे आवाहन कोमसाप, कणकवली अध्यक्ष माधव कदम, गोपुरी आश्रम अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, बाळू मेस्त्री यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.