बिल भरणा केंद्र बंद केल्यास आंदोलन

बिल भरणा केंद्र बंद केल्यास आंदोलन

Published on

01597

बिल भरणा केंद्र बंद केल्यास आंदोलन

काँग्रेसचा महावितरणला इशारा; मालवणप्रश्नी अधिकाऱ्यांना विचारला जाब

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३१ : येथील उपविभागातील नागरिकांना दिलासा देणारे आणि सोयीस्कर असलेल्या महावितरण कार्यालयाच्या आवारातील सुरू असलेले वीज बिल भरणा केंद्र रोखपाल पद नसल्याचे कारण देत उद्यापासून (ता.१) बंद करण्याचा निर्णय महावितरणने घेतला. यावर आक्रमक बनलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. हे केंद्र बंद केल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला.
महावितरणच्या मनमानी आणि गैरसोयीच्या निर्णयाविरोधात ग्राहकांमध्ये आणि राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. या केंद्राच्या माध्यमातून केवळ वीज बिल भरले जात नव्हते तर ग्राहकांना वाढीव बिल किंवा अन्य कोणतीही तांत्रिक समस्या आल्यावर ग्राहक याच ठिकाणी कार्यालयातील अधिकाऱ्यांस भेटून समस्या सोडवून घेत होता. समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी हे केंद्र महत्त्वाचे होते. मात्र, हे वीज बिल भरणा केंद्र बंद केल्यास नागरिकांना मोठा मनस्ताप होणार आहे.
महावितरणच्या या निर्णयाविरोधात जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी आणि अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. कार्यालयीन अपुरा कर्मचारी ही कारण आम्हाला सांगू नका. नागरी सुविधा द्या आणि आपल्या कार्यालयातील वीज बिल भरणा केंद्र तात्काळ सुरू ठेवा, असे काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी सुनावले तर सामान्य नागरिकांना होणारा त्रास आम्ही खपवून घेणार नाही. महावितरणने तातडीने आपला निर्णय बदलावा, असे आप्पा चव्हाण यांनी सांगितले. नागरिकांच्या सोयीसाठी हे केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. महावितरणने आपला निर्णय न बदलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
यावेळी ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश अंधारी, आप्पा चव्हाण, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, माजी तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, देवानंद लुडबे, ह्यूमन राईट्स असोसिशन फॉर प्रोटेक्शन जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी, तालुकाध्यक्ष प्रमोद कांडरकर, तालुका उपाध्यक्ष महेश मयेकर, महिला संपर्क प्रमुख अश्विनी गावठे, मिथिलेश मिठबावकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
--------------
दादागिरी खपवून घेणार नाही
सध्या पर्यायी म्हणून उपलब्ध असलेल्या ऑनलाईन सुविधा अपुऱ्या नेटवर्कमुळे कोलमडत असताना आता नागरिकांना वेठीस धरण्याचे काम महावितरण कंपनीकडून होत असल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. ग्राहक कायद्यानुसार ही सुविधा ग्राहकाला कार्यालयात देखील देण्याची नियमावली असताना महावितरणची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com