सिंधुदुर्ग पोलिस कार्यालयातील ‘एआय’चा अभ्यास
01609
सिंधुदुर्ग पोलिस दलातील ‘एआय’चा अभ्यास
निती आयोग सदस्यांची भेट; अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे केले कौतुक
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३१ ः सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीचा प्रभावी वापर सुरू केला असून, या मॉडेलचा सखोल अभ्यास करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी निगडित नीती आयोगाची विशेष टीम सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. याच अनुषंगाने निती आयोगाच्या पथकातील डॉ. देवव्रत त्यागी आणि श्रीमती विदीशा दास यांनी आज जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली. या दरम्यान पोलिस विभाग आणि रस्ते परिवहन विभाग कशा प्रकारे एआय प्रणालीचा उपयोग करत आहे. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ श्रीपाद पाटील, तहसिलदार दिक्षांत देशपांडे आदी उपस्थित होते. बैठकीच्या सुरूवातीला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी सादरीकरणाव्दारे संपूर्ण माहिती दिली. 
सागरी सुरक्षेसाठी एआय प्रणालीवर आधारीत ‘सिंधुप्रहरी’ या उपक्रमांविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. पालकमंत्री नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलिस दलाने एआय प्रणालीवर आधारीत ‘सुरक्षित सिंधुदुर्ग’ या अत्याधुनिक स्मार्ट सुरक्षा प्रणालीचा अवलंब करून सुरक्षाव्यवस्थेत नवे पाऊल टाकले आहे. या प्रणालीद्वारे अपरिचित चेहऱ्यांची लवकर ओळख, त्वरित अलर्ट, सागरी सुरक्षेत वाढ आणि गुन्हे प्रतिबंध शक्य झाले आहेत. सर्व माहिती डिजिटल स्वरूपात ठेवल्यामुळे तपास आणि विश्लेषण अधिक अचूक झाले आहे. तसेच स्वयंचलित निरीक्षणामुळे मनुष्यबळ व संसाधनांचा कार्यक्षम वापर होत आहे. या तंत्रज्ञानामुळे जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा अधिक तत्पर, सजग आणि सक्षम झाली आहे, असे त्यांनी शिष्टमंडळाला माहिती देताना सांगितले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी दळणवळण योग्यरित्या सुरू राहण्यासाठी जिल्ह्याची भौगोलिक वैशिष्टये, हवामानामुळे निर्माण होणारे आव्हाने, मनुष्यबळाचा तुटवडा, संपर्क यंत्रणेतील आव्हाने यावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मार्फत कशा पद्धतीने मात केली जाऊ शकते हे सांगितले. निती आयोगाच्या शिष्टमंडळाने देखील संपूर्ण माहिती जाणून घेतल्यावर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या एआय प्रणाली विषयी समाधान व्यक्त केले. 
---------------
‘फेसलेस’ दंड प्रणाली
या सादरीकरणात सीसीटीव्हीच्या माध्यमातून विविध रस्त्यांवरती दुचाकी, चार चाकी यावरील सुरक्षा विषयक साधनांचा वापर न करणाऱ्या वाहनांची निश्चिती करून त्यांना दुरस्त (फेसलेस) पद्धतीने दंडीत करण्याच्या प्रणालीचे सादरीकरण केले. पुढील टप्प्यांमध्ये या यंत्रणेचा वापर अपघात प्रसंगी आपत्कालीन बचाव यंत्रणांना सूचना करण्यासाठी तसेच अपघात प्रमाण क्षेत्रांची निगराणी राखण्यासाठी कशा पद्धतीने केला जाऊ शकतो, याचे देखील याप्रसंगी सादरीकरण करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

