चिपळूण ः मतदार यांद्यांची पहाटेपर्यंत पडताळणी

चिपळूण ः मतदार यांद्यांची पहाटेपर्यंत पडताळणी

Published on

मतदार यांद्यांची पहाटेपर्यंत पडताळणी
चिपळुणातील १६०० अर्जांची छाननी; ११०० नावे बरोबर, ५०० नावांबाबत फेरविचार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३१ः येथील प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी चिपळूण शहराच्या प्रारूप मतदार यादीतील आक्षेपासंदर्भात सोमवारी सुनावणी घेतली. त्यानंतर मंगळवार ते गुरूवार या तीन दिवसात चिपळुणातील १६०० अर्जांची छाननी केली. मतदार यादीत चिपळूण शहरात दाखल झालेली सुमारे ११०० नावे योग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रांताधिकारी लिगाडे यांनी आज या संदर्भात आदेश जारी केले; मात्र दाखल झालेल्या अर्जांची छाननी करून मुदतीत निकाल देण्यासाठी प्रांताधिकारी व बीएलओ म्हणून काम केलेले कर्मचारी, अधिकारी मागील तीन दिवस पहाटे तीन वाजेपर्यंत मतदार छाननी करून मतदार यादी अंतिम करण्यासाठी झटत होते.
चिपळूण शहराच्या नवीन मतदार यादीत मोठ्या प्रमाणात चुका असल्याचा आरोप करत नागरिक तसेच राजकीय कार्यकर्त्यांनी तब्बल १६०० आक्षेप नोंदवले होते. मतदारांची नावे चुकीच्या वॉर्डात टाकणे, एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या ठिकाणी जाणे, ग्रामीण भागातील मतदारांची नावे शहरात आणणे अशा अनेक त्रुटी यादींवर आक्षेप घेतला होता. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर प्रांताधिकारी लिगाडे यांनी सोमवारी सर्व आक्षेपांची पडताळणी सुरू केली. नावनोंदणी करताना नेमण्यात आलेले बीएलओ यांनाही सुनावणीच्यावेळी हजर राहण्यास सांगण्यात आले होते.
सुनावणीपूर्वी प्राप्त झालेल्या सर्व आक्षेप अर्जांची कर्मचाऱ्यांकडून स्थळ पाहणी करण्यात आली. नागरिकांचे आक्षेप योग्य आहेत की, बीएलओंनी नोंदवलेली मतदारांची नावे योग्य आहेत याची सविस्तर माहिती घेऊन त्याचा अहवाल प्रांताधिकारी यांना देण्यात आला. त्याच दरम्यान नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी १८ प्रभागातील मतदार याद्यांची छाननी सुरू केली.
सोमवारी रात्री उशिरापर्यंत नागरिकांच्या अर्जावर सुनावणी सुरू होती. त्या वेळी पालिकेतील प्रमुख अधिकारी प्रांताधिकारी कार्यालयात रात्री उशिरापर्यंत हजर होते. त्यानंतर मंगळवार, बुधवार आणि गुरूवारी स्थळ पाहणी करून अर्जांची छाननी सुरू होती. या प्रक्रियेचा पालिकेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून पालिकेचे कर्मचारी व अधिकारी दिवसा पालिकेचे काम आणि पहाटे उशिरापर्यंत मतदार याद्या पडताळणीचे काम करत होते.

चौकट
गुहागरमधील ७५ पैकी ५९ नावे बरोबर
गुहागर शहरातील मतदार यादीवर ७५ नागरिकांनी आक्षेप घेतले होते. बुधवारी प्रांताधिकारी यांनी गुहागर नगरपंचायतीत सुनावणी घेतली. ७५ पैकी ५९ नावे योग्य असल्याचे आढळून आले आहेत. उर्वरित नावांबाबत फेरविचार केला जाणार आहे.

कोट
निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळेत सुनावणी घेऊन त्याचा निकाल देणे गरजेचे होते. त्यासाठी सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत जागून मतदार यादी पड़ताळणीचे काम केले. आपले दैनंदिन कामकाज सांभाळून आम्ही नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा केला आहे. यातून मतदार यादी अचूक करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
- आकाश लिगाडे, प्रांताधिकारी, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com