चिपळूण-ठाकरे शिवसेना धडकली महावितरणवर
RATCHL३१३.JPG-
01624
चिपळूण ः खेर्डीच्या महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करताना ठाकरे सेनेचे पदाधिकारी.
------------
ठाकरे शिवसेना धडकली महावितरणवर
स्मार्ट मीटरला विरोध; तक्रारींचे निरसन करण्याचे आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ ः स्मार्ट मीटरसंदर्भात मोर्चा काढून महिना उलटला तरी महावितरणच्या खेर्डी कार्यालयाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी महावितरण कार्यालयातच जमिनीवर बसून आंदोलन केले. अखेर ३ तासानंतर ७७२ ग्राहकांच्या तक्रारीवर १५ दिवसात निरसन करण्याचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
खेर्डी परिसरात नवीन स्मार्ट वीजमीटर बसवण्यास ग्राहकांचा विरोध असताना मीटर बसवण्यात येत होते. या विरोधात ठाकरे सेनेने खेर्डीतील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चात महाविकास आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या मोर्चानंतर ग्राहकांच्या तक्रारीवर कोणतीही दखल न घेतल्याने शुक्रवारी ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेर्डी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही किंवा लेखी आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत आम्ही कार्यालय सोडणार नाही, असा इशारा युवासेना तालुकाप्रमुख उमेश खाताते यांनी दिला. सुरवातीला अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही.
अखेर ३ तासाच्या आंदोलनानंतर महावितरणच्या अधिकारी यांनी लेखी स्वरूपात पत्र दिले. सर्व ग्राहकांच्या ७७२ लेखी तक्रारीचे १५ दिवसात निरसन केले जाईल, असे महावितरणकडून लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते, विभागप्रमुख विजय शिर्के, युवासेना विभागप्रमुख राहुल भोसले, ओंकार पंडित, सुधाकर दाते, पिंट्या यादव, संकेत खाताते, दीपक पवार आणि ग्राहक सहभागी झाले होते.
---
आश्वासनाकडे लक्ष
ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर ग्राहकांच्या तक्रारीचे १५ दिवसात निरसन केले जाईल असे आश्वासन महावितरणकडून दिले गेले आहे. त्याची पूर्तता कशी होते याकडे ग्राहकांचे लक्ष लागून राहीले आहे.
---

