‘सिंधू-रत्न समृद्ध’ योजनेमध्ये भ्रष्टाचार
01645
‘सिंधू-रत्न समृद्ध’ योजनेमध्ये भ्रष्टाचार
विनायक राऊत ः सत्ताधाऱ्यांनी दुरुपयोग कसा केला हे उघड करू
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३१ : सिंधू-रत्न समृद्ध योजनेत सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ४५० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केला. ही योजना चांगल्या उद्देशाने सुरू झाली होती. मात्र, सत्ताधाऱ्यांनी त्याचा दुरुपयोग स्वतःच्या फायद्यासाठी कसा केला? हे काही दिवसांत माहितीसह उघड करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचे पदाधिकारी एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकजुटीने लढवण्यास आणि जिंकण्यास उत्सुक आहेत. आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून आघाडीची चर्चा सुरू असून या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी यश मिळवेल, असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. 
येथील हॉटेल चैतन्य येथे पत्रकार परिषदेत श्री. राऊत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जिल्ह्यातील विकासकामे आणि विरोधी पक्षांच्या कारभारावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘‘आघाडी शिल्लक ठेवणार नाही, असे सांगणाऱ्यांना चष्मा देण्याचे ठरवले आहे. जेणेकरून त्यांना ठाकरे शिवसेना, काँग्रेस, आणि शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी किती मजबूत आहे हे दिसेल. आम्ही एकजुटीने आणि विचाराने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उतरू आणि जिंकू. आमचे राजकारण आणि समाजकारण विकासाच्या मुद्यांवर आणि संस्कृतीला धरून आहे. विरोधकांसारखे बाजारू स्वरूप, जसे आमदार नीलेश राणे आणि पालकमंत्री नीतेश राणे यांच्यातील ‘कौरव पांडवां’सारखे युद्ध, स्वार्थी किंवा पैशाच्या जोरावर राजकारण करणे असा आमचा विचार नाही.’’
ते म्हणाले, ‘‘मच्छीमार आणि शेतकरी उद्ध्वस्त झाले असतानाही, लोकांसाठी जे करण्याची गरज आहे, ते कोणीही करत नाही. मराठवाडा-विदर्भासाठी हजारो कोटींचे पॅकेज जाहीर झाले. मात्र, कोकणातील उद्ध्वस्त शेतकऱ्यांसाठी अद्याप कोणतेही पॅकेज जाहीर झाले नाही. अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामेही झालेले नाहीत. मागील वादळात नुकसान झालेल्या मच्छीमारी लोकांना तुटपुंजी मदत जाहीर करत थट्टा करण्याचे काम या सरकारने केले. या सरकारला येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोकणातील मतदार धडा शिकवतील. सिंधुदुर्गात भातशेतीचे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सर्व नेते येत्या आठवड्यात कृषीमंत्र्यांची भेट घेऊन जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी करणार आहेत.’’ 
पावसाळी काळात मत्स्य विक्रेत्या महिलांना चार महिन्यांसाठी अनुदान आणि रास्त धान्य देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यासाठी शासनाकडे पैसा नसल्याचे सांगितले जाते. गरजूंना मदत करण्याऐवजी जिल्ह्याची ख्याती ‘अंमली पदार्थांचा अड्डा’ अशी झाली आहे. गोव्यातून बनावटीची दारू आणि अंमली पदार्थ सिंधुदुर्ग-रत्नागिरीत येत आहेत, तसेच अंमली पदार्थ विक्रीसाठी शालेय विद्यार्थ्यांचा वापर केला जात आहे. जुगार अड्ड्यांवर छापा टाकण्याची नौटंकी पालकमंत्री करत आहेत, जे काम पोलिसांनी करायला हवे. यावरून पोलिस पालकमंत्र्यांना जुमानत नसल्याचे दिसते. स्वतःच्या स्वार्थासाठी रो-रो सेवा सुरू केली. मात्र, दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्गाची आणि जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अंतर्गत रस्ते दुरुस्त करू न शकणाऱ्या पालकमंत्र्यांना विकासावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही श्री. राऊत यांनी सांगितले. 
मागील निवडणुकीत जनतेने दुर्दैवाने भ्रष्टाचारी लोकांच्या हातात जिल्हा दिला. ती चूक येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नितीन वाळके, बाबी जोगी, बंड्या सरमळकर, नरेश हुले, नीना मुंबरकर, दीपा शिंदे, निनाक्षी मेतर, तेजस लुडबे, जेम्स फर्नांडिस, सिद्धेश मांजरेकर आदी उपस्थित होते.
----------------
बनावट कामांचा पर्दाफाश करणार 
‘तौक्ते’ चक्रीवादळानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समुद्रकिनारी व खाडीकिनारी भागात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासंदर्भात लक्ष दिले होते. यासाठी ३ हजार ७६० कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला. यात खासदार म्हणून पाठपुरावा करत १ हजार ७६० कोटींचा पहिल्या टप्प्यातील निधी मिळवून दिला. आज हे काम सुरू आहे. मालवण नगरपालिका क्षेत्रामध्ये भूमिगत वाहिन्या, खड्डे या माध्यमातून उकळलेल्या पैशांवरून केलेल्या बनावट कामांचा पर्दाफाशही करू, असे त्यांनी सांगितले. मालवणचा शहर विकास आराखडा रद्द करण्यासाठी प्रयत्न केले, त्यात यश आले नसले तरी विषय सोडला नाही. सर्वसामान्य मालवणवासीयांना उद्ध्वस्त करणारा आराखडा अंमलात येऊ देणार नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

