कुष्ठरोगाचे निदान झालेल्या रुग्णांची नोंद द्या

कुष्ठरोगाचे निदान झालेल्या रुग्णांची नोंद द्या

Published on

कुष्ठरोगाचे निदान झालेल्या रुग्णांची तातडीने नोंद करा
डॉ. अनिरुद्ध आठल्ये ः खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांना बंधन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः कुष्ठरोग अधिसूचित आजार घोषित झाल्यामुळे सार्वजनिक आणि खासगी आरोग्य संस्था तसेच वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सर्व डॉक्टरांनी कुष्ठरोगाचे निदान झालेल्या सर्व रुग्णांची नोंद जिल्हा आरोग्य अधिकारी यांना अहवाल स्वरूपात तातडीने सादर करावयाची आहे. याचे जिल्ह्यातील सर्व खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आणि कुष्ठरोग साहाय्यक संचालक डॉ. विवेकानंद बिराजदार यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने कुष्ठरोग या गंभीर आजाराला अधिसूचित आजार म्हणून घोषित केले आहे. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कुष्ठरोग निर्मूलनासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. कुष्ठरोग हा संसर्गजन्य आजार असून त्याचे लवकर निदान व वेळेवर उपचार न झाल्यास शरीरावर कायमस्वरूपी विकृती (विकलांगता) निर्माण होतो. हा केवळ आरोग्याचा प्रश्न नसून सामाजिक भेदभावाशी जोडलेला असल्याने, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाने ही गंभीर दखल घेतली आहे. शासनाने येत्या तीन वर्षांमध्ये राज्याला कुष्ठरोगमुक्त दर्जा प्राप्त करून देण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. कुष्ठरोग निर्मूलन हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. कुष्ठरोग प्रतिबंध, निदान आणि उपचार व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्यासाठी शासनाने खालील प्रमुख बाबी निश्चित केल्या आहेत. त्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सर्व रुग्णांना आवश्यक बहुविध औषधोपचार सेवा उपलब्ध करून दिले जाणार आहेत. उपचारानंतर ज्या रुग्णांमध्ये पुनरागमन होते किंवा विकृती निर्माण होते, त्यांची नोंद घेऊन त्यांना आवश्यक पुनर्वसनासाठी साहाय्य करण्यात येणार आहे. कुष्ठरोग संक्रमणाला प्रतिबंध घालण्यासाठी, रुग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्तींना ‘केमोपोफिलॅक्सिस’ ची व्यवस्था केली आहे. औषध प्रतिरोधक कुष्ठरोग रुग्णांच्या निदान व व्यवस्थापनासाठी विशेष साहाय्य आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाला बळकटी मिळणार असून निदान, उपचार आणि रुग्णसेवेचा दर्जा उंचावणार आहे, असे डॉ. आठल्ये यांनी सांगितले.
------
चौकट
जिल्ह्यात ३१ नवीन रुग्ण
शासनाच्या सूचनेनुसार नवीन कुष्ठरुग्ण शोधण्याचे वार्षिक उद्दिष्ट रत्नागिरी जिल्ह्याला ६२ इतके आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३१ नवीन रुग्ण सापडलेले आहेत. तसेच आतापर्यंत २५ रुग्ण रोगमुक्त करण्यात यश आले आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com