१५ दिवसात जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचे १२ वाजले
ग्राऊंड रिपोर्ट---लोगो
-rat३p१२.jpg-
P२५O०२१३७
आंजर्ले खाडीत शाकारलेल्या नौका.
-rat३p१३.jpg-
P२५O०२१३८
पाळंदे समुद्रकिनाऱ्यावर वादळामुळे थांबलेलं जलपर्यटन.
---
जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचे वाजले बारा
मोंथा वादळाचा तडाका ; मच्छीमारीसह जलपर्यटनावर आघात, भातशेती पाण्यात
दिवसाला कोट्यवधीची उलाढाल होणारा आणि परकीय चलन मिळवून देणारा मासेमारीचा मुख्य व्यवसाय वादळी स्थिती आणि पावसाच्या दणक्याने पूर्ण ठप्प झाला आहे. गेले १५ दिवस जिल्ह्यातील मासेमारी थांबली आहे. सध्या जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार तर परराज्यातील आश्रयाला आलेल्या अनेक मासेमारी नौका बंदरात विसावल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व बंदरांमध्ये दिवसाला सुमारे ८० ते १०० कोटींची होणारी उलाढाल होते, ती या नैसर्गिक आपत्तीमुळे थांबली आहे. तांडेल आणि खलाशी मिळून १.२५ लाखांना रोजगार मिळतो. त्यांचा रोजचा खर्च नौकामालकांवर पडल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. पंधरा दिवसांमध्ये सुमारे १५०० कोटींची जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाची उलाढाल ठप्प झाली आहे. शासनाने या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची दखल घ्यावी, अशी मागणी मच्छीमार संघटनांकडून होत आहे.
- राजेश शेळके, राधेश लिंगायत, राजेंद्र बाईत
---
सतत खवळलेल्या समुद्रासोबत मोंथा वादळाने रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीला हादरवून सोडले आहे. समुद्रातील उंच लाटा, वाऱ्याचा वेग आणि मुसळधार पावसामुळे मासेमारी व जलपर्यटन उद्योग पूर्णपणे ठप्प झाले आहेत. किनाऱ्यावर शेकडो नौका त्या त्या भागातील सुरक्षित ठिकाणी उभ्या असून, समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटनस्थळे ओस पडली आहेत. या वादळामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले दोन्ही उद्योग कोलमडले असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दापोली तालुक्याचा आर्थिक कणा असलेल्या हर्णै बंदरातील परिस्थिती खूपच कठीण होऊन बसली आहे. किमान ९०० ते १००० यांत्रिकी नौका आंजर्ले, उटंबर, दाभोळजवळच्या खाडीत आश्रयाला उभ्या आहेत. रोजची करोडो रुपयांची होणारी उलाढाल थांबली आहे. गेल्या १२ ते १५ दिवसांमध्ये हर्णै पंचक्रोशीतील नौकांचे दिवसाला किमान एका नौकेचे सर्व खर्च काढून ४० हजार रुपये फायदा अशा ९०० नौकांचे अंदाजे ३ कोटी ६० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तर एका नौकेवर ८ खलाशी त्यांचा दिवसाला पगार किमान १ हजार रु. असा दिवसाचा ८ हजार फक्त नोकरपगार आणि त्यांचा खाण्या-पिण्याचा खर्च पकडून किमान ७५ लाख रु. खर्च झाला आहे. काहीही मिळकत नसताना एवढा खर्च करताना मच्छीमारांचे कंबरडे मोडले आहे. तर राजापूर तालुक्यातील साखरीनाटे बंदर हे देखील रत्नागिरी जिल्ह्यातील मोठे बंदर आहे. दरवर्षी सुमारे शंभर कोटी रुपयांची उलाढाल या बंदरामध्ये होते; परंतु गेल्या १० ते १२ दिवसांपासून येथे मासेमारी पूर्णपणे बंद आहे. ७०–७५ पर्ससीननेट, दीडशे ट्रॉलर, शंभर यांत्रिक आणि ५० बिगरयांत्रिक होड्या या ठिकाणी उभ्या आहेत. सततच्या प्रतिकूल हवामानामुळे २५ ते ३० लाख रुपयांचा तोटा झाल्याचे स्थानिक मच्छीमार सांगतात. बंदरातील रोज दिसणारा मासेमारीचा गजबजलेला कोलाहल आता शांत आहे. नौका स्थिर आहेत आणि जाळ्यांवर पावसाचे थेंबच खेळत आहेत.
*जलपर्यटनावर आघात
वादळाचा फटका केवळ मासेमारीवर नाही तर पर्यटन व जलक्रीडा व्यवसायावरदेखील बसला आहे. दापोलीतील हर्णै, मुरूड, आंजर्ले, पाळंदे आणि रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे तसेच गुहागर येथील सर्व डॉल्फिन सफारी, बोट राइडिंग, पॅरासिलिंग, बनाना राईड, जेट्सकी राईड, सुवर्णदुर्ग दर्शन, घोडागाडी, उंटाची सफर, सॅन्ड बाईक राईड आशा या जलक्रीडा बंदच आहेत. बीचवरील खानपान व्यावसायिकांचे काम ठप्प झाले आहे. अशा स्थितीत कोकणातील पर्यटनावरदेखील पाणी फिरले आहे. या जलपर्यटनातून या पर्यटन हंगामामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, गुहागर व दापोली–मुरुड, लाडघर किनाऱ्यावरच दिवसाला २ ते ३ लाख रुपयांची उलाढाल होते. ती आता शून्यावर आली आहे. मुरूड बीचवर आलेला पर्यटक डॉल्फिन सफर व सुवर्णदुर्ग दर्शन केल्याशिवाय जात नाही. हंगामात त्याकरिता खूपच पर्यटकांची गर्दी असते. मुरूड येथील असणाऱ्या वॉटरस्पोर्ट्स ग्रुपच्या जलपर्यटनातून दिवसाला किमान १ लाख रुपयांचा फायदा होतो. किमान सर्व गेमच्या १०० राईड्स होतात. त्यात नोकरपगार, सर्व यंत्रसामग्रीचा डागडुजीचा खर्च त्यातूनच काढावा लागतो. आता हा खर्च कुठून काढायचा, अशी व्यथा मुरूड येथील वॉटरस्पोर्ट्स ग्रुपचे सदस्य संदेश उर्फ बाबू घाग यांनी सांगितले.
*साखळीतील प्रत्येक व्यवसाय ठप्प
मासेमारी बंद झाल्याने वाहतूकदार, बर्फ कारखाने, डिझेल पुरवठादार, जाळे–इंजिन दुरुस्ती कामगार, मासेविक्रेते या सर्वांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. जाळ्यांच्या दुरुस्तीचा खर्च, कामगारांचे पगार, इंधनखर्च सगळं वाढतंच आहे; पण उत्पन्न काहीच नाही, अशी मच्छीमारांची व्यथा आहे.
*जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला फटका
मासेमारी व जलपर्यटन या दोनच क्षेत्रांवर रत्नागिरी जिल्ह्याची ग्रामीण अर्थव्यवस्था उभी आहे. ही दोन्ही क्षेत्रे ठप्प झाल्याने स्थानिक रोजगार व व्यापार कोलमडला आहे. जिल्ह्यातील मच्छीमार संघटना व पर्यटन व्यावसायिकांनी प्रशासनाकडे त्वरित आर्थिक मदतीची मागणी केली आहे. वादळ शांत झाल्यानंतरही परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी किमान आठवडा ते दहा दिवस लागतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
*मासेमारी साखळीवर नकारात्मक परिणाम
गेले १२ दिवस नौका समुद्रात न गेल्यामुळे मासेविक्री, निर्यात आणि त्या संबंधित सर्व व्यवहार थंडावले आहेत. मासेमारी व्यवसायावर थेट अवलंबून असलेले सुमारे सव्वालाख (१.२५ लाख) तांडेल (नौका प्रमुख) आणि खलाशी (मजूर) यांच्या उपजीविकेवर थेट परिणाम झाला आहे. मासेमारी बंद असल्याने त्यांची रोजची कमाई थांबली आहे. नौकामालकांना उत्पन्न शून्य असले तरी खलाशी आणि तांडेल यांचा रोजचा खर्च (राहणे, खाणे) तसेच नौकेचा देखभाल खर्च करावा लागत आहे.
* किनाऱ्यावर काळजीचं सावट
मासेमारी हंगामात या वेळी मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्यामुळे मच्छीमारांचे पंधरा दिवस फुकट गेले होते. नारळी पौर्णिमा होऊन देखील अधूनमधून पाऊस राहिला. गणपती, दसरा आदी काळामध्ये काही प्रमाणात मासे मिळाले; परंतु अवकाळीमुळे मच्छीमारांचे यंदाचे हंगामातील जास्त दिवस फुकटच गेले. वादळानंतरचा शांत समुद्र बाहेरून सुंदर दिसत असला तरी किनाऱ्यावरील प्रत्येक कुटुंबाच्या मनात असुरक्षिततेचं वादळ सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर पुन्हा एकदा निसर्गाच्या प्रकोपाने उपजीविकेचा पाया हादरला आहे. आता सगळ्यांचीच एकच इच्छा, वादळ शांत होऊ दे आणि मासेमारी पुन्हा सुरू होऊ दे.
*मच्छीमारांना मिळणार नुकसान भरपाई
राज्यात विदर्भ, मराठवाडा आदी भागांत मोठी पूरहानी झाली तसेच अवकाळीचा फटका बसला. त्याचप्रमाणे कोकणालाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याने शासनाने कोकणातील शेतकऱ्यांनाही मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये शेतकरी, बागायतदारांबरोबर मच्छीमारांनाही नुकसान भरपाई देण्याचे निश्चित केले आहे. त्याबाबत लवकरच मत्स्यविभागाकडून पंचनामे करून माहिती घेऊन शासनाला दिली जाणार आहे.
कोट १
पावसाने मासेमारी व्यवसाय पूर्ण अडचणीत आला आहे. गेले बारा दिवस आमच्या नौका बंदरात लावून आहेत. त्यामुळे संपूर्ण मासेमारी ठप्प झाली आहे. दरदिवशी होणारी कोट्यवधीची उलाढाल थांबली आहे. खालाशांचा, देखभालीचा खर्च सर्व नौकामालकांच्या अंगावर पडल्याने आमच्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. शासनाने आम्हाला आर्थिक मदत करावी, ही आमची मागणी आहे.
--पुष्कर भुते, मच्छीमार रत्नागिरी
कोट २
मासळी उद्योग सुरू झाल्यापासून अनेक वादळाने उद्योगाला मोठे धक्के बसले आहेत. सावरणे खूप कठीण झाले आहे. शासनाने याचा विचार करून मच्छीमारांसाठी नुकसान भरपाई म्हणून कोकण पॅकेज जाहीर करावे.
--बाळकृष्ण पावसे, अध्यक्ष, हर्णै बंदर कमिटी
कोट ३
वादळीस्थितीमुळे समुद्रात जाण्यास मनाई आहे. गेल्या आठ-दहा दिवसांत लाखो रुपयांचे नुकसान झालं. रोजीरोटीवर परिणाम झाल्याने आम्ही चिंतेत आहोत. हवामान शांत झाल्याशिवाय काहीच पर्याय नाही.
- अमजद बोरकर, मच्छीमार नेते, साखरीनाटे
कोट ४
वादळामुळे आम्हाला मासेमारी थांबवावी लागली. सर्व नौका आंजर्ले खाडीत घुसल्या आहेत. साठवलेली मासळी संपली, बाजारात माल नाही;पण भाव दुप्पट. कामगारांना पगार देणंसुद्धा कठीण झालंय.
- अनंत चोगले, ट्रॉलर मालक, हर्णै
कोट ५
डॉल्फिन सफारी, बोटराईड, पॅरासेलिंग सगळं बंद आहे. आम्ही रोजच्या कमाईवर जगतो. दिवसाला १५-२० हजार रुपयांचं नुकसान होतंय. हंगामात असं झालं तर पुन्हा सावरायला अवघड जाणार आहे.
- मनोज पवार, वॉटरस्पोर्ट्सचे सदस्य, मुरूड बीच
कोट ६
वादळामुळे समुद्र खवळलेला होता. बिघडलेल्या वातावरणामुळे उपकरणं किनाऱ्यावर काढून ठेवावी लागली. प्रत्येक दिवसाचं लाखोंचं नुकसान होतंय. घर कसं चालवायचं, असा प्रश्न पडला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या १५ दिवसांच्या हंगामातदेखील हीच परिस्थिती निर्माण झाली होती. या वर्षातील दोन्हीही हंगाम खूप वाईट गेले. शासनाने नैसर्गिक आपत्ती म्हणून नुकसान भरपाई द्यावी.
- संदेश घाग, जलक्रीडा व्यावसायिक, मुरूड
कोट ७
मासेमारी थांबल्याने बर्फ कारखाना बंद आहे. विजेचा खर्च आणि कामगारांचा पगार बाकी आहे. शासनाने थोडी मदत केली नाही तर या महिन्यात टिकणं कठीण आहे.
- विनोद पवार, बर्फ कारखाना मालक, राजापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

