गवाणकरांच्या आठवणींना उजाळा
02216
गवाणकरांच्या आठवणींना उजाळा
आचरा येथील श्री रामेश्वर वाचन मंदिरात श्रद्धांजली
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ३ ः ‘वस्त्रहरण’ या लोकप्रिय मालवणी नाटकाचे लेखक व दिग्दर्शक ‘वस्त्रहरणकार’ (कै.) गंगाराम गवाणकर यांना आज येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. हा कार्यक्रम श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिरात पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे यांनी (कै.) गवाणकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी श्री रामेश्वर वाचन मंदिर, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आचरा, वैभवशाली पतसंस्था, यशराज संघटना, कथामाला मालवण शाखा आणि कोमसाप मालवण शाखा या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष व (कै.) गवाणकर यांचे नातेवाईक अशोक कांबळी यांनी त्यांच्या नाट्यप्रेमाबद्दल, गावातील नाटके बसवताना दाखवलेल्या उत्साहाबद्दल आणि प्रेमळ स्वभावाबद्दल आठवणी जागवल्या. संघाचे उपाध्यक्ष सुरेश गावकर यांनी सौ. प्रज्ञा कांबळी-चव्हाण यांनी लिहिलेली श्रद्धांजली वाचून दाखवली. वैभवशाली पतसंस्थेचे चेअरमन मंदार सांबारी यांनी कै. गवाणकर यांच्या कोमसाप जिल्हास्तरीय अधिवेशनातील अध्यक्षपदाच्या आठवणींना उजाळा देत, त्यांनी जपलेली मालवणी भाषा आपणही जपली पाहिजे, हिच खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत व्यक्त केले.
कथामाला मालवण शाखेच्या सचिव सौ. सुगंधा गुरव यांनी त्यांच्या नाट्यलेखन व कार्याची माहिती दिली, तर यशराज संघटनेचे अध्यक्ष मंदार सरजोशी यांनीही श्रद्धांजली वाहिली. कोमसाप मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत (कै.) गवाणकर यांच्याशी झालेल्या सहवासाच्या आठवणी सांगून त्यांच्या आत्मचरित्र ‘व्हाया वस्त्रहरण’ मधील विचारांचा उल्लेख केला. शेवटी त्यांनी ‘मालवणी भाषा जपा आणि वाचा’ असा संदेश देत चार दिवाळी अंक वाचन मंदिरास भेट दिले. कार्यक्रमाचे निवेदन ग्रंथपालांनी करताना, ‘वस्त्रहरण या नाटकाने मला काय दिले?’ या भावनिक शब्दांत (कै.) गवाणकरांना श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

