कुंभार्लीतील धनगरवाडीत वाघाचे दर्शन

कुंभार्लीतील धनगरवाडीत वाघाचे दर्शन

Published on

कुंभार्लीत पट्टेरी वाघाचे दर्शन

ग्रामस्थांचा दावा ; वनविभाग पुष्टी करणार का?
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ : तालुक्यातील कुंभार्ली घाट परिसरातील धनगरवाडीतील ग्रामस्थांना पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चौथ्या वाघाच्या अस्तित्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होण्यास पुष्टी मिळाली आहे. या पट्ट्यात चौथा वाघ असल्याचे वनविभागाकडूनही यापूर्वीच मान्य करण्यात आले आहे.
सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात अधिकृतपणे तीन वाघ आहेत. त्यातील एक कोयना आणि दोन चांदोलीच्या जंगलात आहेत. चौथा वाघ चिपळूणमध्ये अधूनमधून दर्शन देतो. वनविभागाने चौथ्या वाघाचे अस्तित्व मान्य केले आहे. काही महिन्यापूर्वी पोफळी धनगरवाडी आणि तळसरच्या जंगलात पट्टेरी वाघाने गुरांची शिकार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर शिरगावच्या जंगलातही त्याच्या पायाचे ठसे आढळले होते. या तीन घटनेनंतर वनविभाग सतर्क झाला आणि जंगलातील पाणवठे तसेच वाटांवर कॅमेरे लावले; मात्र या कॅमेऱ्यामध्ये वाघ आढळला नाही. पोफळी गावामध्ये कुंभार्ली घाटात मोठे जंगल आहे. या जंगलात पट्टेरी वाघाचा वावर असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये नेहमीच होत होती. पोफळी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बबन खरात यांना रविवारी रात्री पट्टेरी वाघ शेतात वावरताना दिसला.
----------
कोट १
पोफळी-धनगरवाडी परिसरात पट्टेरी वाघ आहे. रविवारी रात्री तो मला वावरताना दिसला. त्याने कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान केले नाही. येथे वाघ आहे हे आम्हाला पूर्वीपासून माहिती असल्यामुळे आम्ही काळजी घेऊन जगत आहोत.

- बबन खरात, माजी ग्रामपंचायत सदस्य, पोफळी

--------
कोट २
चिपळूण तालुक्यातील जंगलात बिबट्यांची संख्या खूप आहे. पट्टेरी वाघांच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. नागरिकांनी घाबरू नये. वाघाला त्रास होईल असे कृत्य करू नये. वाघामुळे ग्रामस्थांना काही त्रास होत असेल तर त्यांनी प्रथम वनविभागाशी संपर्क साधावा.
- सरवर खान, परिक्षेत्र वनाधिकारी, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com