पान एक-ब्रिटिशकालीन स्मारकांची तोडफोड
२२४४, २५
ब्रिटिशकालीन स्मारकांची तोडफोड
मालवणमधील प्रकार ः संगमरवरी पाट्या गायब; ऐतिहासिक वारशाला गालबोट
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३ : येथील राजकोट किल्ल्याजवळ सुमारे दोन शतकांपूर्वी बांधलेल्या ब्रिटिशकालीन दोन स्मारकांची अनोळखींकडून तोडफोड करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या स्मारकांमध्ये बसवण्यात आलेल्या संगमरवरी पाट्या गायब झाल्या आहेत. या प्रकारामुळे इतिहासप्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे. या ऐतिहासिक ठेव्याच्या दुरवस्थेमुळे इतिहासप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
किल्ले सिंधुदुर्ग, राजकोट, पद्मदुर्ग, सर्जेकोट यांसारख्या किल्ल्यांमुळे मालवणला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या वारशात ब्रिटिशकालीन ऐतिहासिक ठेव्यांचाही समावेश आहे आणि राजकोट किल्ल्याजवळील ही स्मारके त्याचाच एक भाग होती. अठराव्या शतकात व्यापारी जहाजाचा राजकोट समुद्रात खडकांचा अंदाज न आल्याने भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत जहाजातील कमांडिंग कर्नल रॉबर्ट वेब आणि सार्जंट जॉन गार्वेन यांच्यासह अनेक अधिकारी बुडून मृत्युमुखी पडले होते. याच वीर अधिकाऱ्यांच्या स्मरणार्थ राजकोट किल्ल्यालगतच्या जागेत ही दोन स्मारके आणि अन्य व्यक्तींची थडगी बांधली होती.
अभ्यासासाठी या स्थळाला भेट देणाऱ्या इतिहासप्रेमींना स्मारकांची दुरवस्था झालेली आढळली. संगमरवरी पाट्या गायब असल्याचे पाहून त्यांनी स्थानिक रहिवाशांकडून माहिती घेतली. यात स्थानिकांनी सुरुवातीला वादळामुळे स्मारकांची दुरवस्था झाल्याचे सांगितले. मात्र, इतिहासप्रेमींनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत ही तोडफोड नैसर्गिक आपत्तीमुळे नसून जाणूनबुजून करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. स्मारकांमधील पाट्या उचकटून नेल्याचे चित्र असल्याने इतिहासप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
इतिहासप्रेमींतून नाराजी
हा ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वारसा असूनही तो असुरक्षित असल्याबद्दल इतिहासप्रेमींनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या मौल्यवान स्मारकांच्या सुरक्षिततेसाठी, तसेच त्यांच्या संवर्धनासाठी शासनाचे लक्ष वेधण्याचा आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्याचा निर्णय इतिहासप्रेमींनी घेतला आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

