चिपळूण-पाणी पुरवठा करणाऱ्या बोगद्यातील गळती काढणार

चिपळूण-पाणी पुरवठा करणाऱ्या बोगद्यातील गळती काढणार

Published on

rat4p9.jpg-
02361
चिपळूण ः कोंडफणसवणेत पाणीपुरवठा योजनेचे पाणी बंद झाल्यामुळे केशव जाधव यांच्या जागेतील विहीर स्वच्छ करण्यात आली.
------------

कोयना वीजनिर्मिती प्रकल्प---लोगो

पाणीपुरवठा करणाऱ्या बोगद्यातील गळती काढणार
पोफळीसह चार गावांचे पाणी बंद; विहिरींसह नैसर्गिक स्रोत स्वच्छ, वीज महानिर्मितीकडून निधी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः कोयना वीजनिर्मिती प्रकल्पातील टप्पा १ आणि २ ला पाणीपुरवठा करणाऱ्या बोगद्याची गळती काढली जाणार आहे. सध्या गळती काढण्याचे प्रात्याक्षिक सुरू असल्यामुळे पोफळी परिसरातील चार गावांचा पाणीपुरवठा बंद केला आहे. वीजनिर्मिती कंपनीच्या कर्मचारी वसाहतीतही पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी जुन्या विहिरी उपसण्यास सुरुवात केली आहे. विहिरींच्या स्वच्छतेसह गावातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत स्वच्छ केले जात आहेत.
कोयना धरणातून पोफळी येथील वीजनिमिर्ती संचाला पाणीपुरवठा करणाऱ्या बोगद्याची गळती काढली जाणार आहे. या कामासाठी वीज महानिर्मिती कंपनीने निधीची तरतूद केली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया झाली होती; मात्र काम कधी सुरू होईल, हे निश्चित सांगितले जात नव्हते. गळती वाढत असल्यामुळे यावर्षी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी प्रथम प्रात्याक्षिक घेतले जात आहे. त्यामुळे एक ते पाच नोव्हेंबरदरम्यान वीजपुरवठा बंद ठेवला आहे. पोफळी ईव्हीटी येथून पोफळी गावासह वीजनिर्मिती कंपनी कर्मचारी वसाहत, कोंडफणसवणे, मुंढे आणि शिरगाव गावाला ग्रॅव्हिटीने पाणीपुरवठा केला जातो. टप्पा एक आणि दोनची वीजनिर्मिती बंद असल्यामुळे कोयनेतून टप्पा एक आणि दोनकडे येणारे पाणी थांबवण्यात आले आहे. त्यामुळे या गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
पाणीपुरवठा बंद करण्यापूर्वी महानिमिर्ती कंपनीने संबंधित गावांना पत्र पाठवून पूर्वकल्पना दिली होती. शिरगावच्या सरपंच नीता शिंदे आणि मुंढेचे सरपंच सखाराम गायकवाड यांनी ग्रामसभा घेऊन पाणीपुरवठा बंद करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत मागितली होती; परंतु कंपनीला पुढील कार्यवाही करायची असल्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रात्याक्षिक घेण्याचे ठरले. त्यानंतर ग्रामस्थांनी जमेल त्या पद्धतीने पाणी साठवून ठेवले; मात्र पाण्याची गरज वाढल्यामुळे साठवेलेले पाणी दोन दिवसानंतर संपले. त्यामुळे आता गावातील विहिरी स्वच्छ केल्या जात आहेत. नैसर्गिक स्रोत स्वच्छ केले जात आहेत. काही गावात जुने पंप दुरुस्त केले जात आहेत; मात्र चारही गावांमध्ये ग्रॅव्हिटीची पाणी योजना सुरू झाल्यानंतर जुन्या पंपाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे ग्रामपंचायतीला पाणी देणे अशक्य झाले आहे.

चौकट
शिरगावमधील दोन वाड्यांमध्ये टंचाई
सध्या वाशिष्ठी आणि वैतरणा नदीपात्रात मुबलक पाणी आहे. त्यामुळे ग्रामस्थ आंघोळ करणे, कपडे धुणे आणि इतर घरकामासाठी नदीतून पाणी आणत आहेत. पिण्यासाठी विकतचे पाणी घेतले जात आहे. शिरगावमध्ये डोंगराळ भागात असलेल्या वेताळवाडी आणि निगुडवाडी या वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

कोट
बोगद्यातील गळती काढण्याचे प्रात्याक्षिक सुरू आहे. दोन दिवसांत हे काम संपेल त्यानंतर वीजनिर्मिती आणि पाणीपुरवठा दोन्ही सुरू होईल; मात्र भविष्यात अशा अडचणी निर्माण झाल्या तर पर्यायी व्यवस्था हवी. सध्या पाऊस सुरू आहे. नैसर्गिक स्‍त्रोत अजून, जीवंत आहेत. त्यामुळे म्हणावी तेवढी पाणीटंचाई जाणवत नाही; मात्र उन्हाळ्यात हे काम घेतले असले तर परिस्थिती वेगळी असती.
- केशव जाधव, माजी उपसरपंच, कोंडफणसवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com