-एकत्रचा नारा पण उमेदवार ठरेना

-एकत्रचा नारा पण उमेदवार ठरेना

Published on

एकत्रचा नारा; पण उमेदवार ठरेना
चिपळुणात तिढा ः बंडखोरीच्या शक्यतेने निर्णय लांबणीवर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः चिपळूण पालिकेची निवडणूक एकत्र लढण्याचा निर्धार महायुतीच्या घटकपक्षातील नेते व्यक्त करत आहेत. तिघांच्या बैठकाही संयुक्त होत आहेत; मात्र महायुतीचा उमेदवार कोण असेल, हे अद्याप ठरत नाही. त्यासाठी वरिष्ठांकडे बोट दाखवले जात आहे.
शहराच्या अस्मितेचा बिंदू असणाऱ्या चिपळूण पालिकेची निवडणूक तब्बल चार वर्षांनंतर अखेर जाहीर होण्याच्या मार्गावर आली आहे. प्रशासकांच्या राज्यात विकासाचे दावे झाले असले तरी प्रत्यक्षात पायाभूत सुविधांचा लाभ शहरातील नागरिकांना किती मिळाला यावर प्रश्नचिन्ह आहे. आता पालिका ताब्यात घेऊन शहराचा विकास करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते आणि इच्छुकांच्या मनोमीलनाच्या चर्चांना वेग आला आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा असल्यामुळे आणि चिपळुणात सर्वच पक्ष तुल्यबळ असल्यामुळे युती होणार नाही, असे सांगितले जात होते. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांत मैत्रीपूर्ण लढत होणार की, एकजुटीने हे पक्ष निवडणुकीला सामोरे जाणार, याची केवळ चर्चा रंगत होती; मात्र महायुतीचे नेते एकत्र बैठका घेत आहेत. इच्छुकांना संधी न मिळाल्यास बंडखोरीचा भडका उडू शकतो. त्यामुळे बंडखोरांना निवडणुकीची तयारी करण्यासाठी वेळ मिळू नये यासाठी एकत्रित बैठका घेतल्या जात असल्याची चर्चा आहे.
महायुती झाली तर भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला काही जागा सोडाव्या लागणार आहेत. अशावेळी निष्ठावंतांना संधी मिळणार का, हा तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना प्रश्न पडला आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल हा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, असे सध्या सांगितले जात आहे. पाग कन्या शाळेत सोमवारी महायुतीच्या घटक पक्षांची बैठक झाली. त्याही बैठकीत महायुती म्हणून लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आजी-माजी आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी एकत्र बसून महायुती होणार हे सांगत आहेत; परंतु तिन्ही पक्षांमध्ये सक्षम उमेदवार नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी स्पर्धेत आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदाचा उमेदवार वरिष्ठ पातळीवर ठरेल, असे सांगितले जात आहे.
---
चौकट
महाविकास आघाडीत माजी आमदार रमेश कदम यांनी दावा केला आहे. दुसरीकडे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. ठाकरेगटाच्या सेनेकडून माजी नगरसेवक बाळा कदम आणि माजी नगरसेवक मोहन मिरगल यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे महायुतीबरोबर महाविकास आघाडीतही नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची गर्दी आहे.
---
कोट
चिपळूण शहराचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल, यासाठी तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची लवकरच बैठक होईल. मी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भेटलो, त्यांनी मला उमेदवारी देण्यास सहमती दर्शवली आहे. आघाडीतील इतर प्रमुख नेत्यांचीही मी भेट घेणार आहे.
--लियाकत शाह, तालुकाध्यक्ष, काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com