रत्नागिरीसह कोकणातील ९८ औषध विक्रत्यांना नोटिसा

रत्नागिरीसह कोकणातील ९८ औषध विक्रत्यांना नोटिसा

Published on

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई ...लोगो

कोकणातील ९८ औषधविक्रेत्यांना नोटिसा
प्रिस्क्रिप्शनशिवाय ‌कफ सिरप‌; रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ‌‘कफ सिरप‌’ विक्री करणाऱ्या कोकण विभागातील तब्बल ९८ औषधविक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीएने) कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईदरम्यान १९ लाख ६५ हजार रुपयांचा कफ सिरपचा साठा प्रतिबंधित करण्यात आला. विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये कोकणातील अन्य जिल्ह्यांसह रत्नागिरीतील १०, सिंधुदुर्गातील ४, रायगडमधील ११ औषधविक्रेत्यांचा समावेश असल्याची महिती एफडीएनच्या आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये विषारी घटक असलेल्या कफ सिरपच्या सेवनाने बालकांचे मृत्यू झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने राज्यात विशेष तपास मोहीम सुरू केली. कोकण विभागात घेतलेल्या २१३ तपासण्यांपैकी ९८ विक्रेत्यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री केल्याचे उघड झाले. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली. या तपासात ठाणे जिल्ह्यातील ५९, पालघरमधील १४, रायगडमधील ११, रत्नागिरीतील १० आणि सिंधुदुर्गातील ४ औषध विक्रेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या तसेच कोकणातील १२५ कफ सिरपचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, त्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
या कारवाईत ठाणे जिल्ह्यातून १७ लाख ७९ हजारांचा, रायगडमधून २० हजारांचा, रत्नागिरीमधून ६१ हजारांचा आणि सिंधुदुर्गमधून एक लाख रुपयांचा कफ सिरप साठा जप्त करण्यात आला आहे. नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचे एफडीए अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
---
चौकट
नमुने तपासणीला विलंब
अन्न आणि औषध प्रशासनाकडून औषधांसह अन्नाचे नमुने घेऊन हे संबंधित प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले जातात; परंतु, या नमुन्यांचे अहवाल लवकर येत नाहीत. काही वेळेला नमुन्यांच्या अहवालासाठी दोन ते तीन महिने प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे पुढच्या कारवाईला खीळ बसते. नियमभंग करणाऱ्यांना मुभा मिळत असल्याचे बोलले जाते; परंतु, काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये नमुन्यांची लवकर चाचणी केल्याचे सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com