धामणी उपकेद्राची विशेष पथकाकडून तपासणी
-rat१३p२०.jpg-
२५O०४१५९
संगमेश्वर ः धामणी उपकेंद्राला भेट देणाऱ्या विशेष पथकातील अधिकाऱ्यांकडून कर्मचारी, रुग्ण यांच्याशी संवाद साधण्यात आला.
---------
धामणी उपकेंद्राची पथकाकडून तपासणी
आरोग्यसेवेचे केले मूल्यांकन कामकाजाबाबत समाधान
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १३ ः तालुक्यातील धामणी येथील आयुष्मान आरोग्य उपकेंद्र येथील आरोग्यसेवेचे मूल्यांकन करण्यासाठी आरोग्य विभागाचे विशेष पथक आज आले होते. उपकेंद्रात दिली जाणारी सेवा, उपलब्ध साहित्य यांसह विविध मुद्द्यांवर माहिती घेतली तसेच धामणी उपकेंद्रातील कामकाजाबाबत पथकाने समाधान व्यक्त केले.
नॅशनल हेल्थ सिस्टिम्स रिसोर्स सेंटर (NHSRC), नवी दिल्ली तसेच इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव अँड सोशल मेडिसिन (IAPSM) यांच्या सहयोगाने महाराष्ट्रातील आरोग्यसेवेतील मूल्यांकन हा उपक्रम हाती घेतला आहे. या आयोजनानुसार, आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र धामणी येथे बी. के. वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. डॉ. वेल्हाळ, डॉ. धनजंय यादव, डॉ. अश्फाक शेख, डॉ. सोनिका मिश्रा, डॉ. कुणाल कालस्कर, डॉ. प्रणव पोल, डॉ. केशव शिंदे, डॉ. मोनिषा नायर यांच्या पथकाने पाहणी केली. तपासणी करताना सामुदायिक सहभाग, लोकसंख्या शास्त्रीय तपशील, पायाभूत सुविधा आणि दुवे, रेफरल लिंकेज स्थिती, औषधे आणि निदान, उपकरणांची उपलब्धता, सेवा उपलब्धता, माहिती तंत्रज्ञान उपलब्धता, निधी पुरवठा व व्यवस्थापन, संबंधित विभागांचा सहभाग, स्वयंसेवी संस्था सहभाग अशा अनेक मुद्द्यांचे मूल्यमापन करण्यात आले. या प्रसंगी समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, आशासेविका व अंगणवाडी सेविका, गरोदर माता, प्रसूतिपश्चात माता, वयोवृद्ध, इतर रुग्ण व लाभार्थी यांना उपकेंद्रातील सेवेबद्दल प्रत्यक्ष माहिती पथकाने घेतली. या वेळी धामणी उपकेंद्रातील उपक्रम कामकाजाबाबत पथकाने समाधान व्यक्त केले. या वेळी आयुष्मान आरोग्यमंदिर उपकेंद्र धामणीमधील समुदाय आरोग्य अधिकारी अश्विनी मेणे, आरोग्यसेविका सारिका साळवी, आरोग्यसेवक राजेंद्र घाणेकर, आशासेविका मानसी कांबळे, भारती मेस्त्री, अंगणवाडी सेविका रोशनी जाधव, मदतनीस कोळवणकर तसेच लाभार्थी उपस्थित होते.

