वानर-माकडं संपवायची नाहीत, नियंत्रणात ठेवायची
rat14p1.jpg-
04296
जयंत फडके
बोल बळीराजाचे--------लोगो
इंट्रो
कोकणातील माझ्या बळीराजाच्या अस्तित्वावरच उठलेला विषय म्हणजे वानर माकडांचा उपद्रव. हा प्रश्न आता ‘कोण हा त्रास?’ एवढा मर्यादित राहिलेला नाही. गेल्या पंधरा वीस वर्षांत परिस्थिती इतकी भयानक झाली आहे की, शेतीवाडी सोडलीच आहे आता घरंदारं सोडुन जायची वेळ आल्येय. पण कोकणालाच ओसाड करणाऱ्या या प्रश्नापासून शासन, वप्रशासन आणि समाजही का दूर पळतोय हे अनाकलनीय आहे. आरक्षण,निवडणुका, क्रिकेट या पेक्षा कोकणातील तीन जिल्ह्यातील शेतकरी विस्थापित व्हायची वेळ आली तरी का कोणालाच त्याचे गांभीर्य लक्षात येत नाही? इकडे शेतकरी देशाचा, समाजाचा, अर्थव्यवस्थेचा कणा म्हणायचं आणि त्याच्या जीवनमरणाच्या प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष करायचं हे कसं चालेल? रिफायनरी, अणुउर्जा यासारखे प्रकल्प, विमानतळ, दोन तीन हायवे, पुतळे, सांस्कृतिक कार्यक्रम आपले प्राधान्यक्रम आहेत की कोकणातील माझा बळीराजा ?
- जयंत गोपाळ फडके,
जांभुळआड, पूर्णगड रत्नागिरी
-------
वानर-माकडं संपवायची नाहीत, नियंत्रणात ठेवायची
वन विभाग आणि तथाकथित वन्य जीव रक्षक यांचे फाजील स्तोम नव्हते, तोपर्यंत वानर माकडांचे थवे, गॅंग तशा नियंत्रणात होत्या. पण आता त्यांचा जीव राखता राखता माझा बळीराजा उध्वस्त होतोय याकडे कोण लक्ष देणार? बरं वन्य जीव साखळीतल्या वानर-माकडांची संख्या नियंत्रणात आली तर असा काय निसर्गाचा समतोल ढळणार ते तरी एकदा समजून सांगा. काही अतीशहाणे तर कोकणात झालेल्या आंबा, काजूच्या लागवडीवरच घसरतात. "तुम्ही जंगलं तोडली आता ते तुम्हाला त्रास देणारच"..वा वा.. केवढा हा साळसुदपणा.. डोंगर मोकळे करून माझ्या बळीराजानं त्यावर काळ्या दगडाचे क्रशर लावलेत की मजल्यांवर मजले बांधुन सिमेंटची जंगलं केल्येत? बागाच फुलवल्यात ना ? वाढत्या नागरिकरणाचं पाप माझ्या बळीराजाच्या डोक्यावर का फोडताय ? हे म्हणजे रशिया-युक्रेन, इस्रायल-सिरीया आणि अमेरिकेच्या मनात येईल तीथे युध्द उकरून वाट्टेल तेवढी घातक शस्त्र वापरायची आणि प्रदुषण आणि आवाजाच्या, उष्णतेच्या नावानं दिवाळीतल्या रोषणाईवर रडायचं असंच झालं..! जंगलं शेतकऱ्यांनीच संपवली असं का वाटतं समाजाला? कोकणातील माझ्या बळीराजानेच डोंगर बागबागायतींनी फुलवलेत..!
वन्य जीवांची भलतीच काळजी असणारे मुंग्या, पाली, उंदीर मारतात की सांभाळून ठेवतात? वाघाच्या प्रतिकृती, वेगवेगळे आवाज, विषारी उपाय, सोलर कंपाऊंड आणि आता वानर माकडं पकडुन नेण्याचा शासकीय फार्स यासारखे उपाय सुचवणारे कोकणातील शेतकरी असुच शकत नाहीत. हे सारे उपाय जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा भयंकर आहेत. काही प्रमाणात, ठराविक कालावधीसाठी मारायची परवानगी किंवा शासनानेच मारून संख्या कमी करणे..आणि दरवर्षीच कमी करीत राहणे हाच एकमेव इलाज आहे. त्यासाठी शेतीसंरक्षण हत्यार परवाने देणे गरजेचे आहे. तिकडे बीडमधे वाट्टेल तेवढे वाटलेच ना..तेही गुंडगिरीसाठी..इथे जगण्यासाठी गरजेचे आहेत. या एका संकटामुळे माझ्या बळीराजाचे किती आर्थिक नुकसान होतंय याची व्यवस्थेला कल्पनाच नाही. त्याच्या वर्णनाची गरजही नाही. ती अनुभवायची गोष्ट आहे पण पंचनामे करून किती ,कशी आणि कोणाला नुकसान भरपाई मिळते ते जरा उघड्या डोळ्यांनी बघावं म्हणजे या विषयाची गंभीरता लक्षात येईल.
राजकारणाची लागलेली वाट, शिक्षणाच्या आयचा...आणि सर्वच क्षेत्रात असलेली अधःपतनाची स्वीकारहार्यता खुपच दूरगामी नुकसानकारक आहे पण वानर माकडांचे माझ्या बळीराजावरचे संकट आता फक्त आर्थिकच नाही तर सर्वस्पर्शी आहे. कोकणात भाजीपाला घाटावरूनच येणार, शेती परवडत नाही...यासारख्या अनेक गोष्टी. ही आता गृहीत धरली जाणारी बाब आपली भौगोलिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, नैसर्गिक संपन्नता संपवत आहे..माझ्या बळीराजाला या भूभागातुच हाकलून लावत आहे...आपल्याला वानरमाकडं संपवायची नाहीत. त्यांची संख्या नियंत्रणात ठेवुन आपलं कोकणीविश्व वाचवायचं आहे.आपल्या जातीसाठी राज्य वेठीस धरलं जाऊ शकतं मग जातीच्या शेतक-यासाठी आपण काय करणार 0
-------
(लेखक प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

