वेंगुर्लेसाठीचा दोन कोटींचा निधी परत
04360
वेंगुर्लेसाठीचा दोन कोटींचा निधी परत
सुनील डुबळे ः पालिका प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १४ ः येथील पालिकेला नगरविकास खात्याकडून विकासकामांसाठी मंजूर झालेले तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परत गेला, अशी माहिती माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे यांनी दिली.
कॅम्प येथील शिवाजी प्रागतिक शाळेजवळ ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उभारण्यासाठी १ कोटी आणि धोकादायक झालेल्या ब्रिटिशकालीन पत्रा पुलाच्या बांधकामासाठी १ कोटी, असा निधी २०२१-२२ मध्ये प्राप्त झाला होता. मात्र, कामे वेळेत न झाल्याने हा निधी शासनाकडे जमा करावा लागला. निधी परत जाण्याच्या कारणांची चौकशी करण्यासाठी नागरी कृती समितीचे पदाधिकारी पालिकेत गेले असता मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी वेंगुर्ले शहर नागरी कृती समितीचे अॅड. नंदन वेंगुर्लेकर, लवू तेरसे, संजय गावडे उपस्थित होते. श्री. डुबळे म्हणाले, ‘३० मार्च २०२२ च्या शासन निर्णयान्वये वेंगुर्ले बंदर रस्त्यालगत सायकलिंग व वॉकिंग ट्रॅकसह पुलाचे बांधकाम करण्यासाठी ३ कोटी ३६ लाख ८३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हे काम सोपवले होते. मात्र, त्यांनी ठराविक कालावधीत निधी खर्च न केल्याने पुढील कामेही रखडली. ऑक्टोबर २०२३ मध्ये सुधारित कामांनुसार ज्येष्ठ नागरिक केंद्र व पत्रा पुलासाठी दोन कोटींची तरतूद पुन्हा झाली, तरीही प्रशासनाने ती वेळेत वापरली नाही.’ शहरातून घरपट्टी व मालमत्ता कराद्वारे १ कोटी ६५ लाख महसूल गोळा होतो, तर अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे २ कोटी ७६ लाखांचा निधी शासनाला परत, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे ते म्हणाले. गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असलेले पत्रा पुलाचे काम पुन्हा एकदा मागे पडले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
---
जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव
मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांनी, २०२२-२३ मध्ये मंजूर झालेली काही कामे तांत्रिक कारणांमुळे थांबली होती. त्यामुळे निधी नियमानुसार शासनाकडे परत करावा लागला. पत्रा पुलाचे ‘व्हीजेटीआय’, मुंबई मार्फत स्ट्रक्चरल ऑडिट ७ ऑगस्टला करण्यात आले आणि त्याचा अहवाल ५ सप्टेंबरला सादर झाला. या अहवालानुसार पुलाच्या नूतनीकरणासाठी निधी मिळावा यासाठी २२ सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे, असे सांगितले.

