‘मिडलकट’ आणखी किती बळी घेणार?
04370
‘मिडलकट’ आणखी किती बळी घेणार?
महामार्गावरील धोका कायम; साडेचार वर्षांत अपघातांची मालिकाच
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १३ ः सिंधुदुर्गातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊन साडेचार वर्षांचा कालावधी उलटला तरीही महामार्गावरील अनधिकृत मिडलकट बंद केलेले नाहीत. गेल्या महिनाभरात झाराप येथील मिडलकटवर युवकाचा, तर नडगिवे येथील मिडलकटवर व्यापाऱ्याचा बळी गेला. सहा दिवसांपूर्वी जानवली येथील मिडलकट ओलांडताना पती-पत्नी गंभीर जखमी झाले. अनधिकृत मिडलकटवर असे वारंवार अपघात होऊ असूनही येथील मिडलकट बंद केले नसल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.
झाराप येथील अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी तीव्र आंदोलन केले. त्यानंतर महामार्ग विभागाने तातडीने कार्यवाही करून तेथील मिडलकट बंद केला. मात्र, झाराप ते खारेपाटणपर्यंत अन्य भागातील अनधिकृत मिडलकट बंद झालेले नाहीत. मुंबई-गोवा महामार्गावर दोन लेनमध्ये दुभाजक बांधून त्यावर छोटी झाडे लावली आहेत. ही झाडे चार ते पाच फुटापर्यंत वाढली आहेत. दुभाजकांवरील झाडांमुळे दोन्ही लेनवरील वाहने दिसत नाहीत. ताशी १०० ते १४० किलोमीटर वेगाने जाणारी वाहने मिडलकट ओलांडणाऱ्या वाहनांना धडकतात. यात प्रामुख्याने मिडलकट ओलांडणारे दुचाकीस्वार गंभीर जखमी तर अनेकवेळा मृत्यूमुखी पडले आहेत.
१ ऑक्टोबरला झाराप येथील मिडलकटवर दुचाकीवरील युवकांना मोटारीने उडवले. त्यापाठोपाठ १६ ऑक्टोबरला नडगिवे येथील मिडलकट ओलांडताना फोंडाघाट येथील दुचाकीवरील व्यापारी मोटारीची धडक बसून मृत झाला तर ६ नोव्हेंबरला जानवली येथील मिडलकट ओलांडताना दुचाकीवरील प्रौढ आणि त्याच्या मागे बसलेली त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. महामार्गावरील तळेरे ते जानवली या सुमारे २३ किलोमीटर अंतराचे सर्वेक्षण केले असता एकूण तब्बल २९ मिडलकट आढळले. पैकी केवळ ५ मिडलकट अधिकृत आहेत. अधिकृत मिडलकट असलेल्या ठिकाणी वेगमर्यादा कमी ठेवण्याबाबतच्या सूचना आणि ब्लिंकर्स लावले आहेत. जेणेकरून महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना येथे जंक्शन किंवा मिडलकट असल्याचा अंदाज येतो. उर्वरीत २४ ठिकाणी मिडलकट असल्याची माहिती होत नसल्याने वाहने भरधाव हाकली जातात. यात अचानक दुचाकीस्वार आडवा आल्यानंतर अपघात होतात. महामार्ग चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर अशा अपघातांमध्ये सातत्य राहिले आहे.
दरम्यान, कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालीही लोखंडी सरंक्षक ग्रील तोडून नवनवीन अनधिकृत मिडलकट तयार केले जात आहेत. या पुलाखालील जागा महामार्ग विभागाने सुशोभिकरणासाठी नगरपंचायतीकडे गतवर्षी हस्तांतरीत केली आहे. मात्र, नगरपंचायतीकडूनही सुशोभिकरण, अतिक्रमण हटवणे आणि अनधिकृत मिडलकट बंद करण्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. दरम्यान, महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने गतवर्षी उपप्रादेशिक परिवहन विभागाने झाराप ते खारेपाटणपर्यंतच्या महामार्गाचे सर्वेक्षण केले होते. यामध्ये ५६ ठिकाणी अनधिकृत मिडलकट असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांना त्याअनुषंगाने महामार्ग विभागाला कळविल्यानंतर यातील १८ अनधिकृत मिडलकट महामार्ग विभागाने बंद केले. पण, महामार्गावर अपघातांचा हॉटस्पॉट असलेल्या साकेडी फाटा ते तरंदळे बॉक्सवेल या चार किलोमिटरच्या अंतरात तब्बल नऊ ठिकाणी अनधिकृत मिडलकट आहेत. हे मिडकट बंद करणे महामार्ग विभागाला अजूनही शक्य झाले नाही.
-----------------
महामार्ग चौपदरीकरण होत असताना आम्ही पारंपरिक रस्ते असलेल्या ठिकाणी बॉक्सवेलची मागणी केली होती. त्यावेळी लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारानेही बॉक्सवेल उभारणीची ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात बॉक्सवेल झाले नाहीत. त्यामुळे पूर्वी असलेले जाण्या-येण्याचे मार्ग कायम राहिले आहेत. जर अनधिकृत मिडलकट बंद करायचे असतील तर त्या ठिकाणी बॉक्सवेलची उभारणी करा.
- चंद्रहास राणे, सामाजिक कार्यकर्ते, ओसरगाव
------------------
महामार्ग चौपदरीकरण असल्याने वाहनंची गती आपसूकच वाढते. चौपदरीकरण महामाार्गवर ९० किलोमिटर प्रतितास ही मर्यादा असली तरी त्या पेक्षा वेगाने वाहने हाकली जातात. यात अचानक दुचाकीस्वार आडवा आला तर वाहने रोखता येत नाहीत. त्यामुळे महामार्ग विभागाने सर्व अनधिकृत मिडलकट बंद करावेत किंवा जेथे असे मिडलकट आहेत, त्या ठिकाणी मिडलकट असल्याबाबतचे निर्देश करणारे ब्लिंकर्स बसवावेत. जेणेकरून अपघात टाळता येणे शक्य होईल.
- उत्तम राणे, वाहन चालक, सातरल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

