ढिसाळ नियोजनाचा दिव्यांगांना फटका

ढिसाळ नियोजनाचा दिव्यांगांना फटका

Published on

04446

ढिसाळ नियोजनाचा दिव्यांगांना फटका

दोडामार्गच्या शिबिरातील प्रकार; ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर


सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १४ : येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित शिबिरात अपुऱ्या सुविधांमुळे दिव्यांगांची गैरसोय झाली. ना पिण्याचे पाणी, ना बसण्याची व्यवस्था. त्यामुळे उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांवर तळपत्या उन्हात ऊभे राहण्याची नामुष्की ओढवली. ग्रामीण रुग्णालयाच्या या ढिसाळ आयोजनावर दिव्यांग संघटन अध्यक्ष साभाजी सावंत व सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक यांनी तीव्र संताप व्यक्त केला. संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

तालुक्यातील ज्या दिव्यांग बांधवांचे ऑनलाइन प्रमाणपत्र नाही, अशांना यूडीआयडी कार्ड काढण्यासाठी तसेच दिव्यांगांची पडताळणी करण्यासाठी आज शिबिर आयोजित करण्याचा आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांनी पारित केला होता. तसे पत्र देखील प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समितींना प्राप्त झाले. त्यानुसार दोडामार्ग पंचायत समितीने तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र लिहून ऑनलाइन प्रमाणपत्र, यूडीआयडी कार्ड व पडताळणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. या शिबिराचे आयोजन दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात केले होते.
या शिबिरासाठी आज तालुक्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नियोजित वेळेत ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाची टीम दाखल झाली. मात्र, अपुऱ्या नियोजनाअभावी दिव्यांग बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागला. ग्रामीण रुग्णालयाने केलेल्या ढिसाळ नियोजनाबाबत दिव्यांग बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांना बसण्याची व्यवस्थ केली नाही. पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. रुग्णालयातील अपुऱ्या जागेमुळे उपस्थित दिव्यांगाना रुग्णालयाबाहेर उन्हात ताटकळत रहावे लागले. समोरच्या पटांगणात मंडप उभारून बसण्याची व्यवस्था करणे गरजेचे होते. मात्र, रुग्णालयाकडून तशी व्यवस्था केली नसल्याने तळपत्या उन्हात उभे राहण्याची नामुष्की बांधवांवर आली.
शिबिराचे सुनियोजित आयोजन करता येत नसेल तर आम्हा दिव्यांगांना त्रासदायक ठरणारी अशी शिबिरे राबवू नका, अशा प्रकारे संतप्त प्रतिक्रिया दिव्यांग बांधवांनी अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. यावेळी दिव्यांग संघटना तालुकाध्यक्ष साभाजी सावंत व सामाजिक कार्यकर्ते यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

श्री. सावंत यांनी तीव्र संताप व्यक्त करत रुग्णालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रश्‍नांची सरबत्ती केली. गेल्या पंधरा दिवसांपासून कागदोपत्री घोडे नाचवून जे शिबिर आयोजित केले ते केवळ दिखाऊपाण करण्यासाठी आहे. आरोग्य विभागाकडून एवढ्या ढिसाळ नियोजनाची अपेक्षा नव्हती. दिव्यांगाबाबत एवढा निष्काळजीपणा अधिकारी कसे काय दाखवू शकतात? असा संतप्त प्रश्‍न करत दिव्यांग बांधवांना झालेला त्रास सहन करणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी अशाप्रकारे दिव्यांगांची हेळसांड करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली.
श्री. वरक यांनीही तीव्र संताप व्यक्त केला. शिबिरात आलेल्या दिव्यांग बांधवांची ग्रामीण रुग्णालयाकडून ज्या प्रकारे हेळसांड केली तशी कोणाचीही होऊ नये. शासन अशी शिबिरे आयोजन करून ज्या प्रकारे बेजबाबदारपणे वागत असेल, परवड करत असेल तर अधिकारी वर्गावर कार्यवाही झाली पाहिजे. पाण्याची व्यवस्था करता येत नसेल तर शिबिरे आयोजित करू नये, अशी प्रतिक्रिया देत सर्व बांधवांचे पाण्याची झालेली गैरसोय लक्षात घेता त्यांनी स्वखर्चाने दिव्यांगासाठी पाणी उपलब्ध करून दिले. त्यांच्यासोबत घोडगेवाडी माजी सरपंच घनश्याम करपे उपस्थित होते. त्यांनी देखील ग्रामीण रुग्णालयाच्या ढिसाळ नियोजनाचा निषेध केला.
--------------------
कोट
ज्या दिव्यांगांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन नाही, ज्यांचा आयडी नाही त्यांच्यासाठी शिबिर आयोजित करून तालुका स्तरावर सुविधा उपलब्ध करून द्यावी, असा लेखी आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिला होता. पंचायत समितीकडून तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतला कळविले होते. मात्र, किती दिव्यांग उपस्थित राहणार याची अधिकृत यादी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना दिली नाही. परिणामी मोठ्या संखेने उपस्थित राहिलेल्या दिव्यांगांची तात्काळ व्यवस्था करणे शक्य झाले नाही. या शिबिराबाबत ग्रामपंचायत स्तरावर कळविले होते. मात्र, सर्व दिव्यांग बांधवांकडे चुकीची माहिती गेली असावी त्यामुळे एवढी मोठी गर्दी झाली असावी.
- अजिंक्य सावंत, गटविकास अधिकारी, दोडामार्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com