लांजा वार्तापत्र
-rat22p21.jpg-
P25O06046
पूर्वा मुळे
-rat22p22.jpg-
P25O06047
प्रियांका यादव
-rat22p23.jpg-
25O06048
सावली कुरूप
----
लांजा नगरपंचायत वार्तापत्र----लोगो
महायुती-महाविकास आघाडीसमोर अपक्षांचे आव्हान
पक्षांची राजकीय प्रतिष्ठा पणाला ; अटीतटीच्या अन् चुरशीच्या लढती अपेक्षित
सकाळ वृत्तसेवा
लांजा ः उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष, तसेच नगरसेवकपदाचे चित्र स्पष्ट झाले आहे. यात विशेष उत्कंठा आहे ती नगराध्यक्षपदाची. नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली महायुती जिंकणार? महाविकास आघाडी की, अपक्ष बाजी मारणार? याचे चित्र ३ डिसेंबरला स्पष्ट होणार असले तरी सध्याची अटीतटीची आणि चुरशीची लढत लक्षात घेता या तिरंगी लढतीमध्ये कोण होणार नगराध्यक्ष? हे पाहणे लांजावासियांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे.
--रवींद्र साळवी, लांजा
---
लांजा नगरपंचायतीच्या १७ नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नगराध्यक्ष, नगरसेवकपदासाठीच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगरपंचायतीच्या १७ पैकी १६ जागा या महायुती लढत असून, जवळपास १४ जागांवर महाविकास आघाडी लढत आहे. १७ पैकी १७ही जागांवर अपक्ष लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या ही सर्वाधिक आहे.
नगरसेवकपदाचा प्रभाग सहा वगळता १६ जागांवर सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार सादर करताना सर्वच्या सर्व जागा जिंकून आणण्याचे दावे केले आहेत. असे असले तरी त्या त्या प्रभागात असलेल्या अपक्ष उमेदवारांचे पारडे जड आहे. काही प्रभागात तर अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतो, अशीही शक्यता आहे. गतवेळच्या काही नगरसेवकांनी उमेदवारी न मिळाल्याने अपक्षपणे रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाही फटका राजकीय पक्षांच्या उमेदवाराला बसू शकतो. त्यामुळे
अपक्ष उमेदवारांनी प्रस्थापित राजकीय उमेदवारांसमोर तगडे आव्हान निर्माण केल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे; मात्र किंगमेकर अशी बिरूदावली असणारे आमदार किरण सामंत हे या निवडणुकीत स्वतः जातीनिशी उतरल्यास सध्याचे चित्र बदलेल, असा दावा महायुतीकडून केला जात आहे.
निवडणुकीत महाविकास आघाडीकडून महायुतीला टक्कर दिली जात आहे. यापूर्वी वादग्रस्त ठरलेला डीपी प्लॅन, लांजा डम्पिंग ग्राउंडसारखे महत्त्वाचे मुद्दे घेऊन महाविकास आघाडी प्रचारात उतरली आहे. त्यांचे हे मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवण्यात ते कितपत यशस्वी ठरतात, यावर त्यांची पुढील वाटचाल किंबहुना त्यांची ताकद व राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
नगरसेवकपदाबरोबरच लांजावासियांचे लक्ष लागले आहे ते नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे. या निवडणुकीत शिवसेना-भाजप राष्ट्रवादी या महायुतीकडून सावली सुनील कुरूप या निवडणूक रिंगणात आहेत. त्यांची राजकीय पार्श्वभूमी काहीही नसली तरी त्यांच्या मागे त्यांचे पती, माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील उर्फ राजू कुरूप यांची राजकीय ताकद आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका, गटनेत्या, उपनगराध्यक्ष अशी विविध पदे भूषवलेल्या पूर्वा मंगेश मुळे या नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. अभ्यासू नगरसेविका आणि स्वच्छ प्रतिमा अशी त्यांची ओळख आहे. डीपी प्लॅन, डंपिंग ग्राउंडसारखे प्रकल्प रद्द करण्याचा वचननामा त्यांनी जाहीर केला आहे. आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्यासाठी किती झटून काम करणार, यावर त्यांच्या विजयाची मदार आहे.
शिवसेना-भाजप महायुतीमुळे तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या भाजपचे माजी नगरसेवक संजय यादव यांनी आपली पत्नी प्रियांका संजय यादव यांना अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे. कमळ ही पक्षाची निशाणी त्यांच्याकडे नाही हा त्यांचा मायनस पॉईंट असला तरी भाजपचे माजी नगरसेवक, गटनेता म्हणून त्यांनी यापूर्वी चांगली कामगिरी केली आहे. लांजा नगरपंचायतीच्या काही वाड्यांमध्ये त्यांची स्वतःची अशी वोट बँक आहे.. प्रियांका यादव या उच्चशिक्षित उमेदवार आहेत. एकूणच लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक महायुती विरूद्ध महाविकास आघाडी आणि अपक्ष यांच्यातच होणार आहे. तिन्ही उमेदवारांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
चौकट
देवराईतून अपक्ष बिनविरोध होणार
नगरपंचायतीचा प्रभाग क्रमांक सहा म्हणजे देवराई-आगरवाडी या मतदार संघातून येथील प्रभागातील नागरिक हे अपक्षपणे आपला उमेदवार बिनविरोध निवडून देतात. त्यामुळे या ठिकाणी कोणताही राजकीय पक्ष आपला उमेदवार देत नाही. गेल्या सलग दोनवेळा या प्रभागातून आगरवाडी येथील उमेदवार निवडून आले आहेत. या वेळी या प्रभाग क्रमांक सहामधून देवराईला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे येथील अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

