रत्नागिरी पालिका वार्तापत्र
रत्नागिरी पालिका वार्तापत्र...लोगो
आघाडीतील फूट महायुतीच्या पथ्थ्यावर
नगरसेवक पदासाठी १०१ उमेदवार रिंगणात ; पक्षांच्या मोर्चेबांधणीला वेग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी ः रत्नागिरी पालिकेच्या १६ प्रभागांमधील ३२ जागांसाठी होणारी सार्वत्रिक निवडणूक रंगतदार आणि चुरशीची होणार, असे असलेले चित्र महायुतीच्या नेत्यांनी पुढाकार घेत अनेक विषयांचे निर्धार मेळाव्यातून पोलखोल केल्याने तयार झाले होते; मात्र जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) एकत्र येऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडले आहेत. ते स्वतंत्र दहा जागा लढवणार आहेत. महाविकास आघाडीतील या फाटाफुटीचा महायुतीलाच थेट फायदा होऊ शकतो. त्यात नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील बशीर मुर्तुजा यांनी बंड करत पत्नीला अपक्ष म्हणून रिंगणात उतरवले आहे. यामुळे महाविकास आघाडीला मिळणारी हक्काची समाजाची मते वहिदा मुर्तुजा यांच्याकडे वळण्याची शक्यता आहे. महायुती भक्कम दिसत असून, महाविकास आघाडीतील फूट मतांचे विभाजन करणारी ठरणार आहे.
--राजेश शेळके, रत्नागिरी
---
रत्नागिरी पालिकेची गेल्या आठ वर्षानंतर ही सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यापूर्वीच्या निवडणुकीनंतर तीन वर्षे प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरामध्ये विकासाचे अनेक मुद्दे मागे पडले आहेत. निवडणुकीनंतर सत्तेत येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना विकासाचे व्हीजन निश्चित करावे लागणार आहे. पालिकेच्या थेट नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये महायुतीच्या शिल्पा सुर्वे आणि महाविकास आघाडीच्या शिवानी माने यांच्यात थेट लढत होणार, हे निश्चित आहे. संध्या कोसुंबकर, सौ. किणे या अपक्ष उमेदवार असून, आप पक्षाच्या उमेदवारही रिंगणात आहेत तसेच नगरसेवकपदाच्या ३२ जागांसाठी एकूण १०१ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये सात प्रभागांमध्ये थेट लढती आहेत. उर्वरित प्रभागामध्ये दुरंगी, तिरंगी लढती होणार आहे.
जागावाटपावरून सुरुवातीला भाजप आणि शिवसेनेमध्ये तणाताणी झाली होती. कमीत कमी १२ जागातरी भाजपला मिळाव्यात, अशी अपेक्षा होती; परंतु त्या जागा जरी मिळाल्या नसल्या तरी उपनगराध्यक्ष आणि काही चांगल्या समित्या मिळणार असल्याने भाजप महायुतीसाठी राजी झाला. भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता होती. नाराजदेखील आतून महाविकास आघाडीला मदत करतील, अशी भीती होती. कारण, महाविकास आघाडीच्या उमेदवार शिवानी माने या राजेश सावंत यांच्या कन्या आहेत. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून ते बाजूला झाले; मात्र महायुतीच्या निर्धार मेळाव्यात राजेश सावंत हे आता भाजपचा कोणताही भाग नाहीत, असे श्रेष्ठींनी जाहीर केल्याने महायुतीचे लक्ष्य निश्चित झाले. भाजपमधील तीन नाराजांना शिवसेनेतून उमेदवारी दिल्यामुळे युतीने प्रचारात मुसंडी मारली आहे.
महाविकास आघाडी प्रचारात आघाडी घेईल, असे सुरुवातीचे चित्र होते; परंतु जागावाटपावरून त्यांच्यातही बिनसले आहे. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला शब्द दिल्याचे बोलले जाते; परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बाळासाहेब माने यांच्या सूनबाई शिवानी माने यांना उमेदवारी दिल्यामुळे उबाठा शहरात जोमात होती; परंतु यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नाराज झाला. राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुजा आणि मिलिंद कीर या दोघांनी आपल्या पत्नींना उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरवले. मिलिंद कीर यांनी माघार घेतली. नाराज मुर्तुजा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर स्वतंत्र गट करून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामुळे महाविकास आघाडीचे त्रांगडे झाले आहे. महायुती अधिक मजबूत झाली तर महाविकास आघाडीच्या मतांचे मोठे विभाजन होणार, ही रत्नागिरी पालिकेची राजकीय स्थिती आहे.
---
चौकट
नगराध्यक्षपदासाठी महायुतीकडून शिल्पा सुर्वे, महाविकास आघाडीकडून शिवानी माने, संध्या कोसुंबकर अपक्ष, वहिदा मुर्तुजा अपक्ष, सुश्मिता शिंदे आप पक्ष, प्राजक्ता किणे अपक्षा सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
चौकट...
महायुती जागावाटप
शिवसेना - २६
भाजप - ६
--
महाविकास आघाडी जागावाटप
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना - २६
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)- ४
काँग्रेस - १
बीएसपी- १
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

