सीसीटीव्हीहीत गाड्या दिसतात त्यांचे नंबर नाही
कॅमेऱ्यात फक्त मोटार… नंबर मात्र गायब
अणुस्कुरा मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ; गुन्ह्यांचे वाढले प्रमाण
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २५ ः ओणी पाचलकडून अणुस्कुरामार्गे पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारा मार्ग कायमच चोर व दरोडेखोरांसाठी सोयीचा मार्ग ठरलेला आहे; मात्र या ठिकाणी अणुस्कुरा येथे पोलिसचौकी असूनही त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे या वारंवार घडलेल्या घटनांवरून पुढे आले आहे. या ठिकाणी असलेला सीसीटीव्हीही तकलादू ठरत आहे. यामध्ये गाड्या जाताना येताना दिसतात; पण त्यांचे नंबर सीसीटीव्हीत दिसत नाहीत, हे शनिवारच्या घटनेने स्पष्ट झाले आहे.
शनिवारी मध्यरात्री खडीकोळवण येथील सदानंद शांताराम मोरे यांच्या घरात शनिवारी रात्री सुमारे ५ ते ६ दरोडेखोरांच्या टोळक्याने अंधाराचा फायदा घेत थेट घरात घुसून लुटमारीचा प्रयत्न केला. या प्रकरणी राजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरातील पैसे साठवण्याच्या डब्यातील हजार ते बाराशे रुपये गेल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. खडीकोळवण येथे घरात घुसलेले हे टोळके एका पांढऱ्या रंगाच्या मोटारीमधून आल्याची माहिती पुढे आली असून, ती गाडी अणुस्कुरा घाटातून पुढे गेल्याचेही दिसून येत आहे. ही गाडी ओणी, पाचल व अणुस्कुरा येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून येत आहे. ओणी येथील पुलाखालून व पुढे पाचल येथून मध्यरात्री पुढे गेल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे; मात्र यात नंबर दिसत नसल्याने पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही. पोलिसांकडून या तपासकामी काही पथके तयार करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे; मात्र २४ तासापेक्षा अधिक काळ उलटूनही या प्रकारचा छडा लागलेला नाही.
उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश कदम, राजापूर पोलिस निरीक्षक अमित यादव, पोलिस उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांसह रायपाटण दूरक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारीवर्ग यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पंचनामा करून तपास सुरू केला आहे; मात्र अद्यापही या प्रकरणी काहीच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. याआधीच्या तालुक्यातील रायपाटण येथे भर वस्तीत झालेल्या वृद्धेच्या खुनाचा उलगडा सव्वा महिना उलटूनही झालेला नाही.
चौकट
पाठोपाठ गुन्ह्याचे प्रकार
तालुक्यात गेल्या दोन महिन्यात घरफोडी, दुचाकी चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत तर पूर्व भागात रायपाटण येथे भरवस्तीत १४ ऑक्टोबर रोजी एका वृद्धेचा खून झाला होता. या खुनाचा अद्याप उलगडा झालेला नाही तर मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली येथे दसऱ्याच्याच दिवशी एका महिलेला गाडीत लिफ्ट देऊन लुटण्याचा प्रकार घडला होता, त्याचाही अद्याप तपास लागलेला नाही तर कोंडये व त्यानंतर कळसवली, नाणार, कुंभवडे या भागात घरफोडीच्या घटना घडल्या आहेत.
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

