टुडे पान एकसाठी रविंद्र चव्हाण-उदय सामंत बातमी

टुडे पान एकसाठी रविंद्र चव्हाण-उदय सामंत बातमी

Published on

swt2513.jpg
06603
सावंतवाडी ः येथील प्रचार सभेत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण. व्यासपीठावर मंत्री नीतेश राणे, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोसले, युवराज लखम भोसले, अन्य पदाधिकारी व नगरसेवक पदाचे उमेदवार. (छायाचित्र ः रुपेश हिराप)

श्रद्धाराजेंकडून राणेंचा विचार पुढे नेण्याचे काम
रवींद्र चव्हाण ः सावंतवाडीतील जाहीर सभेत प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनातून विकास व्हावा व येथील दरडोई उत्पन्न वाढावे, हा विचार तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांचा नेहमीच राहिला आहे. आज हा विचार पुढे नेण्याचे काम आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोसले करीत आहेत. येथील महिलांना व बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे त्यांचे व्हिजन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून त्यांचे हे व्हिजन पूर्ण करण्याचा प्रयत्न भाजप म्हणून आम्ही निश्चितच करू, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘धुळ्यात राजघराण्याच्या राजमाता निवडणूक लढवीत असल्याने तेथील लोकांनी व सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन त्यांना व सर्व पॅनलला बिनविरोध निवडून दिले. त्यामुळे सावंतवाडीतील शहरवासीयांनीही याचा विचार करावा. सिंधुदुर्गातील प्रत्येक नगरपालिका भाजपच्या ताब्यात द्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याला दत्तक घेतील.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘लहानपणापासून सावंतवाडी शहर बघत आलोय. मोती तलावाचे आकर्षण आजही आहे. शहराला सौंदर्य आहे. सावंतवाडीच्या संस्थानकालीन राजघराण्याने विजेची गरज न लागता केवळ गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करून पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली होती. आज शहरात येणारे पाणी राजघराण्याच्या पुण्याईने येते याची जाण ठेवावी. दूरदृष्टीने केलेला विचार यातून दिसतो. लोकसंख्या वाढली असल्याने ड्रेनेज सिस्टीममध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. या व अशा अनेक समस्या दूर करण्यासाठी व नवे प्रकल्प राबविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस निधी उपलब्ध देतील. त्यासाठी ‘पार्लमेंट टू पंचायत’ असे एक विचारांचे सरकार असणे आवश्यक आहे.’’
श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘सावंतवाडीत आरोग्य सेवा तसेच इतर प्रशासकीय व खासगी कामांसाठी ग्रामीण भागातील लोक नेहमी शहरात येतात. यावेळी नागरी सुविधांचा बोजा शहरावर पडतो. त्यामुळे नागरी सुविधांसोबतच येथे कायमस्वरूपी अशा आरोग्य सुविधा तसेच अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.’’
वेंगुर्ले पालिका भाजपच्या हाती होती. तिथे झालेला कायापालट आज दिसत आहे. २३ प्रकल्प तिथे उभे राहिले आहेत. एक विचारांचे सरकार असल्याने मोठ्या प्रमाणात निधी तिथे देण्यात आला. त्यामुळे सावंतवाडीकरांनी देखील भवितव्याचा विचार करावा. शाश्वत विकासासाठी निधीअभावी राहिलेली भूमिगत विद्युत वाहिनी, ड्रेनेज सिस्टीम पूर्णत्वास आणण्यासाठी भाजपचा उमेदवार निवडून देणे आवश्यक आहे. त्यासाठी कमळासमोरील बटण दाबून भाजपला मतदान करावे, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.

चौकट
सावंतवाडी शहराचा कायापालट करणार
सावंतवाडीच्या विकासाचे व्हिजन आम्ही घेऊन जात आहोत. राजेसाहेब रघुनाथ महाराज यांनी शहराच्या ड्रेनेज सिस्टीमचे नियोजन केले होते. आता पुढील काळात हा वारसा पुढे नेताना नगराध्यक्ष म्हणून टाऊन प्लॅनिंग, रोजगार, आरोग्य, पर्यटन, मनोरंजन सुविधा वाढवण्यासाठी माझा भर राहील. माझं शिक्षण हॉटेल मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंटमध्ये झालंय. त्यामुळे येथील रोजगार वाढवण्यासाठी माझा भर राहणार आहे. महिला, युवकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. येथील लाकडी खेळण्यांच्या उत्पादनांसह इतर उत्पादनांनाही जागतिक बाजारपेठेत स्थान देण्यासाठी माझा भर असेल‌. मी सावंतवाडीची सून असल्याचा अभिमान आहे‌. राजघराण्याचा वारसा मी पुढे घेऊन जात आहे‌. सावंतवाडीची मुलगी, सून म्हणून मला लोकांनी स्वीकारलं आहे‌‌. राजकारणात मी नवीन आहे; पण विकसित सावंतवाडी माझी जिद्द आहे‌. भाजपच्या आशीर्वादाने पाच वर्षांत सावंतवाडीचा कायापालट करून दाखवेन, असा आशावाद भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केला.
------------------
swt2514.jpg
06604
सावंतवाडी ः येथे संवाद साधताना उद्योगमंत्री उदय सामंत. व्यासपीठावर आमदार दीपक केसरकर, संजू परब व इतर पदाधिकारी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)

सावंतवाडीतील लढत केसरकरांच्या प्रतिष्ठेची
उदय सामंत ः जनसेवेसाठी शिवसेनेला संधी द्या
सकाळ वृत्तसेवा
​सावंतवाडी, ता. २५ ः ​येथील पालिकेची आगामी निवडणूक ही केवळ शिवसेनेची नव्हे, तर आमदार दीपक केसरकर यांच्या प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे जनतेने सर्व नगरसेवक उमेदवारांसह नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला ‘धनुष्य बाण’ समोरील बटण दाबून पालिकेच्या सभागृहात पाठवावे आणि त्यांना जनसेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. कोणीतरी भावनिक आणि ऐतिहासिक आवाहन करत असले तरी, काम करण्याची ताकद कोणामध्ये आहे, असा चेहरा लोकांनी निवडावा. ​प्रकृती ठीक नसतानाही आमदार केसरकर केवळ शहरासाठी मेहनत घेत आहेत. ​आपलं आयुष्य त्यांनी सावंतवाडीसाठी वेचलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत यश देऊन त्यांचे हात पुन्हा एकदा बळकट करा, असेही श्री. सामंत यावेळी म्हणाले.
शहरातील विविध क्षेत्रांतील बुद्धिजीवी लोकांशी संवाद साधताना श्री. सामंत बोलत होते. ते म्हणाले, ‘‘माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केसरकर यांच्यासमोर झाली. केसरकर हे सहनशीलतेचे पराकोटीचं व्यक्तिमत्त्व असून ते कामातून उत्तर देतात. माझ्या विजयातही केसरकर यांचा मोठा वाटा आहे. सिंधुरत्न योजनेचा लाभ मिळाल्यानेच मी मोठ्या मताधिक्याने निवडून आलो; मात्र आज आमदार केसरकर यांचा खच्चीकरणाचा प्रयत्न सुरू आहे. त्यांची तब्येत बरी नसतानाही ते प्रचारात उतरले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळत या निवडणुकीत यश मिळवून त्यांना एक प्रकारे पाठबळ देणे गरजेचे आहे. आज सिंधुदुर्गात असलेली बेरोजगारी दूर करण्यासाठी आपला पुढाकार असणार आहे. ​मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून महिलांसाठी ८० टक्के निधी मी देण्यास सक्षम आहे. ​सावंतवाडी शहरातील १ हजार मुलं स्वतःच्या पायावर उभी राहतील, यासाठी संकल्प करा.​ वेळप्रसंगी सगळं मंत्रालय सावंतवाडीत घेऊन येतो. ​महिलांसाठी क्लस्टर तयार करा, पर्यटन, निवास, फूड ट्रॅक यांसारख्या क्षेत्रांसाठी ५०० मुला-मुलींनी संकल्प करावा. ज्यांनी सावंतवाडीसाठी आयुष्य समर्पित केले, त्यांना साथ देऊन पालिका पुन्हा एकदा केसरकर यांच्या ताब्यात द्या.’’ यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. नीता सावंत-कविटकर, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, अशोक दळवी, प्रेमानंद देसाई, बबन राणे, सचिन वालावलकर, अनारोजीन लोबो, दीपाली सावंत, शर्वरी धारगळकर, भारती मोरे, गोविंद वाडकर, अजय गोंदावळे, देव्या सूर्याजी, सुरेंद्र बांदेकर, बंड्या कोरगावकर, ॲड. सायली दुभाषी, पूजा आरवारी, उत्कर्षा सासोलकर, वैभव म्हापसेकर, वेदिका सावंत, प्रसाद नाईक, बासित पडवेकर, हर्षा जाधव, स्नेहा नाईक आदी उपस्थित होते.

चौकट
परब पराभूत होणार नाहीत
मंत्री सामंत यांनी यावेळी संजू परब यांना पाडण्यासाठी घराघरात जाऊन प्रयत्न होत असल्याबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, ‘‘कुणीही कुठेही फिरले तरी संजू परब पराभूत होणार नाहीत. त्यांच्यासोबत नगराध्यक्षपदाचा उमेदवारही विजयी होईल. आम्ही जनतेशी बांधील असणारे लोक आहोत. सावंतवाडीतील क्रांतिकारक बदल दीपक केसरकर यांच्यामुळे दिसतो. त्यामुळे शिवसेनेचे नगराध्यक्ष व नगरसेवकांना निवडणूक देत संधी द्यावी. काम करण्याची कुवत, क्षमता कोणात आहे? याचाही विचार करावा.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com