

फ्लॅशबॅक
देवरूख नगरपंचायतीला दोन टर्मचा इतिहास--------लोगो
देवरूखने अनुभवले
सत्तांतर, युती अन् दुही
देवरूखच्या स्थानिक स्वराज्य व्यवस्थेचा प्रवास हा बदलत्या राजकीय समीकरणांचा आणि लोकशाही प्रक्रियेच्या गतिमानतेचा उत्तम नमुना आहे. २०१२ पर्यंत ग्रामपंचायतीच्या चौकटीत कार्यरत असलेल्या देवरूखचा नगरपंचायतीपर्यंतचा प्रवास केवळ प्रशासकीय बदल नव्हे, तर स्थानिक विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरली. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून २०१८ मधील थेट नगराध्यक्ष निवडणुकीपर्यंत आणि त्यानंतर प्रशासक शासनापर्यंत देवरूखमध्ये सत्तांतर, युती, दुही, नाट्यमय राजकीय घडामोडी आणि जनतेच्या थेट नेतृत्वनिवडीचा अनुभव घेतला. आता, सर्वसाधारण आरक्षणामुळे पुन्हा एकदा महिलांना नेतृत्वाची संधी मिळणार आहे....!
- प्रतिनिधी
------
२०१२ पर्यंत देवरूख ही ग्रामपंचायत होती; परंतु तत्कालीन पालकमंत्री आमदार भास्कर जाधव यांच्या प्रयत्नाने देवरूख आणि गुहागर या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करण्यात आले. त्या वेळी देवरूखची लोकसंख्या १३ हजार ८५ होती. २०१३ मध्ये येथील नगरपंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. त्या वेळी ९ हजार ४१५ मतदारसंख्या आणि चार प्रभाग होते. त्यात एक नंबर प्रभागात अमृतनगर, माणिक चौक, शिवाजीचौक आदी नऊ वाड्यांचा समावेश होता. तर प्रभाग दोन मध्ये कोल्हेवाडी ते रामेश्वर मंदिर, वरचीआळी, मधलीआळी अशा एकूण १५ वाड्यांचा समावेश होता तर प्रभाग तीन मध्ये दत्तनगर ते मोगरवणे, खालची आळी परिसरातील १५ वाड्यांचा समावेश होता. तर प्रभाग चार मध्ये खालची आळी, परशुराम वाडी, कुंभ्यांचा दंड परिसरातील १२ वाड्यांचा समावेश होता तर १७ नगरसेवक होते. यामध्ये तीन प्रभागात चार आणि एका प्रभागात पाच नगरसेवक होते. २०१३ मध्ये देवरूख नगरपंचायतीची पहिली निवडणूक झाली. त्यामध्ये अडीच वर्षाच्या कार्यकाळात भाजप-शिवसेना युतीची सत्ता होती. सव्वा-सव्वा वर्षाच्या कार्यकाळात प्रथम नगराध्यक्ष नीलम हेगशेट्ये तर नीलेश भुरवणे हे उपनगराध्यक्ष होते. त्यानंतर पुढील सव्वा वर्षे स्वाती राजवाडे या नगराध्यक्ष झाल्या. त्या वेळी शिवसेनेचे मनीष सावंत हे उपनगराध्यक्ष होते. अडीच वर्षानंतर सेना-भाजपमध्ये दुही निर्माण झाली आणि अपहरण नाट्यासारखे अनेक प्रकार घडले. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन अडीच वर्षाकरिता नीलेश भुरवणे यांना नगराध्यक्षपद देण्यात आले. त्या वेळी भाजपचे अभिजित शेट्ये हे उपनगराध्यक्ष होते.
२०१८ मध्ये दुसरी निवडणूक झाली त्या वेळी ९ हजार ८६४ मतदार संख्या होती आणि १७ प्रभाग होते. दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजपने थेट नगराध्यक्षपदी मुसंडी मारत पाच वर्षे निर्विवाद सत्ता संपादन केली. नगरसेवकांच्या संख्या बळाचा विचार करता त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि भाजप यांची समान संख्या होती. भाजपचे सात नगरसेवक निवडून आले तर मनसे १, अपक्ष १, शिवसेना ४ आणि राष्ट्रवादी ४ असे पक्षीय बलाबल होते. जनतेमधून थेट नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून उभ्या राहिलेल्या धनश्री बोरकर यांचा शंभर ते दीडशे मतांनी पराभव करत भाजपच्या मृणाल शेट्ये यांनी विजयाची माळ गळ्यात घातली. २०१८ ते २३ पर्यंतचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला आणि २०२३ नंतर देवरूख नगरपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आले. त्यानंतर होणाऱ्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी पुन्हा सर्वसाधारण आरक्षण पडल्याने पुन्हा एकदा देवरूख नगरपंचायतीवर महिलाराज येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.